किराणा घराण्याच्या ज्या मोजक्या कलाकारांनी आपल्या गाना कर्तृत्वाची मोहोर उठवली आहे त्यात पद्माताई देशपांडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी आपल्या गानसामर्थ्याने हे वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. अर्थातच या गरुडभरारीसाठी खूप अभ्यास, मेहनत आणि विचार करून त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पद्माताईंचा जन्म1952 साली सोलापूरला झाला. त्यांच्या वडिलांना गाण्याची आवड होती. आईकडूनही वारसा मिळालेला आहे. त्यांच्या आई माणिक वर्मांची गाणी खूप छान गात असत. उपजतच सुरांची ओढ,जात्याच हुशार. लहानपणी आईबरोबर लग्नाला गेल्या असताना हात सोडून तिथल्याच एका बँडवाल्या जवळ जाऊन बँड ऐकत बसल्या तेव्हाच त्यांच्यातील आवड लक्षात आलेली होती. अडीच वर्षांच्या असताना संस्कृतमधील काही श्लोक त्यांना अर्थासह पाठ होते. अशा एकपाठी पद्माताईनी गायनाचे धडे सुरुवातीला दिगंबर बुवा कुलकर्णी यांच्याकडे गिरवले. पाच सहा वर्षानंतर दत्तूसिंग गहेरवार यांचे मार्गदर्शन मिळाले. अगदी लहान वयात पेटीवर जवळजवळ 25 राग वाजवून गाता येत होते. हळूहळू पेटीबरोबर तबलाही वाजवता येऊ लागला. गांधर्व महाविद्यालयाची विशारद पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. वयाच्या सोळाव्या वर्षी सोलापूरला झालेल्या मुख्याध्यापकांच्या राज्यव्यापी संमेलनात सौभद्र नाटकात सुभद्रेची भूमिका पद्माताईंनी केली. त्याच वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संमेलनात ‘रामरंगी रंगले’ हे पद स्वतः तबला वाजवून त्या गायल्या. दरम्यान शैक्षणिक प्रगती चांगली होती. महाविद्यालयीन काळात त्यांना महाराष्ट्र राज्याची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली. शिवाजी विद्यापीठातून बी. ए. झाल्यावर त्यांनी सोलापूरच्याच एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणून काम केले. पुण्यात डॉ.प्रभाकर देशपांडे या कै.सवाई गंधर्वांच्या नातवाशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि पद्माताईंच्या गाण्याला अधिक वाव मिळाला. सुरुवातीला हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले.किराणा घराण्याचे शास्त्रशुद्ध संस्कार इथेच रुजले व वेगळीच दिशा मिळू लागली.एकच यमन राग गाताना तो कसा मांडायचा, इथपासून त्याची विशिष्ट स्वर जोडण्याची व तोडण्याची पद्धत आणि त्यातून निर्माण होणारी अलौकिक कलाकृती याचा तो प्रत्यक्ष अनुभव होता.पुढे दाजी उर्फ विजय करंदीकरांकडे आठ वर्षे रागसंगीताची तालीम मिळाली. ख्याल, ठुमरी, भजन, नाट्यसंगीत या साऱ्यांमध्ये वेगवेगळा असलेला स्वरविचार दाजींनी शिकवला. एकाच रागात वरील सर्व प्रकार गाताना सूक्ष्म स्वरभेदांचा विचार त्यांना दाजींकडून समजला. नंतरच्या काळात त्यांचे दीर पं.श्रीकांत देशपांडे यांचाही प्रभाव पडला असे त्या आवर्जून सांगतात. कलाकाराला शोधक नजर आणि कलेची ओढ असेल तर त्याला पुढे जाता येते आणि म्हणूनच रागाकडे बघण्याच्या सौंदर्यासक्त नजरेमुळेच पद्माताईंना नाविन्याचा विचार करावासा वाटला. एकच राग विविध घराण्यात विविध गायक कशा पद्धतीने सादर करतील हा विचार करून तशा पद्धतीने सुरुवातीला शास्त्रीय असो, वा सुगम गायक असो, त्यांच्या गायकीतील सौंदर्यस्थाने शोधून आत्मसात करण्याच्या वृत्तीमुळे स्वतःच्या गाण्याची शैली निर्माण करण्याची ओढ त्यांना लागली. त्यांच्या गायनावर पं.वसंतराव देशपांडे, विदुषी गंगुबाई हनगल यांच्या गायकीची छाप असल्याचं अनेक गायकांनीही नमूद केले आहे. माणिकबाईंना त्यांनी आदर्श मानले आहे. माणिकबाईंसारखे गाता आलं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत आलेले आहे. आपल्या क्षमता, मर्यादा ओळखून चाकोरी बाहेरचं गाणं म्हणायचं त्यांचा प्रयत्न असतो. अजय पोहनकरांचे मार्गदर्शन घेऊन पतियाळा गायकीचा बाज आपल्या गायनात आणला. सरगमचा रियाज केला. गळी आणि सपाट तान आरोही, अवरोही तान यासाठी कसून सराव केला. त्यामुळे त्यांच्या ताना स्पष्ट असतात. बंदिशींची चुस्त, शिस्तबद्ध मांडणी व वैविध्यता, बोलबनाव ही त्यांच्या गायकीची बलस्थाने आहेत. त्यांच्या या अभ्यासु व चिंतनशील वृत्तीमुळे त्यांना अनेक प्रथितयश महोत्सवात गायन सादर करता आले आहे. सवाई गंधर्व महोत्सवा मध्ये आत्तापर्यंत दहा वेळा गायन झालेले आहे. पद्माताईंजवळ काव्यगुणही आहे. हिंदी मराठीत कविता केल्या असून जवळजवळ 50 रागात बंदिशी रचल्या आहेत. स्वतः तबला वाजवत आपल्या सुनेला श्रुतीला आणि आता ऐश्वर्या या नातीलाही शिकवत आहेत. दोघीही पद्माताईंना सुरेल साथ करतात. पद्माताईंनी ‘सूरसंगत’ संस्थेची स्थापना केलेली आहे. त्यातून नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांना गायनाची संधी देत असतात. अनेक विद्यार्थ्यांना गेली 40 वर्षे विद्यादान करत आहेत. ‘रमणीय पद्मदले’
नावाचे त्यांच्या आत्मचरित्राचे पुस्तक प्रसिद्ध झालेले असून 150 बंदिशींच्या रचना केल्या असून स्वरपद्म नावाने 2 सी.डी. संग्रह काढलेले आहेत. अलूरकर म्युझिक हाऊस ने त्यांच्या सवाई गंधर्व महोत्सवातील गायनाची व्ही.सी.डी. काढलेली आहे. ताईंनी ‘सुधाकेदार’, ‘गोपाल सारंग’ व ‘सोहनी बहार’ या रागांची निर्मिती केली आहे. पद्माताईंना सूरमणी किताब मिळालेला आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी स्वरचित बंदिशी तसेच ‘नेहरू सेंटर’ मध्ये त्यांनी ‘नाट्यसंगीत आणि त्याचा सुवर्ण काळ’ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान दिलेले आहे. मुंबईच्या एन.सी.पी.ए. येथील त्यांच्या गायनाचे प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे ह्यांनी कौतुक केले. भारतभर व परदेशातही गायनाच्या अनेक मैफली झाल्या. आकाशवाणीच्या त्या मान्यता प्राप्त कलाकार असून गेली ३० वर्षे आकाशवाणी वरून तसेच दिल्लीच्या संगीत सभे मधून त्यांचे गायन प्रक्षेपित झालेले आहे. अलाहाबादच्या ‘संगीतांजलि’ संस्थेने ‘संगीतश्री’ हा किताब देऊन गौरविले आहे. पुण्याच्या भरतनाट्य मंदीरात ‘मला उमजलेल्या माणिक वर्मा’ हा त्यांचा कार्यक्रम श्रोत्यांना फारच आवडला. टी.व्ही. च्या ‘सह्याद्री’ चॅनेल वर ‘नाट्य पराग’ या कार्यक्रमात त्यांनी नाट्यगीते सादर केली आहेत. गेली 62 वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत राहून अनेक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व वाटचालीत त्यांचे यजमान डॉ.प्रभाकर देशपांडे यांची मोलाची साथ आहे. अशा या स्वरसिद्ध पद्माताई याना त्यांच्या त्र्याहत्तराव्या वर्षातील पदार्पणासाठी त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच सदिच्छा.
-डॉ. राजश्री महाजनी