पोलिसांनी लोकांना समुद्रापासून दूर ठेवावे
मुंबई-मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी पावसामुळे कोणते रस्ते बाधित झाले आहेत त्यांची माहिती घेतली, वाहतूक चालू रहावी, ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावे, जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे तिथे बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी असेही सांगितले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा,मुख्य सचिव सुजाता सौनिक मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, सुधाकर शिंदे आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मनपा कर्मचाऱ्यांनी देखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याबाबत निर्देश दिले. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करावे असेही निर्देश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस.चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी उपस्थित होते.

सततच्या पावसामुळे मुंबईच्या आकाशातील दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही झाला आहे. आतापर्यंत जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्या आहेत. ही सर्व विमाने मुंबईऐवजी अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदौरच्या दिशेने वळवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत विक्रमी पाऊस पडल्याने पाणी साचले आहे. लष्कर, नौदल, हवाई दलाला अलर्ट केले आहे. 60 पंपिंग स्टेशन सुरू झाल्यावर अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. तरीही पाण्याचा निचरा वेगाने होत आहे. सर्व यंत्रणा मिळून काम करत आहोत. मला राजकारण करायचे नाही, सध्या लोकांना मदत करायची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी विनंती केली आहे. तसेच पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या आहेत, व कशाप्रकारे कंट्रोल रुम काम करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत 267 ते 300 मिमी पाऊस पडला आहे. 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अतिवृष्टी समजली जाते. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. चुनाभट्टी आणि सायन येथे पाणी भरले आहे. दुसरीकडे रेल्वेचे 200 आणि BMC चे 481 पंप चालू आहेत. मिलन सब वे मध्ये पाणी साचले नाही कारण तिथे पंप काम करत आहेत. होल्डिंग पॉईंट आणि मायक्रो टनेलिंगमुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रेल्वे प्रशासनाशी सकाळपासून संपर्कात असून कोणत्या लोकल थांबल्या आहेत आणि कोणत्या सुरू आहेत याची माहिती घेतली आहे. आता लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दक्षिण मुंबईत मुसळधार पावसामुळे मरीन ड्राईव्हच्या किनारपट्टीवर लाटा उसळल्या आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन ड्राईव्ह परिसरात जमले आहेत. पोलिसांनी सर्वसामान्य लोकांना समुद्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने हायटाइडची भीती व्यक्त केली जात आहे, परंतु प्रशासन सर्वत्र सज्ज आहे. प्रत्येक ठिकाणी आमची यंत्रणा सज्ज असल्याचे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रेल्वे, पालिका, स्टेट डिजास्टर, एनडीआरएफ ह्या टीम काम करत आहेत. पाण्याचा निचरा वेगाने होत आहे. वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेसवरील ट्राफिक सुरळीत आहे. नवीन मोगरा आणि पोइसर पंपिंग स्टेशन सुरू करत आहेत. मिठी नदीला पंप गेट बसवले आहेत. चौपाट्यांवर नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना गरजेशिवाय घराबाहेर न येण्याची सूचना दिली आहे. शाळांना सुट्टी दिली आहे. सगळी काळजी घेण्यात आली आहे. पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट आहे. स्थानिक यंत्रणा सज्ज आहे. आज राजकारण करण्याचा दिवस नाही, आज लोकांसाठी काम करण्याचा दिवस आहे.