पुणे- महानगरपालिकेत चांगल्या पदावर नाेकरी लावून देताे असे अमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 21 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुल सतीश कुलकर्णी (रा.सहकारनगर, पुणे) या आराेपीवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंद्रकांत गणपत पवार (रा.वडगाव बुद्रुक,पुणे) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार1/7/2014 ते 1/12/2023 यादरम्यान घडलेला आहे. तक्रारदार चंद्रकांत पवार यांना त्यांचा भाऊ राहुल पवार यास पुणे महानगरपालिकेत नाेकरी लावून देताे असे खाेटे अमिष आराेपी राहुल कुलकर्णी याने दाखवले. त्याकरिता त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये चेक स्वरुपात तर 13 लाख 50 हजार रुपये राेख स्वरुपात असे एकूण 21 लाख रुपये वेळाेवेळी घेण्यात आले.मात्र, तक्रारदार यांचे भावाला महानगरपालिकेत नाेकरी लावून न देता तसेच त्यास पैसे परत करण्यात आले नाही. तक्रारदार यांनी पैशाबाबत तसेच नाेकरी संर्दभात विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन तसेच घेतलेले पैसे परत न करता आराेपी याने सेक्युरीटी म्हणून दिलेले त्यांच्या बँकेचे चेक देखील बँकेत भरुन न देता फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर करत आहे.