कझाकिस्तान येथे होणार्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार
पुणे, दि. २९ डिसेंबर : जम्मू काश्मीर येथे नुकत्याच पार पडलेल्या‘ राष्ट्रीय सॅम्बो चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कर्मचारी पै. दत्तात्रय शिंदे यांनी सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्राला मानाचा तुरा मिळवून दिला आहे. कझाकिस्तान येथे होणार्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत पै. शिंदे हे भारताचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी शुभेच्छा दिल्यात.
जम्मू काश्मीर येथे नॅशनल सॅम्बो चॅम्पियनशिप २०२२ ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत २३ राज्यातील १२४० व महाराष्ट्रातून १३७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात ७१ से ७९ या वजनगटात पै. दत्तात्रय शिंदे यांनी आपली चपळता, बुद्धिमत्ता व वेगवेगळे डावपेच वापरून पंजाब मधील खेळाडूचा पराभव करून सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होते आहे.
प्रशिक्षक संतोष गलांडे व महाराष्ट्र पोलिस विभागातील डॉ. सुरेश मारकड यांच्या मार्गदर्शनात पै. दत्ता शिंदे पुढील प्रशिक्षण घेत आहेत. शिंदे यांनी आपल्या यशाचे श्रेय हे सचिव कुमार उगाडे व गुंडिबा मदने यांना दिले आहे.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयुच्या क्रिडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी.जी.धनवे आणि राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विलास कथुरे व एमआयटीतील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.