एमआयटी डब्लूपीयूत लोकसंख्या नियंत्रण कार्यशाळा संपन्न
पुणे, १२ जुलै २०२४ : “देशात जन्मदर नियंत्रण कायदा नसल्याने लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. कुटुंब नियोजन उपक्रमांद्वारे जन्मदर नियंत्रण करता येऊ शकते. जगातील ३ डझन देशांनी जन्मदर नियंत्रण करून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवले आहे. जन्मदर कमी झाल्यास देशातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या प्राथमिक सुविधांचा लाभ मिळून देशाच्या सर्वांगिण विकासास चालना मिळेल.परंतू मतांच्या ध्रुवीकरणामुळे राजकीय पक्ष लोकसंख्येवर बोलत नाहीत “असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. आर. नागाराजन यांनी व्यक्त केले.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त एमआयटी डब्लूपीयूच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स व मेकॅनिकल विभागाच्या वतीने आयोजित लोकसंख्या नियंत्रण कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्लूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. मंदार लेले, डॉ. अंजली साने व डॉ. एस. बी. बर्वे उपस्थित होते.
डॉ. आर. नागाराजन म्हणाले,” लोकसंख्यावाढ ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. या मुळे देशात संसाधनांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. जर या वर नियंत्रण करता आले नाही तर हा देश बेरोजगारांचा म्हणून गणल्या जाऊ शकते. मतांच्या ध्रुवीकरणामुळे राजकीय पक्ष लोकसंख्येवर बोलत नाहीत.मात्र लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती व रचनात्मक पातळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांना प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.”
प्रा. प्रकाश जोशी म्हणाले,” २०११ ते २०२१ या वर्षांमध्ये देशात १९ कोटींनी लोकसंख्या वाढली आहे. अशीच गती राहिल्यास पुढील पन्नास वर्षांत २१६ कोटी एवढी लोकसंख्या होऊ शकते. देशात लोकसंख्येचा भस्मासुर झाला असून याला नियंत्रण करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणताही विभाग अस्तित्वात नाही. अशा विभागाची गरज असून लोकसंख्या नियंत्रणातूनच या देशाची समृद्धी वाढेल. देशातील लोकांच्या गुणवत्तापूर्ण दर्जात्मक चांगल्या सेवा सुविधांसाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव पर्याय आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी राजकीय इच्छाशक्ती, विवाहाचे वय, शिक्षणावरचा खर्च, साक्षरता, कुटुंब नियोजन प्रोत्साहन व प्रसार मध्यामांद्वारे जागरूकता यावर ही चर्चा होणे आवश्यक आहे.”
डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले,” देशातील बेकारी, घरांची कमतरता, वाहतुकीची कोंडी, पर्यावरणाचा विनाश, गुन्हेगारी या सर्वांच्या मुळाशी लोकसंख्यावाढ हेच कारण आहे. संख्या शास्त्राच्या मदतीने लोकसंख्या नियंत्रणासाठी इकॉनॉमिक्स व कॉमर्स संशोधन विभाग विद्यापीठाच्या स्तरावर महत्वपूर्ण कार्य करतील.”
तसेच शिक्षणाचा लोकसंख्या नियंत्रणावर होणारा सकारात्मक परिणाम, एक अपत्य मातृत्व महत्त्व, दळणवळण, रोजगार, आरोग्य यांवर हाोणारे परिणाम व उपायांवर येथे चर्चा करण्यात आली.
विद्यार्थिनी द्रिती जैन ने सूत्रसंचालन व डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.