केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया
पुणे :शहराच्या 1987 च्या विकास आराखड्यात एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. राज्यातील महायुती आघाडी सरकारने आज या प्रकल्पाला मान्यता दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
भाजपने नेहमीच विकासाला आणि पुणेकरांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. एचसीएमटीआर रस्ता पुणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे. युती सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता मिळावी यासाठी अनेक बैठका सुध्दा घेतल्या, प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच या प्रकल्पाच्या प्रस्तावाला आज राज्य सरकारने मान्यता दिली. त्यावर पुणेकरांच्या सुचना आणि हरकती मागविण्यात आल्या असून त्याचा विचार करूनच प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे शहराचा महापौर असताना हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केले. रस्त्याचे नियोजन आणि आखणी व्यवस्थित पध्दतीने व्हावी यासाठी काही बदल सुचविण्यात आले आहेत. यामुळे रस्ता करत असताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. राज्य शासनाने या बदलांना मान्यता दिली असून, आता रस्त्याच्या आखणी मधील सर्व अडथळे दूर झाले आहेत. लवकरच या रस्त्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील उपनगरांना जोडणारा एचसीएमटीआर रस्ता आवश्यक आहे. तो वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा मी करीन अशी ग्वाही देतो.