एमआयटी डब्ल्यूपीयूत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना
पुणे,दि.२७ नोव्हेंबर:”खरा भारत कोणता या प्रश्नाचे उत्तर समाजाच्या मुख्य चार स्तंभ मधून मिळू शकते. तत्त्वमसी, एकांतवास, विविधता आणि संस्कृती. या स्तंभाभोवती माणूस फिरत असतो. पण ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की भारतीयांनी आज सरस्वती मातेची हत्या केली आहे. हीच तर देशाची खरी फाळणी आहे.” असे विचार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, डॉ. मुकेश शर्मा व डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
विवेक अग्निहोत्री म्हणाले,” एकीकडे संपूर्ण जग योगाबद्दल बोलत आहे आणि दुसरीकडे आम्ही पतंजलीवर विचार ही करत नाही. आपण सभ्यतेचा आधारस्तंभ पाडला आहे. अशा वेळी तत्त्वमसी चा आधारस्तंभ च आपल्याला वाचवू शकतो. हिंदू विचारसरणी अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते. पण आजचे विद्यार्थी विद्येची देवता सरस्वती मातेला विसरली आहेत.”
“पाश्चिमात्य देशांनी प्रत्येक क्षणी नवीन संशोधनावर भर दिला आहे. तर देशातील ऋषीमुनींनी मनावर संशोधन केले आहे. त्याग, तपश्चर्या आणि सर्मपणामुळे हा देश भरभराटीला आला आहे. पाश्चात्य संस्कृती वरचढ होत असल्याने देशात फाळणीची परिस्थिती निर्माण होत आहे. आजच्या तरूणांच्या मनावर बॉलिवूड अफू सारखे वावरत आहे. ज्याने सभ्यतेचा आधारस्तंभ खाली आणला आहे. जग विज्ञानाने चालवले जाते पण जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते आणि भारत भूमीने हे अध्यात्म संपूर्ण जगाला दिले आहे. तसेच समाजाचे तीन स्तंभ पडल्यावर केवल तत्त्वमसी स्तंभच जीवनदायी राहील.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रख्यात हदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी बदत्या जीवनशैलीमुळे हदयरुग्णांची संख्या कशी वाढत आहे. याकडे लक्ष वेधले. दैनंदिन व्यायाम, धावणे, पोहणे आणि विश्रांती घेणे याबद्दल ते बोलले. तसेच वैद्यकीय कीट घरात ठेण्याचा सल्ला ही दिला.
अभिनेते आणि कुलगुरू गजेंद्र चौहान यांनी महाभारत मालिकेच्या निर्मितीमागील कथा सांगितली. या मालिकेमुळे दूरदर्शनला २०० कोटींचा नफा झाला होता. महाभारत ही देशातील एकमात्र मालिका आहे जी बीबीसीने ६ वेळा प्रदर्शित केली आहे. यानंतर दूरदर्शनचे माजी महासंचालक डॉ. मुकेश शर्मा यांनी जीवन जगण्याचे नाव या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

