“न्यू इंडिया” प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेच संशयाची सुई?

Date:

लाखो खातेदार, ठेवीदार असलेल्या मुंबईतील न्यू इंडिया सहकारी  बँकेमध्ये उघडकीस आलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत केलेली कारवाई यामुळे पुन्हा एकदा  सहकारी बँकिंग क्षेत्र व बँकिंग क्षेत्राची  नियामक असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या एकूण क्षमतेविषयीच सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहेत. या आर्थिक गैरव्यवहाराचा  घेतलेला  लेखाजोखा.

मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात ‘स्पॉट ‘ लेखा परीक्षण केले त्यावेळी हा गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने न्यू इंडियाचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक व सल्लागार मंडळ नेमले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया चे माजी सरव्यवस्थापक श्री. श्रीकांत हे प्रमुख प्रशासक असून त्यांना सल्ला देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक श्री. रविंद्र व सीए अभिजीत देशमुख यांची समिती नेमली आहे.

दरम्यान बँकेला नवीन कर्ज वाटप करण्यास, मुदत ठेवी घेण्यास व कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यास मनाई केली आहे. एकंदरीतच बँकेचे व्यवहार स्थगित करण्याची कडक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान  2019 ते 2025 कालावधीत बँकेचा महाव्यवस्थापक असलेल्या हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेतर्फे  अफरातफरीबद्दल अटक करण्यात आलेली आहे. हितेश याने पदाचा गैरवापर करून अन्य साथीदारांच्या मदतीने बँकेत कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याची कबुली दिली आहे. त्याने मुंबईतील  धर्मेश  पौन या बांधकाम व्यावसायिकाला 70 कोटी रुपये दिले होते. कांदिवली येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी त्याने ही रक्कम दिल्याचे उघडकीस आल्याने धर्मेश पौन यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. परंतु या दोन व्यक्तींच्या अटकेमुळे खऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता नाही.
बँकेचे विद्यमान प्रमुख कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. वरकरणी हा घोटाळा बँकेतील अधिकाऱ्यांनी केलेला  असला तरीही याबाबत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या  नियामकाला   आर्थिक घोटाळा शोधण्यात किंवा टाळण्यामध्ये आलेले अपयश हे अत्यंत गंभीर व  महत्त्वाचे आहे.

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या संबंधात एका माजी कर्मचाऱ्याने ‘ व्हिसल ब्लोअर ‘ नात्याने जानेवारी 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेकडे लेखी तक्रार करून बँकेत आर्थिक गैरव्यवहार, व्यवहारातील अनियमितता, भ्रष्टाचार व अनैतिक व्यवहार होत असल्याबाबतचे पत्र पाठवले होते. या तक्रारी मध्ये बँकेचे अध्यक्ष हिरेन भानू यांचा सहभाग असल्याचेही नमूद करण्यात आले होते. बँकांच्या विविध शाखा व्यवस्थापकांना डावलून 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जे बँकेच्या संचालक मंडळांनी दिल्याचा उल्लेख त्यात केला होता. यामध्ये बॉलीवूडमधील लोकप्रिय नटी प्रीती झिंटा हिला 18 कोटी रुपये असे कर्ज वाटप केले होते. ते थकल्यानंतर बँकेने ही रक्कम वसूल करण्याऐवजी ‘राईट ऑफ’ केलेली होती. तसेच राजहंस ग्रुप व अन्य काही उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले व ही सर्व कर्जे “अनुत्पादक कर्जे ‘म्हणून बुडीत झालेली आहेत. या तक्रारीचा संपूर्ण तपशील ‘मनी लाईफ’ या गुंतवणूक विषयक साप्ताहिकाने प्रसिद्ध केला आहे. 

एकंदरीत ही   अफरातफर अचानकपणे एका रात्रीत झालेली नाही. याबाबत रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वीच ही कारवाई करणे अपेक्षित होते. विशेषतः 2021 पासून या बँकेमध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम शिल्लक असल्याचे आढळलेले होते. त्याचवेळी  बँकेच्या राखीव निधी मध्ये एक नवा पैसा नसल्याचे लक्षात आलेले होते. असे असतानाही गेल्या तीन वर्षात रिझर्व्ह बँकेच्या तपासणी पथकाने  त्याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही किंवा यात काही गडबड असल्याचे निदर्शनास आणून दिले नाही. त्यामुळे या सर्व आर्थिक घोटाळ्यामागे रिझर्व्ह बँकेच्या उच्च पदस्थांचा हात आहे किंवा कसे याचा शोध घेण्याची निश्चित वेळ आलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने याबाबत दाखवलेला निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. किंबहुना या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची अकार्यक्षमता प्रकर्षाने जाणवत असून कदाचित त्यांनी जाणून-बुजून  हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कसे हे अत्यंत गंभीरपणे शोधले पाहिजे.

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या सध्या 30 शाखा असून 2022-23 या आर्थिक वर्षात बँकेला 23 कोटी रुपयांचा  निव्वळ तोटा होता तर 2023-24 या वर्षात हा निव्वळ तोटा 31 कोटी रुपयांवर गेलेला होता. एवढेच नाही तर मार्च 2024 अखेरच्या वर्षात बँकेचे कर्जवाटप 1330 कोटी रुपयांवरून 1175 कोटी रुपयांवर घसरलेले होते. मात्र ठेवींचे प्रमाण याच काळात 2406 कोटी रुपयांवरून 2436 कोटी रुपयांवर थोडेसे वाढलेले होते. बँकेमध्ये 1 लाख 30 हजार पेक्षा जास्त ठेवीदार असून 90 टक्के ठेवी पाच लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या आहेत. यामध्ये बचत खात्यात 27.95 टक्के म्हणजे 671.51 कोटी रुपयांच्या ठेवी असून चालू खात्यामध्ये 103.21 कोटी रुपये आहेत. तसेच विविध मुदतीच्या 1652.25 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्याचे प्रमाण 68 टक्क्यांच्या घरात आहे. या वर्षात बँकेचा भांडवल पर्याप्तता रेशो 9.06 टक्के होता. नियमानुसार तो किमान दहा टक्के असण्याची आवश्यकता होती. परंतु बँकेने त्याचे पालन केलेले नव्हते. बँकेचा 2023 अखेरचा जो ताळेबंद प्रसिद्ध झाला आहे त्या बँकेच्या हातात 122 कोटी रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होती. हीच रक्कम एप्रिल 2024 या वर्षाच्या अखेरीस 135 कोटी रुपयांवर गेलेली होती.

यातील आरोपी हितेश मेहता याने बँकेतून 2020 पासून रोख रकमेची अफरातफर केल्याची कबुली दिलेली आहे. अशी जर वस्तुस्थिती होती तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ला त्यांच्या दरवर्षीच्या बँकेच्या तपासणीमध्ये याबाबत काहीही सापडले नाही असे म्हणणे हे योग्य ठरणार नाही. विशेषतः रिझर्व्ह बँक जेव्हा बँकेच्या सर्व खात्यांची दरवर्षी तपासणी करत असते तेव्हा ते मुदत ठेवी, कर्जवाटप आणि त्याची वसुली,  यासह  प्रत्येक गोष्टी अत्यंत बारकाईने तपासत असते. एका माहितीनुसार रिझर्व बँकेचे तेच अधिकारी अनेक वर्षे या बँकेची तपासणी करत असून त्यांनी या बँकेला सातत्याने  ‘क्लीन चीट’ दिलेली आहे. पीएमसी बँकेमधल्या  गैरव्यवहार प्रकरणात याच तपासणी अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचे सांगण्यात येते.

रिझर्व बँकेने दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी या बँकेच्या रोख रकमेची तपासणी केलेली होती मात्र त्यांनी त्याच वेळेला बँकेचे व्यवहार गोठवणे आवश्यक होते ते काम केले नाही. या घटनेनंतर 24 तास उलटून गेल्यानंतर नियमकाने ही कारवाई केलेली आहे. याचा अर्थ या काळात काही मंडळींना बँकेतील ठेवी काढून घेण्याची संधी त्यामुळे लाभली असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात सीबीआय सारख्या संस्थेने किंवा आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने तपासणी करून बँकेतील ठेवी कोणी काढून घेतल्या याचा शोध घेतला पाहिजे. जेव्हा रोख रक्कम गायब झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते तेव्हाच त्यांनी का कारवाई केली नाही हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

हा आर्थिक घोटाळा शोधून काढण्यात रिझर्व्ह बँकेला सपशेल अपयश आलेले आहे हे नाकारता येणार नाही. उलटपक्षी यामुळे रिझर्व्ह बँके मधील  अंतर्गत व्यवस्थेवर  प्रकाश पडत आहे. त्यांच्या विविध विभागांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये  योग्य समन्वयाचा अभाव असल्याचे या घटनेमुळे स्पष्ट होत आहे. एखाद्या नागरी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम गायब होते आणि त्याच्यावर कोणीही कारवाई करत नाही यावर विश्वास बसणे केवळ अवघड आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेतल्या काही अधिकाऱ्यांचे अशा नागरी सहकारी  बँकांमध्ये “हित संबंध “आहेत किंवा कसे हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या संबंधांचा त्यांना काही लाभ होत आहे किंवा कसे याचाही शोध घेण्याची गरज आहे.

सहकारी बँकिंग क्षेत्रात आर्थिक घोटाळा ही नवीन गोष्ट नाही. 2019 मध्ये पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये ( पीएमसी) मोठा घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्यामुळे रिझर्व बँकेने देशातील सर्व नागरी  व बहुराज्य स्तरावरील सहकारी बँका आपल्या थेट नियंत्रणाखाली  घेऊन त्यांच्यावर कडक  नियंत्रण ठेवण्यास प्रारंभ केला. परंतु न्यू इंडिया सहकारी बँकेच्या प्रकरणात रिझर्व्ह बँकेची भूमिका संशयास्पद असून त्यांचे नियामकाचे पितळ उघडे पडले आहे असे वाटत आहे.  याची  केंद्रीय वित्त मंत्रालयाने वेळीच दखल घेतली नाही तर सर्वोच्च न्यायालयांमध्ये याबाबतचे दरवाजे ठोठावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेखक-प्रा. नंदकुमार काकिर्डे

(लेखक पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहाटे 3.28 वाजता सुनीता विल्यम्स सुखरूप परतल्या…

सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने...

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...