‘यूएसटी’ने पुण्यात सुरू केले एक हजार आसन क्षमतेचे नवीन कार्यालय
नवे कार्यालय ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळात विस्तारलेले, १००० आसन क्षमतेचे.
· डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोगांसाठी नाविन्यपूर्ण कार्यास पुणे कार्यालयातून मिळणार चालना.
पुणे, : यूएसटी या तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने पुण्यात नवीन कार्यालय सुरू करीत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कंपनीचे भारतातील जाळे अधिक मजबूत होणार आहे. या कार्यालयीन विस्तारातून पुढील ३ ते ५ वर्षांत पुण्यात सुमारे ३५०० ते ६००० नोकऱ्या निर्माण करण्याची योजना यूएसटी कंपनी आखत आहे. बालेवाडी येथे ईक्यू स्मार्टवर्क्स संकुलात स्थित असलेले हे नवीन कार्यालय ८०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले असून, तेथे १०००पेक्षा जास्त आसनक्षमता आहे. हे कार्यालय पुण्यातील साई राधे कॉम्प्लेक्स येथील विद्यमान कार्यालयास पूरक ठरणार आहे.
पुण्यातील नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘यूएसटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा सुधींद्र यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यान्वयीन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस, मुख्य मूल्य अधिकारी सुनील बालाकृष्णन, यूएसटी उत्पादन अभियांत्रिकीचे प्रमुख व पुण्यातील कार्यालयाचे प्रमुख रामप्रसाद संथानगोपालन, कंपनीचे उपाध्यक्ष व टॅलेंट अॅक्विझिशन विभागाचे जागतिक प्रमुख किशोर कृष्णा, डिझाइन व एक्सपेरियन्स प्रॅक्टिस विभागाच्या उपप्रमुख स्मिता सूर्यप्रकाश, महाव्यवस्थापक शेफी अन्वर, ‘यूएसटी’चे कार्यस्थळ व्यवस्थापन व कार्यसंचालन या विभागाचे वरिष्ठ संचालक हरी कृष्णन मोहनकुमार, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि इतर सहकारी उपस्थित होते.
‘यूएसटी’च्या ‘पुणे सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये सध्या २०००हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, ते डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल अनुप्रयोग यातील सखोल तज्ज्ञतेचा उपयोग करून नाविन्याला चालना देत आहेत, तसेच व्यवसायवृद्धी गतीमान करीत आहेत. फिनटेक, हेल्थकेअर व लाइफ सायन्स, रिटेल व ई-कॉमर्स, उत्पादन व ऑटोमोटिव्ह यांसारख्या उद्योगांतील आघाडीच्या जागतिक कंपन्यांना सेवा देणारे हे पुणे केंद्र यूएसटीच्या जागतिक ग्राहकांसाठी डिजिटल परिवर्तन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
‘यूएसटी’चे मुख्य कार्यान्वयीन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस म्हणाले, “पुण्यात नवीन कार्यालयाच्या उद्घाटन होणे हा भारतातील आमच्या सातत्यपूर्ण वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या धोरणात्मक विस्ताराद्वारे आम्ही डिजिटल परिवर्तन क्षेत्रातील व्यवसायाच्या गरजांसह बाजारातील संधींशी जुळवून घेत आहोत आणि आमची कार्यपद्धती मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे नियोजन करीत आहोत. एआय, डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आमच्या वाढत्या संघांना सहाय्य करण्यासाठी सक्षम प्रतिभावंत कर्मचाऱ्यांचा समूह उभारणे, व्यवसाय सल्लागारांची साखळी निर्माण करणे, धोरणात्मक भागीदारी करणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार यांवर आमचा भर आहे.”
यूएसटी उत्पादन अभियांत्रिकीचे अध्यक्ष आणि पुणे केंद्रप्रमुख रामप्रसाद संथानगोपालन म्हणाले, “पुणे हे भारतातील एक महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान केंद्र आहे. येथे नवीन कार्यालय उभारून यूएसटीने या भागातील वाढीतील मोठी गुंतवणूक केल्याचे दाखवून दिले आहे. एआय, अत्याधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी या क्षेत्रांत गुंतवणूक केल्याने आमच्या क्षमता अधिक बळकट होतील आणि पुणे केंद्र हे नाविन्यता आणि डिजिटल उत्कृष्टता यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून समोर येईल. आमच्या तज्ज्ञ संघाच्या सखोल डोमेन ज्ञानामुळे आम्ही जागतिक आस्थापन ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणावर डिजिटल परिवर्तन प्रकल्प यशस्वीपणे राबवू आणि नाविन्याच्या अग्रस्थानी राहू, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
पुढील तीन वर्षांत यूएसटी भारतातील आपल्या कार्यालयांमध्ये आसनक्षमता आणि कर्मचारी संख्या यामध्ये सातत्यपूर्ण वाढ साध्य करणार आहे. आगामी तीन ते पाच वर्षांत आपल्या व्यवसायाच्या गरजा आणि डिजिटल परिवर्तन, एआय यांमधील बाजारातील संधी ध्यानात घेऊन कंपनी आपली कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढविणार आहे. व्यवसाय सल्लागार क्षेत्रातील भक्कम संधी निर्माण करण्यावर, मोठा प्रतिभा समूह विकसित करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करण्यावर यूएसटी लक्ष केंद्रित करीत आहे.
‘यूएसटी’ने भारतभर आपली उपस्थिती सातत्याने वाढवत जागतिक डिजिटल परिवर्तन आणि तंत्रज्ञान सेवांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. मागील वर्षी कंपनीने बंगळुरूमध्ये दुसरे कार्यालय आणि एक डिझाइन एक्सपीरियन्स सेंटर सुरू केले. तसेच, केरळमधील कोची येथे आपल्या दुसऱ्या स्वतंत्र कॅम्पसची पायाभरणी केली. त्या ठिकाणी पुढील पाच वर्षांत ३,००० नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने बाळगले आहे. या भागातील वाढ आणि गुंतवणूक यांविषयीची कंपनीची बांधिलकी यावरून दिसून येते. ‘यूएसटी’ने हैदराबादमधील इंटरनॅशनल टेक पार्क येथे अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन २०२३ मध्ये केले. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास हे काम या कार्यालयात होते.
कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेली यूएसटी ही १९९९ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून, भारतातील तिचे मुख्यालय तिरुअनंतपुरम येथे आहे. बंगळुरू, तिरुअनंतपुरम, हैदराबाद, कोची, पुणे, मुंबई, चेन्नई, कोयंबतूर, दिल्ली एनसीआर, अहमदाबाद आणि होसूर यांसारख्या प्रमुख ठिकाणी तिची कार्यालये आहेत. सध्या भारतात २०,००० हून अधिक कर्मचारी ‘यूएसटी’सोबत कार्यरत आहेत.