पुणे-निवडणूक लढविताना भाजपने पुणेकरांना मुंबईप्रमाणे ५०० चौरस फुटाच्या घराला मिळकत कर लावणार नाही,अशी कर माफी दिली आणि आता २६ -२७ या वर्षाचा पहिलाच अर्थ संकल्प सादर करताना पुणेकरांची त्यांनी बनवा बनवि केल्याचे स्पष्ट झाले आहे.घर महिलांच्या नावावर हवे आणि तेही ५०० चौरस फुट तरीही त्याला पूर्ण करमाफी नाही तर करात ५० टक्के सवलत द्यायची अशी बनवा बनवी करणारे आणि पुणेकरांची शुध्द फसवणूक करणारे धोरण भाजपने अवलंबल्याचे स्पष्ट झाले असून विरोधी पक्षनेत्यांनी यास विरोध करून भाजपाला तर जाहीरनाम्यातील या आश्वासनाची आठवण करून द्यायलाच हवी अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पक्षाचे गटनेते ॲड.रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी आज महापालिकेचे अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर झाल्यावर व्यक्त केली आहे. ते म्हणाले,अर्थ संकल्पाची पुस्तके आताच मिळालीत यातून हे स्पष्ट झाले आहे अजूनही काही बाबींचा आम्ही अभ्यास,वाचन करत आहोत.भाजपची बनवा बनवी आम्ही जनतेसमोर आणून त्यांना उघडे पाडू
चंदूशेठ कदम म्हणाले कि,’ महानगरपालिकेचे सादर केलेले बजेट पाहिल्यानंतर असे वाटते की हे बजेट पुणेकरांसाठी नसून फक्त कागदावरचा विकास दाखवण्यासाठी तयार केलेले आहे. हे बजेट पूर्णपणे भ्रम निरास करणारे आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी बजेट सादर करताना केवळ फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे, पण विकासाचा एक थेंबही पुणेकरांना मिळालेला नाही. प्रत्येक वर्षी तेच आश्वासन,तेच आकडे आणि तेच अपयश हीच या बजेटची ओळख बनली आहे. विकासकामांचा २५% देखील अर्थसंकल्प प्रत्यक्षात वास्तवास येणार नाही.पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात सरसकट ५०० स्क़ेअर फुटाच्या आतील घरांना करमाफी देण्याची घोषणा केली होती परंतु या घोषणेपासून पळवाट काढत फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५०० स्क़ेअर फुट आतील घरांना ५० % करमाफी देत आहात. यातून भाजपची एकंदरीत जाहीरनाम्यातील शब्द न पाळल्याचे दिसून येत आहे.

