पुणे – पुणे शहर, बारामती, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. तसेच चारही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांनी सादर केला. त्यावर ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली. सुरवातीला संघटन तयार करण्यावर भर द्या, अशी सूचना त्यांनी केली.या बाबत बाबू वागस्कर म्हणाले, ‘आढावा बैठकीत जिल्ह्यातील चारही जागा लढविण्याची कार्यकर्त्यांची तयारी असल्याचे मत मांडण्यात आले. तेथील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. आता पुढच्या टप्प्यात अन्य प्रक्रिया सुरू होतील.मात्र पुणे शहर लोकसभा मतदासंघाची जबाबदारी अमित ठाकरे, बाळा शेडगे आणि अजय शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर शिरूरची जबाबदारी बाबू वागस्कर, मावळची जबाबदारी रणजित शिरोळे आणि बारामतीची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे आहे. या चारही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा संबंधितांनी ठाकरे यांच्यासमोर सादर केला. त्यात संभाव्य राजकीय परिस्थिती, मतदारसंघातील मुद्दे, अन्य पक्षांची भूमिका आदींबाबतही यावेळी चर्चा झाली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीचा एक भाग म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ९०० कार्यकर्त्यांचा संच करण्यासाठीचा आराखडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयार केला आहे. यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आढावा बैठकीत बुधवारी दिला.राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची ‘मनसे’ने तयार सुरू केली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील २२ मतदारसंघांसाठीची आढावा बैठक मुंबईत झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या संघटन आराखड्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले. या प्रसंगी मनसेचे नेते बाबू वागस्कर, अजय शिंदे तसेच रणजित शिरोळे, बाळा शेडगे, किशोर शिंदे, गणेश सातपुते आदी उपस्थित होते.प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. तेथील प्रत्येक मतदारसंघात १५० कार्यकर्त्यांची टिम तयार करण्यात येईल. त्यांच्यामार्फत पक्षाची भूमिका तळागाळातील कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोचविण्यात येईल. स्थानिक पदाधिकाऱ्यांची त्यावर देखरेख असेल. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघांसाठी किमान ९०० कार्यकर्त्यांचा संच निर्माण होईल. त्याचा उपयोग पक्षाला लोकसभा तसेच विधानसभा, आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी होईल, अशी माहिती पक्षाचे नेते वागस्कर यांनी दिली.
.

