बारामतीत पराभूत झालेल्या सुनेत्रांना राज्यसभा देऊन भाजप निष्ठावंतांना दुखावले
बारामतीतले एकाच घरातले ३ खासदार होऊ शकतात तर पुण्यातील भाजपचे ३ खासदार का नाही होऊ शकत ?
भाजपने तळागाळातील,आयुष्य आणि पिढ्या न पिढ्या भाजपला वाहिलेल्या स्वकार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. पुणे- प्रथमच लोकसभा लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा बारामतीतून नणंद सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाल्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर झालेल्या निवडणुकीतील या नामुष्कीने अजितदादांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे झाले. मात्र ९ दिवसांत दादांनी कसर भरून काढली. प्रफुल्ल पटेलांच्या राजीनाम्याने रिक्त राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत दादांनी सुनेत्रा यांना खासदार करून दाखवले. आमदारांच्या मतदानाद्वारे ही निवडणूक होणार होती. युतीकडे २८८ पैकी २०० आमदार असल्याने विरोधकांनी अर्जच भरला नाही व सुनेत्रा बिनविरोध विजयी झाल्या. त्यांचा कार्यकाळ उर्वरित ४ वर्षे असेल.दरम्यान पुण्यातील भाजपा निष्ठावंत मात्र यामुळे नाराज झाल्याचे चित्र आहे. बापटांनी आयुष्य भाजपला वाहिले त्यांना मंत्रिपद दिले नाहीच पण त्यांच्यानंतर त्यांच्या सुनेने देखील भाजपची निष्ठा मान्य करून पंतप्रधान यांच्या सभेचे सूत्रसंचालन केले मोहोळ यांच्या विजयासाठी कसबा विधानसभेतून धंगेकर यांना मागे टाकून लीड मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला . कधीही आपली नाराजी वा पक्षाच्या निर्णयाबद्दल चाकर शब्द न काढता बापट कुटुंबाने भाजपच्या निष्ठेची परंपरा पुढे नेली . आता राज्यसभेवर सुनेत्रांना घेऊन अजितदादांना शरद पवार व सुप्रिया सुळेंच्या नाकावर टिच्चून सुनेत्रांना खासदार बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी इतर कुणाचाही विचार न करता बायकोच्याच नावावर शिक्कामोर्तब केले.यात मात्र भाजपने स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष का केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवारांच्या घरात ३ खासदार झालेत तेच पुण्यात भाजपचे ३ खासदार झाले असते तर काय बिघडले असते ? असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय .
दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात मोदींनी शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित गट) यांच्यासाठी दोन स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद ठेवले होते. शिंदेसेनेने या पदावर प्रताप जाधव यांची वर्णी लावली, मात्र अजितदादा गटाने ते नाकारले. कारण राष्ट्रवादीतून मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे केले होते. पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे त्यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण मान्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. राज्यसभा व लोकसभेत एकच खासदार असल्याने भाजपही त्यांना कॅबिनेट देण्यास तयार नाही. आता राष्ट्रवादीचे राज्यसभेत दोन खासदार झाले. उदयनराजेंच्या जागेवरही राष्ट्रवादीलाच संधी मिळणार आहे. तोपर्यंत थांबून ४ खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रिपदासाठी दावा करेल असे सांगण्यात येते आहे.मोहोळाना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले असले तरीही, मेधा कुलकर्णी खासदार असल्या तरीही अजितदादांचे हाथ बळकट करता करता भाजपने तळागाळातील ,आयुष्य आणि पिढ्या न पिढ्या भाजपला वाहिलेल्या स्व कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.