पुणे- पुणे शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळख असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) व शिक्षणक्षेत्रात नामांकित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात पीएमपीएमएलचे सशक्तीकरण करणेकामी ३० जुलै २०२१ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर पीएमपीएमएलचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.चेतना केरुरे, पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संतोष ढेरे, नवोपक्रम,नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर,समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रुती तांबे, तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. अनघा तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, “भारत सरकारची “ट्रान्सपोर्ट फॉर ऑल” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशी नागरिकांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अडीअडचणी, त्यांचे अभिप्राय व त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी शिक्षणक्षेत्रात नामांकित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याबरोबर
सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा सामंजस्य करार पीएमपीएमएलची व्यापकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.”
प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पीएमपीएमएलला “ट्रान्सपोर्ट फॉर ऑल” ही संकल्पना प्रभावीपणे राबवता यावी यासाठी लोकांना असणाऱ्या अडचणींचा विद्यापीठाच्या विविध विभागांमार्फत अभ्यास करून सर्व्हे केला जाईल. त्यातून प्रश्नांची सूची तयार करण्यात येईल व हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यापीठ व पीएमपीएमएल एकत्रितपणे त्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल.”