पुणे-10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस (आयडीवाय) आज संपूर्ण मुंबईत मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. विविध संस्थांद्वारे योग प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, त्यापैकी शहरातील अनेक नावाजलेल्या ठिकाणी नामवंत व्यक्तींच्या नेतृत्वाखाली यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या नेतृत्वात राजभवन येथे योग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यात राजभवन, तटरक्षक दल आणि पत्र सूचना कार्यालयाचे अधिकारी सहभागी झाले होते. राजभवन येथील योग सत्र ‘कैवल्यधाम’ योग संस्था आणि श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर (एसआरएमडी – योग) यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे योग सत्राचे नेतृत्व केले. पतंजली योगपीठाच्या सहयोगातून मुंबई पोर्ट ट्रस्ट, इंडिया टुरिझम-मुंबई आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने आयोजित केलेल्या सामूहिक योग प्रात्यक्षिकात तीन हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. युवा टुरिझम क्लब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागपुरातील धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे कांदिवली पश्चिम येथील पोनसूर जिमखाना येथे योग सत्रात सहभागी झाले होते.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) या त्यांच्या विलेपार्ले येथील मुख्य कार्यालयात योगाचार्य प्रभा शेट्टी आणि गायत्री यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्राचे आयोजन केले होते.
आयआयटी बॉम्बेने आज त्यांच्या पवई येथील संकुलात आयोजित केलेल्या 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहोळ्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आखलेले विविध उपक्रम राबवले. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि कुटुंबीयांनी यात भरभरून सहभाग नोंदवला, ज्याद्वारे निरोगी आणि संतुलित जीवनशैलीला चालना देण्यात आली.
आयआयएम मुंबईने पवई येथील त्यांच्या संकुलात स्वामी विवेकानंद सभागृहात 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. संस्थेने त्यांच्या संकेतस्थळावर योगाशी संबंधित माहिती आणि लिंक्स अपलोड केल्या आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) मुंबई मंडळाच्या विविध केंद्रीय संरक्षित स्मारकांमध्ये आज सकाळी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. एएसआय ने, इंडिया टुरिझम आणि केंद्रीय विद्यालय संघटनेच्या सहयोगातून ठाण्यातील अंबरनाथ मंदिर, मुंबईतील कान्हेरी लेणी, तसेच कार्ले-भाजे-पाताळेश्वर लेणी आणि आगाखान पॅलेस पुणे येथील स्मारकांच्या परिसरात आयडीवाय साजरा केला.
सायन फोर्ट येथील एएसआय मुंबई मंडळ कार्यालयात हा कार्यक्रम पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. टी. श्रीलख्मी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. मुंबईतील बोरिवली येथील कान्हेरी लेणी येथे प्रमाणित योग आणि निसर्गोपचार तज्ञ शुभांगी काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रात्यक्षिक व सराव करण्यात आला.
पुण्यातील आगा खान पॅलेस मध्ये प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ, पुणे आणि एनसीसी पुणेचे 50 एनसीसी कॅडेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व अभ्यागतांसाठी योगाची व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यातील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यापीठ मधील भगिनींनी पाताळेश्वर लेणी येथेही योग साधना केली. मुसळधार पाऊस असूनही, एएसआय मुंबई मंडळाच्या विविध स्थळी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
मुंबई-मुख्यालय असलेल्या भारतीय नौदल, पश्चिम नौदल कमांडमधील 9000 हून अधिक नौदल कर्मचारी, नागरिक आणि कुटुंबातील सदस्यांनी 10 व्या योग दिनात सहभाग नोंदवला.
देशव्यापी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. या घोषणेसह जगाने योग ही प्राचीन भारतीय परंपरेची एक अमूल्य देणगी आहे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवण्याचे सर्वात विश्वसनीय साधन असल्याचा स्वीकार केला.
यावर्षी, आयुष मंत्रालयाने “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” ही संकल्पना ठेवली आहे. प्रत्येकाची निरामयता वाढवण्यासाठी आणि निरोगी समाजासाठी योगदान देण्यासाठी या वर्षीचे लक्ष योगाच्या परिवर्तनीय शक्तीवर आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या (MSJ&E) दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण (DEPWD) विभागांतर्गत एक स्वायत्त राष्ट्रीय संस्था असलेल्या मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) [AYINISHD(D)) ने “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिवस सोहोळ्यात मोठ्या उत्साहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक कल्याण समाविष्ट असलेल्या योगाच्या बहुआयामी फायद्यांवर ही सत्रे केंद्रित होती. सहभागींना, विशेषत: विशेष गरजा असलेल्या मुलांना तज्ज्ञांकडून वैयक्तिकृत मार्गदर्शन लाभले. प्रात्यक्षिक केलेले योग प्रकार आणि दिनचर्या त्यांच्या दैनंदिन आरोग्य पद्धती सुधारण्यासाठी तयार करण्यात आली होती, ज्याचा उद्देश त्यांच्या एकूण जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारणे हा आहे.
होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (एचबीसीएसई), टीआयएफआर मधील योग दिनाच्या कार्यक्रमात योग प्रशिक्षक डॉ. ईशा तळवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आणि दिनचर्येत सहज करता येतील अशी योग तंत्र शिकण्यास उत्सुक असलेल्या एचबीसीएसई कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि निरोगी, तणावमुक्त जीवनशैलीला चालना देण्यासाठी फायदेशीर असलेल्या व्यायामाची ओळख करून देण्यावर सत्राचा भर होता.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा आणि पश्चिम रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष क्षमा मिश्रा यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह मुंबईतील बधवार पार्क येथील उत्सव हॉल मध्ये पश्चिम रेल्वेने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहोळ्यात भाग घेतला. या सत्राने वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणासाठी योगाची दुहेरी भूमिका अधोरेखित केली. पश्चिम रेल्वेवरील सर्व सहा विभागांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पश्चिम रेल्वेमार्फत सोशल मीडिया हँडलद्वारे माहितीपूर्ण आणि आकर्षक वेब कार्डे पोस्ट करण्यात आली होती ज्यायोगे योगाचे फायदे आणि योगाने जग कसे एकत्र आणले आहे, जागतिक मूल्ये कशी बदलली आहेत आणि विविध आरोग्य सेवा प्रणालींना कसे निगडित केले आहे याबाबत अवगत करण्यात आले.
आज मुंबईतील सीएसएमटी सभागृहात मध्य रेल्वेने योग सत्राचे आयोजन केले होते, यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, मध्य रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष चित्रा यादव आणि इतर मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या सत्रात सहभागी झाले होते ज्यात संतुलित जीवनशैलीसाठी नियमित योगाच्या परिवर्तनीय शक्तीवर भर देण्यात आला होता.