महाबळेश्वर: कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर अगरवाल कुटुंबियांच्या संबंधित कारवाया सुरु आहेत. विशाल अगरवाल यांचे महाबळेश्वर येथे देखील हॉटेल असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान काल या हॉटेलमधील अनधिकृत बार सील करण्यात आला होता.
येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यात अगरवाल यांनी पारशी जिमखाना या ट्रस्टकडे रहिवास कारणासाठी असलेली शासकीय मिळकत स्वतःकडे घेतली. या ट्रस्ट वर असलेले यांचे नाव वगळून स्वतःच्या घरातील नावे ट्रस्टी म्हणून घेतली. त्यानंतर या मिळकतीमध्ये तारांकित हॉटेल बांधले. याठिकाणी विनापरवाना मोठे बांधकाम केले.शनिवारी सकाळी साडे सात वाजता प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पालिकेच्या पथकाने या हॉटेलवर धडक मारली. हॉटेलवर कारवाई करण्यासाठी पथक येताच हॉटेल व्यवस्थापनाने हॉटेल मधील सर्व पर्यटकांच्या ताब्यात असलेल्या खोल्या खाली करण्यास प्रारंभ केला.सकाळी साडे नऊ वाजता हॉटेल मधील खोल्या सील करण्याची कारवाई पथकाकडुन सुरू करण्यात आली.
या पथकाने हॉटेल मधील ३२ खोल्या, ८ कॉटेज, स्पा, जीम, रेस्टॉरट, किचन, स्वागतकक्ष, स्टाफ रूम स्टोअर रूम अशा
४८ खोल्यांना सील ठोकले.कारवाई केल्यानंतर महसूल विभागाच्या वतीने या कारवाईचा पंचनामा करण्यात आला. शेवटी हॉटेलचे गेट सिल करून कारवाई पूर्ण केली.