पुणे- कॉंग्रस पक्षात कधी काय घडेल ? हे कोणी सांगू शकत नाही. पुण्याच्या लोकसभेचा निकाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिव्हारी लागल्याच्या बातम्या यापूर्वी झळकल्या या पार्श्वभूमीवर नाना यांनी आज पुण्याच्या कॉंग्रेस भवनात जाऊन आढावा बैठक घेतली.पुण्याचे सर्व पदाधिकारी,आजी माजी नेते झाडून या बैठकीला हजर होते. पुणे लोकसभेसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती आणि धंगेकर निवडून येतील याबाबत नेत्यांना मोठा विश्वास होता.या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या बैठकीत सहाही विधानसभा मतदार संघातील प्रमुख नेते,कार्यकर्ते या बैठकीला प्रश्नोत्तरासाठी तयार होते.पण प्रदेशाध्यक्षांनी कोणाला बोलून दिलेच नाही.स्वतःच झाडाझडती सुरु केली आणि तेही त्यांनी.ज्या ज्या कार्यकर्त्यांनी धंगेकर यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्यांचीच हजेरी घेण्यात आल्याचे वृत्त आहे. सहा पैकी अवघ्या तीनच मतदार संघाच्या कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्षांनी संवाद साधला.ते म्हणजे कसबा,शिवाजीनगर आणि पुणे कॅंटोंमेंट विधानसभा मतदार संघ.

सहा पैकी फक्त कॅंटोंमेंट विधानसभा मतदार संघातुनच धंगेकर यांना १५ हजाराचे लीड मिळाले.आणि प्रदेशाध्यक्षांनी इथल्या कार्यकर्त्यांचीच झाडाझडती सर्वाधिक प्रमाणात घेतली. त्यामुळे कार्यकर्ते अचंबित झाले. प्रदेशाध्यक्ष म्हणाले १५ हजाराचे लीड काहीच नाही, याचे अर्थ असे होतात तुम्ही कामच केले नाही.शिवाजीनगर,आणि कसब्यात त्यांनी विचारणा केली.पर्वती,कोथरूड,आणि वडगाव शेरी बाबत प्रदेशाध्यक्षांनी चकार शब्दही काढला नाही.मात्र कॅंटोंमेंट मधील बूथ ना बूथ ची माहिती घेतली आणि तेथील ज्यांनी ज्यांनी काम केले नाही त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी तंबीही दिली. प्रदेशाध्यक्षांनी घेतलेल्या पवित्र्याने ते कुणाला वाचवीत आहेत आणि कुणाचा बळी देऊ पाहत आहेत काय ? असा प्रश्न पडेल अशी संभ्रमावस्था कार्यकर्त्यांची झालेली दिसली.जो कसबा कॉंग्रेसने काबीज केला आणि धंगेकर यांना तिथे आमदार केले त्या कसब्यातून कॉंग्रेसला पिछाडीवर राहावे लागले,कोथरूड,वडगावशेरी सह कॅंटोंमेंट वगळता सर्वच मतदार संघातून कॉंग्रेसची पीछेहाट झाली तेथील स्थितीचा आढावा घेण्याबाबत प्रदेशाध्यक्षांची भूमिका वेगळी ठरल्याने कॉंग्रेसला लीड देऊनही पुढे राहिलेल्या भागातील कार्यकर्त्यांवर अचंबित होण्याची वेळ आलेली दिसली.
