भुजबळांचे प्रत्युत्तर, सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांबद्दल मी काय बोलणार?
मुंबई–सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भुजबळांनी बेकायदेशीररित्या घर बळकावल्याचं सांगत त्यांनी घराचे मूळ मालक कुटुंबिय सोबत आणले होते. सुरुवातीला भुजबळांच्या घरासमोर त्यांना बोलू दिलं नव्हतं. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर आक्षेप घेतले.अंजली दमानिया यांच्या आरोपांना मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अंजली दमानिया यांच्याबद्दल मी अधिक काही बोलणार नाही. सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांबद्दल मी काय बोलणार? आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. या प्रकरणाची केस कोर्टामध्ये सुरु असून जो निकाल येईल, तो आम्हाला मान्य असेल.अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या. पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यानंतर त्यांनी आपल्या घरीच पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, मी आज दाखवणार होते की, मंत्री छगन भुजबळ यांची सांताक्रुझमधील टोलेजंग इमारत ही त्यांची नाही आहे तर लुबाडलेल्या जागेवर उभी आहे. मूळ जागा मालकाला अद्याप एक पैसाही मिळालेला नाही, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी यावेळी केला. ज्या माणसाला उठसुठ छातीत कळ यायची ती कळ कुठे गेली. असा सवालही त्यांनी केला.
भुजबळ यासंदर्भात पुढे म्हणाले की, घरासंबंधीचे कागदपत्र आमच्याकडे आहेत. परंतु मी या कंपनीचा डायरेक्टर नाही. आमचे लोक आहेत. हे सगळं असलं तरी दमानिया यांना असं नाटक करायचं आजच कसं सुचलं? एकीकडे ओबीसींचा लढा सुरु असताना दुसरीकडे असे आरोप केले जात आहेत. काहीही झालं तरी न्यायाच्या पलीकडे मी अजिबात जाणार नाही.
फर्नांडिस कुटुंबाचा एक बंगला होता. तो 1994 ला रहेजाला पुनर्बांधणी करायला दिला. त्याच्या बदल्यात फर्नांडिस कुटुंबाला पाच प्लॅट मिळणार होते. पण अद्याप ते प्लॅट मिळाले नाहीत तर रहेजाने तो बंगला समीर भुजबळ यांच्या कन्स्ट्रक्शनला विकला. त्यानंतर त्यावर बुलडोझर फिरवला गेला. पण फर्नांडिस कुटुंबाला एकही पैसाही मिळालेला नाही. मी काही किरीट सोमया नाही, हातोडा घेऊन टाईमपास करायला. भुजबळ यांनी काल कष्टाच्या पैशाचे खातो, असे जाहीर सभेत म्हटले होते. त्यांचे कष्टाचे पैस हे शा कुटुंबाचे ओरबडून घेतलेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ज्या कुटुंबाचा आदर करत नाही त्या कुटुंबातील सुप्रिया सुळे यांना याबद्दल माहिती दिली. त्यांनी तीस सेकंदात मला कॉल करुन या प्रकरणाची माहिती घेतली आणि माणूस पाठवून या कुटुंबाची दयनीय अवस्था पाहिली, असेही दमानिया यांनी सांगितले.