पुणे- लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीला वेग येऊ लागला आहे. खुद्द भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही काही दिवसांच्या पूर्वीच कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले होते तर कॉंग्रेसने देखील सर्वच मतदार संघातून इच्छुकांची चाचपणी सुरु केली आहे .हे होत असताना मनसे , वंचित असा प्रवास करत लोकसभा लढवून पराभूत झाल्यावर माजी नगरसेवक वसंत मोरे आता शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्या मार्फत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मोरे आता वंचित कडून लोकसभा लढल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर लढणार कि खडकवासला लढणार अशा स्वरूपाचे प्रश्न निर्माण करणाऱ्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत . दरम्यान सर्व पार्श्वभूमीवर आज ठाकरेंचे कट्टर समर्थक,शिवसेनेचे दिवंगत आमदार सुर्यकांत लोणकर यांच्यानंतर हडपसर, कोंढवा परिसरात शिवसेनेचे प्राबल्य राखून ठेवलेले आणि पुण्याचे माजी उपमहापौर तसेच शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मोठे मार्मिक वक्तव्य केले आहे. अजून मोरे शिवसेनेत आलेच नाहीत , आणि आले आणि लगेच त्यांच्या गळ्यात विधानसभेची माळ घातली गेली असे ठाकरेंच्या शिवसेनेत कधी होत नाही , हडपसर मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समर्थक म्हणूनच शिवसेनेकडून मी एकमेव इच्छुक आहे आणि मीच हडपसर मधून यावेळी विजयी होईल असाही पवित्रा महादेव बाबर यांनी घेतला आहे.
आज महादेव बाबर यांनी तसेच कोथरूड चे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तसेच शिवाजीनगरचे माजी नगरसेवक प्रशांत बधे आणि अनेक शिवसैनिकांनी पुण्याच्या मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी ऑन कॅमेरा बोलताना , शिरूर आणि बारामतीतून शिवसेनेने केलेली मदत लक्षात घेता येथील शिवसेना नेत्यांची भेट घेण्याची इछ्या व्यक्त केली होती त्यानुसार आम्ही भेट घेतल्याचे सांगितले. बारामती आणि शिरूर च्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहभागाबद्दल खुद्द पवार साहेब समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यानंतर मात्र काही माध्यम प्रतिनिधी यांच्याशीच त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी हडपसरच्या आणि कोथरूडच्या विधानसभा मतदार संघाची चर्चा झाल्याचे समजले . सूत्रांच्या म्हणण्यानुसार शरद पवार हेच कोथरूड शिवसेनेसाठी द्यायला तयार आहेत मात्र हडपसर ची प्रतिक्रियाही त्यांनी जाणून घेतली . यावेळी कोणी काल आला आणि आज त्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली असे ठाकरेंच्या शिवसेनेत होत नसल्याचे सांगण्यात आले. बाबर यांना पवार यांनी विचारले तुमची तयारी आहे काय यावर बाबर यांनी आपली तयारी सुरु केलेली आहेच. सर्वांचा पाठिंबाही आहे आणि उद्या हडपसरच्या कन्यादान मंगल कार्यालयात मेळावा देखील आयोजित केल्याची माहिती दिल्याचे वृत्त आहे.