स्वर्ण भारत पक्षाच्या उमेदवारास शेतकरी संघटनेचा पाठींबा.
पुणे: पूणे मतदार संघातील लोकसभेचे स्वर्ण भारत पक्षाचे उमेदवार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना शेतकरी संघटनेचा पाठींबा असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून देशात समाजवादी व्यवस्था अमलात आली. गरिबांचे कल्याण करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराची कुरणे तयार झाली. काही कुटुंबांच्या हातात सत्ता एकवटली.शेती व शेतकऱ्यांच्या शोषणाची व्यवस्था उभी राहिली, शेतकरी गरीब व कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. बेकारी,गुन्हेगारी, अस्वच्छता, शहरां मधील वाढती गर्दी अशा अनेक समस्या या समाजवादी व्यवस्थे मुळे निर्माण झाल्या.
२०१९च्या निवडणुकीत सर्वच प्रास्थापित पक्ष समाजवादी मांडणी करीत आहेत. देशात स्वतंत्रतावादी विचाराचे दोनच पक्ष आहेत. स्वतंत्र भारत पक्ष व स्वर्ण भारत पार्टी. देशाला अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारचा अवाढव्य पसारा छाटण्याची गरज आहे. सरकारने कायदा व सुव्यवस्था पहावी बाकी सर्व उद्योग खाजगी क्षेत्राला सोपवावेत व त्यात हस्तक्षेप करु नये अशी या पक्षांची विचारधारा आहे. देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असेल तर शेतीतील सरकारी हस्तक्षेप कायमचा बंद झाला पाहिजे. शेती व्यवसाया वरीलसर्व बंधणे हटविली पाहिजेत या विचाराचा हा पक्ष असल्यामुळे शेतकरी संघटना, स्वर्ण भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना सक्रीय पाठिंबा जाहीर करत असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला घनवट यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अनिल चव्हाण, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, प.महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शेलार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लक्षमण रांजणे, सातारा जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष संग्राम अनपट व उमेदवार महेश गजेंद्रगडकर उपस्थित होते. भारतात सुरु असलेले घराणेशाही, गुंडगिरी व जुमलेबाजीच्या राजकारणाला विटलेल्या सुज्ञ नागरिकांनी देशाची भ्रष्ट व अकार्यक्षम व्यवस्था बदलण्यासाठी स्व. भा. पा.च्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन घनवट यांनी पत्रकार परिषदेत केले.