पुणे- बेकायदा , कुचकामी होर्डींग्ज प्रकरणी निव्वळ होर्डींग्ज मालकावर जबाबदारी ढकलून चालणार नाही तर त्याला उत्तेजित करणाऱ्या किंवा त्याला साथ देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला देखील दोषी मानून शिक्षा झाली पाहिजे अशी ठोस भूमिका महापालिका आयुक्तांनी राबविली पाहिजे असे ठाम मत पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्र देऊन महापालिका आयुक्ताकडे व्यक्त केले आहे.
काय म्हटले आहे मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात ते त्यांच्याच शब्दात वाचा ….
मा. आयुक्त,
पुणे महानगरपालिका,
महोदय,
घाटकोपर मधील होर्डिंग पडून अनेकांचे प्राण गमवल्याची घटना ताजी असतानाच, मोशी येथील होर्डिंग पडल्याची घटना व पुणे येथे पुणे-सोलापूर रस्त्याच्याकडेला होर्डिंग पडून घोडा मृत झाल्याची घटना घडली आहे. यातून नागरिकांच्या मनात प्रशासनाबद्दल राग व अविश्वासाहर्ता निर्माण झाली आहे. पुणे येथील रेल्वे स्टेशन परिसरातील घटना ही याच पार्श्वभूमीवर स्मरणात आहेत.
(या संदर्भाने काही मुद्दे व प्रश्न उपस्थित करीत आहे. ज्या विषयी खुलासा अपेक्षित आहे.)
- जाहिरात व फलक नियंत्रण नियम 2022 , इतर सर्व नियम, आदेश, संलेख यांच्यानुसार आकाशचिन्ह व जाहिरातींचे जे नियम आहेत त्यात,
i) इमारतींच्या प्रकारावर/ गच्चीवर जाहिरातींची उंची 20 फुटांपेक्षा अधिक असू नये.
ii) रस्त्याच्या पृष्ठभागावर 40 फुटपेक्षा अधिक उंचीचे फलक उभारले जाऊ नयेत. ज्यात 10 फुट किमान अंतर तलीय सूट व 30 फुट जाहिरात धरून 40 फुट एकूण उंची होईल.
असे नियम असतानाही हे नियम धाब्यावर बसवून फलक लावण्यात आलेले असताना परवानगी कोणी दिली याचा खुलासा व्हावा. - तसेच पुणे येथील रेल्वे स्थानकाजवळील होर्डिंग दुर्घटनेच्या वेळी अनधिकृत फलकांची संख्या 85 सांगितली होती. (प्रत्यक्षात ती खूप असल्याचे दिसते.) पण हे गृहीत धरले तरी 85 हाच आकडा आजही सांगत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षात एकही अनधिकृत होर्डिंगवर कारवाई झाली नाही. या कारणांचा खुलासा व्हावा.
3.मनपाच्या दारातील PMPML च्या फलकाला ठिकाण निश्चित करण्याआधी ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच PMPML चे बहूतेक होर्डींग बेकायदेशीरपणे उभारलेली आहेत का ? असतील तर का? आणि त्यावर कारवाई कधी होणार याचा खुलासा व्हावा. - पुणे शहरातील होर्डिंग्ज लावताना होर्डिंग धारक स्वत:च स्टक्चरल गॅरेंटी देतो व तसा Report पुणे मनपाला देतो जो ग्राह्य धरून परवानगी दिली जाते. ही बाब हास्यास्पद आहे. पुणे मनपाकडे या होर्डिंग्जच्या Structural Audit करण्याची स्वत:ची यंत्रणा हवीच व ती खात्री प्रशासनाला झाल्याशिवाय होर्डिंग्जला परवानगी देऊ नये.
- पुणे शहरात एकूण 3000/3500 फलक आहेत. असे पुणे मनपा सांगते. प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये त्यांच्या भागातील होर्डिंग बाबतचे सर्वे करण्याचे काम देऊन ते आठवड्यात पूर्ण करण्यास सांगावे.
- सदर सर्व प्रकरणात जसे होर्डिंग मालक जबाबदार आहेत तसे पुणे मनपा प्रशासनही जबाबदार आहेच. तरी सदोष मनुष्यवधाचा व सदोष प्राणीवधाचा गुन्हा, वित्तहानी इ. गुन्हे दाखल करून सदर अधिकाऱ्यांना कठोर शासन करावे, अशी आग्रही मागणी करीत आहे.