पुणे :पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’ संस्थेच्या ‘हिरवाई महोत्सव’ निमित्त शनिवारी सायंकाळी प्रा. प्र. के. घाणेकर यांचे ‘उत्क्रांतीच्या पाऊलखुणा – पाषाणातील वनस्पती जीवाश्म’ या विषयावर व्याख्यान झाले.जगातील वनस्पतींच्या उत्क्रांतीची माहिती या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थितांना मिळाली.
जीवाश्म विषयी अभ्यास करणारी पॅलिओ बॉटनी शाखेचा, जीवाश्म( फॉसिल) विषयी प्रा. घाणेकर यांनी माहिती दिली. ४ अब्ज ८o कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पोटात जिवाश्म दडले. असे अनेक थर आहेत. त्याकाळातील सजीव आणि वनस्पती अशा थरात अश्मीभूत झालेले आढळतात.त्या त्या काळातील वातावरण, सजीव, वनस्पती आणि भुगोलाबद्दल माहिती मिळते.विल्यम्सन, सिवर्ड,बिरबल साहनी अशा शास्त्रज्ञांच्या कार्याचा परिचय देखिल त्यांनी ओघवत्या शैलीत करुन दिला.शहाबादी फरशीत आढळणारे जिवाश्माप्रमाणे भासणारे नक्शीदार दगड शहाबाद भागात मिळतात. मात्र, ते जिवाश्म नव्हेत, असेही प्रा. घाणेकर यांनी सांगितले.स्वतःच्या संग्रहातील दुर्मीळ जिवाश्मांची देखिल माहिती त्यांनी स्लाईड शो द्वारे करून दिली. भारतातील विविध राज्यातील जिवाश्म आढळणाऱ्या जागांचा परिचय करून दिला.जीविधा ‘च्या वतीने राजीव पंडित, वृंदा पंडित यांनी स्वागत केले.
६ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजता भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात हे व्याख्यान झाले. पर्यावरण प्रेमी पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक देशी वनस्पतींच्या लागवडीत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जीविधा संस्था दरवर्षी ‘हिरवाई महोत्सव’आयोजित करते.या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष आहे.दि. ४ ते ७ जुलै दरम्यान सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत व्याख्याने होत आहेत.७ जुलै रोजी जीविधा संस्थेचा वर्धानपनदिन साजरा केला जाणार आहे.त्या अंतर्गत ‘पुणे विल्डरनेस’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.राजीव पंडित व अनुज खरे यांनी हे पुस्तक संपादित केले आहे. न्या.श्रीराम मोडक ( मुंबई उच्च न्यायालय) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यानिमित्ताने अनुज खरे व राजीव पंडित यांच्या जंगलातील अनुभवांवर आधारीत मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून डॉ.महेश शिंदीकर त्यांच्याशी संवाद साधतील.