पुणे :गाड्यांची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करणार्या तरुणाचे आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करुन विवस्त्र करुन टोळक्याने मारहाण केली. पिस्तुलातून त्याच्यावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येवलेवाडी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आयुष कामठे, अभि म्हस्के, अभि पाटील (वय २८), मंगेश माने (वय २५), कौशल उर्फ ऋषी मोरे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली होती. याबाबत कोंढव्यातील ३१ वर्षाच्या तरुणाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपींपैकी एकाची गाडी विक्री करण्यासाठी घेतली होती. या गाडीला अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई देतो, असे फिर्यादी तरुणाने सांगितले होते. परंतु, त्यांनी भरपाई दिली नाही़ या कारणावरुन टोळक्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांना एका गाडीमध्ये जबरदस्तीने बसवुन गोकुळनगर येथील मोकळ्या मैदानात नेले. तिथे फिर्यादी तरुणाचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करण्यात आले.
त्यांना पुन्हा लाकडी दांडके व लाकडी फळीने मारहाण केली. त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर मंगेश माने याने गाडीतील पिस्टल बाहेर काढून त्यांच्या दिशेने गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने ही घटना कोणाला सांगितली नाही. त्यानंतर रविवारी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करीत आहेत.

