मुंबई-राज्यात सर्वत्र धनगर समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना शांततेत निवेदन देत आहे. जालना येथेही आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले, पण जिल्हाधिकारी आले नाहीत. तासभर वाट पाहिल्यानंतर आणि वारंवार आवाहन केल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यातून ही घटना घडली, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे रान पेटले असताना आता धनगर समाजही आरक्षणासाठी चांगलाच आक्रमक झाला आहे. जालन्यात मंगळवारी आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत तिथे उभ्या असणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा घटनाक्रम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे
आम्ही तोडफोडीच्या अशा घटनांचे समर्थन करत नाही. अशा घटना टाळल्या गेल्या पाहिजे. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी थोडेसे गांभीर्य दाखवण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसत नाही, असे पडळकर म्हणाले.गोपीचंद पडळकर यांनी यावेळी राज्यभरातील धनगर बांधवांना शांततेचे आवाहन केले. मी राज्यभरातील समाजाला शांततेचे आवाहन करतो. आपल्याला शांततेच्या मार्गाने पाठपुरावा करून आरक्षण मिळवायचे आहे. कायदा हातात घेऊन काहीही होणार नाही. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता पुढील सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर बळजबरी करू नका. त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवू नका असे आमचे प्रशासनाला आवाहन आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने जनभावना लक्षात घेऊन तातडीने धनगर आरक्षणावर ठोस भूमिका घ्यावी. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय वेगळा आहे. आमची अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणात नव्याने समावेश करण्याची मागणी नाही. आमचा यापूर्वीच त्यात समावेश आहे. पण त्याची अंमलबजावणी नाही. या प्रकरणी राज्यातील 33 आदिवासी जातींवर अन्याय का केला जात आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

