पुणे-कर्तृत्वाचा वारसा फक्त पुरुषच पुढे नेत नसतात, तर संधी दिल्यास महिला देखील कर्तृत्व सिद्ध करून दाखवितात. कर्तृत्वान महिलांची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. अनू आगा या देखील जुन्या काळातले प्रेरणादायी महिला उद्योजकतेचे उदाहरण आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्विनी सन्मान पुरस्कारांची घोषणा केली. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे बालगंधर्व रंगमंदिर येथे वितरण करण्यात आले. यावेळी पद्मश्री अनु आगा, माजी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होत्या. शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू केलेल्या महिला धोरणांची तीन दशके या आढावात्मक पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी मीनाक्षी पाटील, रुक्मिणी नागपुरे, कलावती सवांडकर, संध्या नरे – पवार , श्रद्धा नलमवार, राजश्री गागरे यांचा सन्मान करण्यात आला.
पवार म्हणाले, पुरुषी प्राबल्य असलेल्या उद्योग क्षेत्रात उतरून अनू आगा यांनी थरमॅक्स कंपनी उभारली. त्याची उलाढाल आता 15 हजार कोटी रुपयांची आहे. मी काँग्रेस पक्षात असताना महिलांच्या राजकीय आरक्षणाचे विधेयक मांडले होते. हे विधेयक मांडतानाच माझ्या पक्षाच्या 70 टक्के खासदारांनी सभागृह सोडले होते. तर, एका नेत्याने विधेयक माझ्यासमोर फाडले होते. मात्र हेच विधेयक आता मंजूर झाले असून, त्याची अमंलबजावणी 2029 ला करण्याचे सांगण्यात येत आहे. याची अमंलबजावणी झाल्यास 30 वर्षांपूर्वी आणलेल्या महिला धोरणाचा आनंद होईल, असे ते म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांचा वर्षभर सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा वर्षभर महिला सन्मान होणे गरजेचे आहे. महिला आणि पुरुष वाद करणे चुकीचे आहे. समान अधिकार भावना ही शिक्षणातून येत असते. अनु आगा आणि वंदना चव्हाण यांनी संसदेत कर्तृत्ववान काम केले आहे. अनेक पिढ्या त्यांचे कामाची दखल घेतली जाईल.पुण्या सारख्या शहरात पर्यावरण आणि पाणी समस्या गंभीर होत आहे. याबाबत राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे. शरद पवार यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. 30 वर्षात महिला आरक्षण मुळे झालेले बदल आणि महिलांना पुढील नेतृत्व संधी याबाबत लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे. डार्क नेट मुळे एखाद्या गोष्टीचा सोर्स कळत नाही. डीप फेकच्या द्वारे अपप्रचार केला जातो. यामुळे अनेक जणांना फसवणूक होऊ शकते. ऑनलाईन व्यवहार मागे तंत्रज्ञान प्रशिक्षण गरजेचे आहे. धोरण हे तंत्रज्ञान सोबत बदलले गेले पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.