6 महिन्यांचा पगार थकल्याने झाल्या होत्या निराश-जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापुढेच हातावरअचानक ब्लेडने केले वार
बुलढाणा- आरोग्य सहाय्यक असणाऱ्या नवऱ्याचा पगार थकवल्यामुळे एका महिलेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यापुढेच हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. साहेब जगायला पैसे लागतात, मरायला नाही, असे ही महिला यावेळी ओरडत होती. या घटनेमुळे बुलढाण्याच्या आरोग्य सेवा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, वनिता ज्ञानेश्वर खंडारे असे हातावर ब्लेड मारून घेणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ज्ञानेश्वर खंडारे हे रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पण मागील 6 महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले होते. खंडारे यांची काही प्रकरणांत 2016 पासून चौकशी सुरू आहे. तसेच इतर काही प्रकरणांत ते सकृतदर्शनी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आहे. यामुळे त्यांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्यामुळे त्याच्या पत्नीने एक धक्कादायक पाऊल उचललं. तिने डिएचओंच्या (जिल्हा आरोग्य अधिकारी) केबीनमध्ये जाऊन स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची अतिशय खळबळजनक घटना बुलडाण्यामध्ये घडली आहे. आरोग्य सहाय्यक पतीचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा पगार थकवल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून सर्वत्र याच कृत्याची चर्चा होत आहे.
गत 6 महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे ज्ञानेश्वर खंडारे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. यामुळे उदरनिर्वाह चालवणे त्यांना कठीण झाले आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाचीही चिंता कुटुंबाला लागली होती. याला कंटाळून ज्ञानेश्वर खंडारे यांच्या पत्नी वनिता यांनी या प्रकरणी न्यायाचे आर्जव करत थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पण तिथेही न्याय मिळाला नाही. उलट त्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली.
यामुळे वनिता यांनी अचानक ब्लेड मारून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या पोट भरण्यास पैसा लागतो साहेब, मरायला नाही, असे म्हणत ओरडत होत्या. प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर वनिता खंडारे यांना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली. या घटनेमुळे बुलढाण्यात एकच खळबळ माजली आहे.