श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात ; यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे : गणेशोत्सवाचा खरा उद्देश… लोकमान्य टिळकांसह इतर समाजसुधारकांनी विविध मार्गांनी लोकजागृती करुन दिलेला स्वातंत्र्यलढा…कोळी गीतांसह भारताच्या विविध प्रांतातील संस्कृती नृत्य-नाटयाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर विविधांगी कला सादर झाल्या. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरुन दाद मिळाली. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. टिळक स्मारक मंदिर आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल.देशमुख, डॉ. संजीव डोळे, डॉ.भरत देसाई, चंद्रकांत निनाळे, प्राणंद कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, माऊली रासने, राजाभाऊ पायमोडे, विजय भालेराव, विजय चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच योजनेतील विद्यार्थी असलेला व आता सीआरपीएफ मध्ये सब इन्स्प्रेक्टर झालेल्या स्वप्नील कांबळे याला गौरविण्यात आले.
स्वप्नील कांबळे म्हणाला, माझ्या यशामध्ये मोठा वाटा दगडूशेठ गणपती ट्रस्टचा आहे. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. माझे वडिल भवानी पेठेत चप्पल शिवण्याचे काम करतात. मी ट्रस्टच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करु लागलो आणि माझे आयुष्य बदलले. अभ्यासिकेमध्ये मिळालेले प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळविले असल्याचे त्याने सांगितले.
डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, माणसाला घडविण्याचे काम जय गणेश पालकत्व योजना करीत आहे. या योजनेद्वारे आजची पिढी चांगला माणूस म्हणून घडताना दिसत आहे. समाजाला आज उत्तम नागरिकांची गरज आहे. त्याकरिता आजच्या पिढीवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय संस्कार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

