- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून व्यवस्थेची पाहणी
- नवे टर्मिनल पुण्याच्या विकासाचे साक्षीदार : मुरलीधर मोहोळ
पुणे : उद्घाटनानंतर कार्यान्वित होण्याच्या प्रतिक्षेत असलेले पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज असून या नव्या टर्मिनलच्या व्यवस्थेचा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यवस्थेचा आणि सज्जतेचा आढावा घेतला. येत्या रविवारी हे नवे टर्मिनल कार्यान्वित होत असून हे टर्मिनल म्हणजे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणीनंतर व्यक्त केली.
पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी खासदारपदी विजयी झाल्यानंतरच पाठपुराव्याला सुरुवात केली होती. यासाठी सर्वात मोठा असलेला सीआयएसएफच्या जवानांच्या संख्येचा प्रश्न मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सोडवला होता. तसेच इतर तांत्रिक प्रक्रियाही पूर्ण करुन घेतल्या आणि नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा केला.
पाहणीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच पुण्याच्या विकासाबाबत आग्रही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी गेल्या दहा वर्षांत पुणे शहराला मिळाला आहे. नवे टर्मिनल हे पुण्याच्या विकासाचे साक्षीदार असून पुणे शहरातील हे विकासपर्व पुढेही निरंतर सुरु राहील’.
पाहणीसाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यासमवेत पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्यासह विमानतळाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.