पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांच्यानंतर आता आई शिवाणी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा शिवानी अग्रवालवर आरोप आहे. आज त्यांची चौकशी केली जाणार आहेत. त्यामुळे चौकशीतून आणखी काही नवीन माहिती समोर येते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. मात्र अखेर पोलिसांनी त्यांना शोधून काढले आहे आणि ताब्यात घेतले आहे. आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच ससूनच्या दोन डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकले. त्याच्या जागी त्यांनी त्याची आई शिवानी अग्रवाल हिचे रक्ताचे नमुने घेतले होते. या प्रकरणात डॉक्टरांनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच घेतली होती. यानंतर पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली होती.