पुणे-नामांकित बीव्हीजी डेव्हलर्पसच्या नावाने बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर भागीदारांचे बनावट सह्या करुन, त्याद्वारे बीव्हीजी डेव्हलर्पस या भागीदारी संस्थेचे मंजूर मुदतकर्ज खात्यातून परस्पर वेगवेगळया फर्मच्या खात्यावर पैसे वळवून 6 काेटी 94 लाख 18 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी विभीषण व्यंकटराव गायकवाड (वय- 53,रा.निगडी,पुणे) यांनी 4 आरोपींविराेधात भाेसरी पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार बांधकाम व्यवसायिक विजय अरविंद रायकर (वय-46,रा.सिंहगड राेड,पुणे), शाहबाज जफर सय्यद माेहमंद जफर (रा.गहुंजे, ता.मावळ,पुणे), बांधकाम व्यवसायिक गाैरव सुनिल साेमाणी (35,रा. बिबवेवाडी,पुणे) व महेश भगवनराव नलावडे या आराेपींवर भांदवि कलम 420, 409, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 25/10/2019 ते 18/1/2020 दरम्यान घडला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शाहबाज जफर यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची औद्याेगिक वित्त शाखा पिंपरी येथे रिलेशनशिप मॅनेजर पदावर असताना, पदाचा गैरवापर करुन बांधकाम व्यवसायिक विजय रायकर, गाैरव साेमाणी व महेश नलावडे यांच्याशी संगनमत केले. बीव्हीजी डेव्हलर्पसचे नावाचे बनावट विनंतीपत्र बनवून त्यावर तक्रारदार व त्यांचा भाऊ बाळासाहेब गायकवाड यांच्या बनावट सह्या केल्या.
त्याद्वारे त्यांचे बीव्हीजी डेव्हलर्पस या भागीदारी संस्थेचे मंजुर मुदतकर्ज खात्यातून वेळेावेळी रक्कम 6 काेटी 14 लाख 18 हजार रुपये तक्रारदार यांचे संमतीविना परस्पर आराेपी शाहबाज जफर, विजय रायकर व गाैरव साेमाणी यांचे फायद्याकरिता त्यांच्या वेगवेगळ्या फर्मच्या खातेवर परस्पर वळते केले. त्यांचा फसवणुकीचा उद्देश साध्य हाेण्यासाठी तक्रारदार यांचे कर्ज खात्याचे बनावट बँक स्टेटमेंट तयार करुन त्यावर बँकेचा शिक्का व सही करुन ते तक्रारदार यांना वेळाेवेळी सादर केले.
तसेच सदरचा गैरप्रकार तक्रारदार यांचे निर्दशनास आल्यानंतर फसवणुकीची रक्कम परत करण्याचे वेळाेवेळी आश्वासान आराेपींनी दिेले. त्यापैकी विजय रायकर या आराेपीने 3 काेटी 20 लाख रुपये तक्रारदार यांना परत केले. परंतु उर्वरित 6 काेटी 94 लाख 18 हजार रुपये संगनमताने अपहार करुन स्वत:चे फायद्याकरिता वापरुन सदर रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस सपकळ करत आहेत.