मुंबई-जनतेच्या प्रेरणेने चालणारा कार्यकर्ता केव्हाच पळून जात नाही. तो कायम लढत असतो. संघर्ष करत असतो. मी स्वतः या लोकांच्या प्रेरणेने चालणारा माणूस आहे. मला जे विचारले जाईल त्याला मी सहकार्य करेन. पण मी पळून जाणार नाही हे नक्की. मला यश मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहीन यात कोणतीही शंका नाही, असेही रोहित पवार यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.बारामती अॅग्रोमील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी होते आहे. या चौकशीसाठी ते ईडीच्या कार्यालयात दाखल झालेत. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना आपण पळून जाणाऱ्यांपैकी नसल्याचे नमूद करत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारांनी यावेळी त्यांना तुम्हाला चौकशीच्या नावाखाली केवळ बसवूनच ठेवण्यात आल्यास काय करणार? असा प्रश्न केला असता त्यांनी मी तिथेच बसून सरकारविरोधात पुढील रणनीती आखेल, असे सडेतोड प्रत्युत्तर दिले.
रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मी माझ्यावरील आरोपांची सर्व प्रकारची माहिती सीआयडी, ईओडब्ल्यू व ईडीला दिली आहे. त्यांनी पुन्हा तीच माहिती मागितली आहे. त्यामुळे मी पुन्हा ती माहिती घेऊन ईडी कार्यालयात जात आहे. चौकशीत काय होईल? याची मानसिक तयारी करण्याची गरज मला नाही. त्यांच्या कार्यालयात त्यांच्यानुसारच कारवाई होणार हे मला माहिती आहे. चूक केलीच नाही तर घाबरण्याचे काहीही कारण नाही.
यावेळी पत्रकारांनी त्यांना ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यासंबंधीचा प्रश्न केला. त्यावर रोहित पवार म्हणाले की, तपास अधिकाऱ्यांनी मला केवळ कार्यालयात बसवून ठेवले, तर मला मोकळा वेळ मिळेल. त्या वेळेत मी सरकारविरोधात कशापद्धतीने रणनीती आखायची याचा विचार करेल. चौकशी संपल्यानंतर मी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीच्या मार्गाने लढण्यासाठी मी कायम तत्पर असेन.
तपास अधिकारी त्यांचे काम करतात. त्यांनी आतापर्यंत माझ्याकडून जी – जी माहिती मागवली ती मी दिली. आज मला येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी तिथे जाऊन पुन्हा एकदा त्यांना यासंबंधीची माहिती देईल. त्यांच्याशी चर्चा करेन. अधिकारी त्यांचे काम करत आहेत. त्यांच्यामागील विचार व शक्तीवर मी भाष्य करणार नाही. लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असे समजले की, मी काढलेली युवासंघर्ष यात्रा व सरकारविरोधात उठवलेल्या आवाजामुळे ही कारवाई झाली आहे, असेही रोहित पवार यावेळी राज्य सरकारला धारेवर धरताना म्हणाले.