पुणे- कर्वे समाज सेवा संस्थेने आयोजित केलेल्या नशा मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ कलाकार कट्ट्यावरून करण्यात आला. आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित नशा मुक्त भारत अभियानासाठी पुण्याच्या कर्वे समाज सेवा संस्थेची निवड केंद्र सरकार च्या वतीने करण्यात आलेली आहे. देशभरातील आघाडीच्या ७५ शिक्षण संस्थांची या अभियानासाठी निवड करण्यात आलेली असून महाराष्ट्रातील सहा संस्थांचा यामध्ये समावेश आहे .
आज गोपाळकृष्ण गोखले चौक ( डेक्कन जिमखाना ) येथील कलाकार कट्ट्यावर तीन पथनाट्य सादर करून नशा मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. पथनाट्याचे दिगदर्शन मुक्ता ढवळे, साक्षी काळे आणि कौस्तुभ ओव्हाळ यांनी केले असून समाजकार्य व समुपदेशन अभ्यासक्रमाच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी पथनाट्यचे उत्कृष्ट सादरीकरण करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी डेक्कन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, कर्वे समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर, सचिव शिवकुमार, व्यवस्थापन मंडळ सदस्य वैजीनाथ बिरादार, व्यवस्थापन मंडळाचे समन्वयक प्रसाद कोल्हटकर, प्र. संचालिका डॉ शर्मिला रामटेके, कार्यक्रम नोडल अधिकारी प्रा. चेतन दिवाण, सी एस आर सेल प्रमुख प्रा. महेश ठाकूर तसेच संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय समाज कल्याण मंत्रालयातर्फे नशा मुक्त भारत अभियानासाठी पुण्यातील प्रतिष्ठित कर्वे समाज सेवा संस्थेची निवड अभिमानास्पद असून आम्ही ही मोहीम यशस्वी करू असे संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक म्हणाले.विद्यार्थ्यांना व्यस्नांच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी आणि त्यांनी व्यसनापासून दूर रहावे यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचेही श्री. पाठक म्हणाले.
कर्वे समाज सेवा संस्थेतील विद्यार्थ्यांनी प्रा. चेतन दिवाण आणि प्रा. महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पथनाट्य बसविले असून त्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आम्ही विशेष करून महाविद्यालयीन युवक युवतीं मध्ये जनजागृती करणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर म्हणाले.विशेषतः विद्यार्थ्यांकडे पालकांचे होतं असलेले दुर्लक्ष, सोशल मिडीयाचा प्रभाव,जीवघेणी स्पर्धा आणि एकाकीपणा यामुळे व्यसनाकडे तरुण तरुणी ओढले जातात याबाबत पथनाट्यातून जागृती केली जात असल्याचेही खर्डेकर म्हणाले.
यंदाच्या गणेशोत्सवापर्यंत कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने शहरातील सर्व महाविद्यालये व प्रमुख चौकांमध्ये नशा मुक्ती संदर्भात जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रा. चेतन दिवाण व प्रा. महेश ठाकूर यांनी स्पष्ट केले.