मुंबई, दि. ६ ऑक्टोबर २०२५ —
मुंबईतील तृतीयपंथी समुदायाच्या राष्ट्रीय नेत्या आणि किन्नर मॉं संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सलमा खान यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे आणि वस्तू व सेवा कर विभागाचे विशेष आयुक्त नितीन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सन्मानाने तृतीयपंथी समुदायाच्या कार्यकर्त्यांच्या समाजातील योगदानाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
या सन्मान सोहळ्यात राज्यातील विविध भागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये कोल्हापूर येथील सुशीला ओडेयर, सांगली येथील चेलनादेवी खुरपे, पुणे येथील अरुण रोडे, छत्रपती संभाजीनगर येथील रमेश दुसे, चंद्रपूर येथील श्रीराम पान्हेरकर आणि मुंबई येथील डॉ. सलमा खान यांचा समावेश होता. तसेच, लातूर ज्येष्ठ नागरिक संघास राज्यस्तरीय संघ सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रमोद ढोकले, प्रास्ताविक दत्ता बाळसराफ यांनी केले, तर दीपिका शेरखाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

