पुणे, दि. २२: छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागासाठी मतदार यादी निरीक्षक (इलेक्टोरल रोल ऑब्झर्व्हर) म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती केली असून ते २८ नोव्हेंबरपासून विभागातील जिल्ह्यांना भेट देऊन या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. श्री. राव हे पुणे जिल्ह्यात ३० नोव्हेंबर रोजी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कामकाजाची पाहणी करणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक यांनी संपूर्ण मोहिमेदरम्यान अधिनस्त जिल्ह्यांना किमान ३ भेटी देणार आहेत. त्यापैकी पहिली भेट, दावे आणि हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत श्री. राव हे कोल्हापूर व सांगली येथे २८ नोव्हेंबर रोजी, पुणे जिल्ह्यात ३० नोव्हेंबर, सातारा- १ डिसेंबर तर सोलापूर जिल्ह्यात २ डिसेंबर २०२३ रोजी भेटी देणार आहेत. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मतदार नोंदणीबाबत समस्या असल्यास त्यांनी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावरील सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.