पाच वर्षांपूर्वीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरु;भूजल पातळीही वाढणार
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे-
दरवर्षी पावसाळयात रस्तेच काय शहराचे विविध भाग जलमय होत असल्याने पुणेकरांचे होणारे हाल आणि त्यावरून राजकीय पक्षांकडून होणाऱ्या आंदोलनाला सामोरे जाणाऱ्या पालिका प्रशासनाला आता ‘बोअर होल्स ‘च्या उपायामुळे दिलासा मिळणार आहे.माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पाच वर्षांपूर्वी सुचविलेल्या या उपायाची अंमलबजावणी आता प्रशासनाने सुरु केली असून त्यानुसार शहरात विविध ठिकाणी सुमारे दहा हजार ‘बोअर होल्स’ घेण्यास सुरुवातही केल्याने आगामी काळात शहर पावसाच्या पाण्याने तुंबणार नाही असा आशावाद प्रशासकीय पातळीवरून व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईवर खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात शहराचे विविध भाग जलमय आणि वाहतुकीची कोंडी हे चित्र पुणेकरांसाठी चिंताजनक बनले आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाच वर्षांपूर्वी दिलेल्या पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्यासाठी स्वतंत्र ‘सोक पिट’ तयार करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करा आणि पुणेकरांना दिलासा द्या अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेऊन केली होती. त्यानुसार आयुक्तांनी तातडीने दखल घेत ,कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार शहरात ज्या ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठयाप्रमाणावर साचते अशा ठिकाणी पावसाळी चेंबरमध्ये बोअर होल्स घेऊन त्याठिकाणी स्वतंत्र ‘सोक पिट’ तयार करण्याच्या कामास प्रारंभही झाला आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढत आहे. पहिल्याच पावसात काय पावसाळ्यातही रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी परिस्थिती चिंताजनक बनत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी दरवर्षी खर्च करूनही नालेसफाई सक्षमपणे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. मुळात ‘स्टॉर्म वॉटर लाईन’ मध्ये कचरा अडकल्याने तसेच काही ठिकाणी या वाहिनीचे काम अर्धवट झाल्याने पावसाचे पाणी नदीत वाहून जाण्यास अडथळा ठरत असल्याने शहराचे विविध भाग जलमय होत असल्याची वस्तुस्थिती आहे. संपूर्ण शहरात सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते साकारले आहेत आणि फुटपाथही सिमेंट ब्लॉकचे आहे मग पावसाळयात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे ? याकडे दुर्लक्ष होत असल्याने मे २०१९ मध्ये हा प्रस्ताव पालिका प्रशासनाला दिला होता. मुख्यत्वे पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीसाठा वाढेल आणि पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर साचणार नाही असा उद्देश त्यामागे होता. पावसाळी वाहिनीला रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड देऊन त्यासाठी स्वतंत्र ‘पिट’ तयार करण्याचा हा प्रस्ताव होता शिवाय त्याचा आराखडाही तयार केलेला आहे.त्यामुळे नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रस्तावाचे महत्व लक्षात आणून दिले. दरवर्षी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कायमस्वरूपी आळा बसेल ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानुसार आयुक्तांनी तातडीने शहरात दहा हजार बोअर होल्स घेऊन पावसाळी चेंबरमध्ये सुरक्षित ‘सोक पिट’ निर्माण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याने आता खऱ्या अर्थाने हा सुचवलेला उपाय पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणार तर आहेच शिवाय भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार आहे. याच पाण्याचा वापर नंतर बांधकामे, उद्याने यासाठी निश्चित होणार असून त्यामुळे २ ते ३ टीएमसी पिण्याच्या पाण्याची बचतही होईल असा ठाम विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.