ओबीसी 70 वर्षांपासून बोगस आरक्षण खात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आज गरीब लोकांना आरक्षण मिळत आहे तर त्यांना वाईट वाटत आहे. त्यांचे विचार उघड पडले असल्याची टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मंडल आयोग रद्द होते आणि त्याला चॅलेंज देखील होते. जातीयवाद कसा असतो ते ओबीसी नेत्यांकडून पाहायला मिळत असल्याचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाबद्दल त्यांची नियत काय आहे ते दिसले असल्याचेही जरांगे म्हणाले. प्रा. लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.
ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, मला ओबीसी लोकांचे वाटोळे करायचे नाही. मात्र, हाकेंच्या मागणीवर ओबीसी नेते गप्प का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. आता मराठा नेत्यांवर टीका करणे कमी करा, असे आवाहन देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
ओबीसी आंदोलक हे आमचे विरोधकच नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तो येवलावाला काड्या करत असून हाकेंना भुजबळांनीच उभे केले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा देखील जरांगे यांनी छगन भुजबळ यांना नाव घेता दिला आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळ सगळे पुरवत आहेत. ओबीसी आंदोलन भुजबळांनीच उभे केले असून मी हाकेंना दोषच देत नाही तर यामागे भुजबळच असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. जातीयवाद मी नाही तर येवलावाल्याने सुरु केलाय, अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे.