पुणे दिनांक २३ जून—एकम टेबल टेनिस अकादमीतर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात तेजस वासनीकर याने तर मुलींच्या गटात रुचिता दारवटकर हिने अजिंक्यपदावर नाव कोरले आणि आश्चर्यजनक विजयाची नोंद केली.

ग्रॅव्हिटी क्रीडा संकुल, डांगी चौक (पिंपरी चिंचवड परिसर) येथे ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. तेजस याने अंतिम फेरीत ईशान खांडेकर याच्यावर ९-११,११-९,१३-११,११-८ असा विजय नोंदविताना अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला. पहिली गेम गमावल्यानंतर त्याने टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ करीत सामन्यावर नियंत्रण घेतले. ईशान याने उर्वरित तीनही गेम्स मध्ये त्याला चिवट लढत दिली मात्र विजय मिळवण्यात तो अपयशी ठरला. तेजस हा मूळचा नागपूरचा खेळाडू आहे. उपांत्य फेरीत त्याने द्वितीय मानांकित कौस्तुभ गिरगावकर याच्यावर ११-९,११-७,१३-११ अशी सरळ तीन गेम्स मध्ये मात केली होती. ईशान याने उपांत्य फेरीत अग्रमानांकित प्रणव घोलकर याला पराभूत करीत सनसनाटी विजय नोंदविला होता. हा सामना त्याने ५-११,११-७,७-११, ११-९ असा जिंकला होता.
मुलींच्या गटातही अनपेक्षित विजय मिळवित रुचिता विजेती ठरली. द्वितीय मानांकित असलेल्या रुचिताने अंतिम सामन्यात अग्रमानांकित नैशा रेवसकर हिचे आव्हान ११-९,११-८,३-११,११-३ असे परतविण्यात यश मिळविले. तिने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला उपांत्य फेरीत तिने जान्हवी फणसे या तृतीय मानांकित खेळाडूला ९-११,११-९, ११-९, ११-५ असे पराभूत केले होते. ती ओपन स्कूल योजनेअंतर्गत इयत्ता दहावीत शिकत असून तिला सन्मय परांजपे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नैशा हिने उपांत्य फेरीत सई कुलकर्णी हिच्यावर ११-८, ११-८, ११-९ असा सफाईदार विजय मिळविला होता. नैशा हिने या आधी या स्पर्धेतील १९ वर्षाखालील गटात विजेतेपद पटकाविले होते.
पुरुषांच्या दुहेरीत नील मुळ्ये व प्रणव घोलकर ही अग्रमानांकित जोडी विजेती ठरली. त्यांनी अंतिम सामन्यात जय पेंडसे व भार्गव चक्रदेव या द्वितीय मानांकित जोडीचा १४-१२,११-६, १२-१० असा रंगदार लढती नंतर पराभव केला.