मुंबई-नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठे ‘राजकीय युद्ध’ सुरू झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) बाहेर काढल्याने खळबळ उडाली असली, तरी “विरोधकांना न मिळणारी गोपनीय माहिती दमानियांपर्यंत पोहोचतेच कशी? आणि या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव का नाही?” असा टोकदार सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले.
सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. अंजली दमानियांनी खरातचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले ही चांगली गोष्ट आहे. पण ही गुप्त माहिती त्यांना पुरवतंय कोण? असा सवाल अंधारे यांनी केला. दमानिया म्हणतात की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला १७ कॉल केले होते. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे. मात्र, ज्यांनी खरातच्या ‘इशान्येश्वर’ मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आणि १ कोटींचा निधी मंजूर केला, त्यांच्या कॉलचा रेकॉर्ड का समोर आला नाही? या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नसणे ही मोठी ‘गडबड’ वाटते,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
अशोक खरातच्या संपत्तीची आणि त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या एसआयटीकडून (SIT) अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर का आली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिले होते, मग अद्याप गमे, आवारे आणि पोफळे यांना ताब्यात का घेण्यात आले नाही? एसआरए खात्यातील अधिकारी भांडे तिथे काय करत होते? सरकारला हे प्रकरण तडीला न्यायचे आहे की फक्त काही लोकांना राजकीयदृष्ट्या ‘डॅमेज’ करायचे आहे?” असा घणाघात अंधारे यांनी केला

