भारतीय छात्र संसदेचे दुसरे सत्र संपन्न
पुणे, दि. ११ जानेवारी – नवे युग नवे विचार, नवी क्रांती आणि नवे तंत्रस्नेही वातावरण घेऊन अवतरत आहे. या पार्श्वभूमीवर, इतिहासाचे नेमके आकलन करून घेऊन, भविष्याचा वेध घेत नव्या युगाची धुरा तरुणाईने खांद्यावर घ्यावी, असे प्रतिपादन इतिहासतज्ञ आणि प्रसिद्ध वक्ते विक्रम संपत यांनी गुरुवारी येथे केले.
एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट, भारतीय छात्र संसद फाऊंडेशन आणि एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या दुसर्या सत्रात विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादाने रंगले. या सत्राला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. ’युगांतर – यूथ इन ट्रान्झिशन’, या शीर्षकांतर्गत ते बोलत होते. या सत्रात आध्यात्मिक गुरू, लेखक स्वामी मुकुंदानंद, कर्नाटक विधान सभेचे सभापती बसवराज होराट्टी, प्रसिद्ध वक्ते सुरेश गरीमेला हे उपस्थित होते.
विक्रम संपत म्हणाले, ’देशाचे भवितव्य तेथील युवा पिढीमध्येच पाहिले जाते. प्रत्येक नव्या युगात प्रवेश करताना, आपण आपल्या इतिहासात डोकावणे आवश्यक असते. आपण कुठून आलो, आपल्या पूर्वजांनी ज्ञानाच्या विविध क्षेत्रात काय कामगिरी केली, संस्कृतीची कोणती उच्चतम अवस्था आपण प्राप्त केली होती, हे युवा पिढीने समजून घेतले पाहिजे. तसेच नजिकचा दीडशे वर्षांचा इतिहासही समजून घेतला पाहिजे. आपल्या स्वातंत्र्यासाठी पूर्वजांनी, क्रांतिकारकांनी, लोकनेत्यांनी कोणते संघर्ष केले. किती अत्याचार सहन केले, याची कृतज्ञ जाणीव आपण ठेवली पाहिजे, तरच उज्ज्वल भविष्याकडे आपण यशस्वी वाटचाल करू शकू’,.
स्वामी मुकुंदानंद म्हणाले, ’जगभरातील सर्वाधिक युवा लोकसंख्येचा देश अशी आपली ओळख आहे. युवा हे परिवर्तनाचे अग्रदूत असतात. ते भावी नेते असतात. त्यामुळे युगांतरात त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. नव्या युगाकडे जाताना आपली मुळे आपण पुन्हा तपासली पाहिजेत, नव्या दृष्टीने आपल्या इतिहासाकडे पाहिले पाहिजे, त्यातून प्रेरणादायी दृष्टी मिळेल आणि विकासाला अंतर्दृष्टी मिळेल’.
सुरेश गरिमेला यांनी तरुणाईसाठी सहा मुद्दे मांडले. गुंतागुंतीची आव्हाने असताना तुमच्यामधील सर्वोत्कृष्ट ते देशासाठी द्या, प्रभावी संवाद शिकून घ्या, विरोधी मतांचा आदर करा, परिश्रमांना पर्याय नाही, हे लक्षात ठेवा, इतर कुणी आपल्यासाठी काहीतरी करत राहील, या गैरसमजातून बाहेर या, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि योग्य कृती तात्काळ करा, मग नवे युग तुमचेच असेल.
बसवराज होराट्टी यांनी युवा शक्ती हीच देशाचे सामर्थ्य असते आणि नव्या युगात सारे विश्व नागरीक असतील, याचे भान ठेवण्याचे आवाहन केले. ’नव्या युगात प्रवेश करताना, हे स्थित्यंतर स्वीकारणे आव्हानात्मक, गुंतागुंतीचे असते, त्यामुळे तरुणाईने आपली जबाबदारी ओळखून देशासाठी योगदान देण्याचा निश्चय करावा’, असे आवाहन केले.
यावेळी आदर्श आमदार सन्मान राष्ट्रीय जनता दलाचे बिहार येथील चेतन आनंद यांना राहुल कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सायली घाटे, सूरज शर्मा, ट्यूलिप शर्मा, नंदिता जामवाल आणि अनुराग गुप्ता या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत मांडले. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.