वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ५० दिवसाच्या काउन्टडाऊनचे अनावरण पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्यावतीने आयोजन , पुणे महानगरपालिका सह आयोजक
पुणे : कोणताही खेळ खेळत असताना यश मिळाले नाही तर निराश होऊ नका. जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करत रहा आणि एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच विजयी व्हाल, असा सल्ला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने दिला.
तो म्हणाला, पुण्याच्या याच हॉलमध्ये मी ११ व्या वर्षी पहिल्यांदा खेळण्यासाठी आलो. त्यानंतर दर वर्षी मी इथे खेळलो पण एकदाही जिंकू शकलो नाही. परंतु मी माघार घेतली नाही आणि चिकाटीने खेळत राहीलो आणि अखेरीस सातव्या वर्षी मी विजेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे उमेद न घालवता, खेळाचा आनंद घेत रहा, असे मत पारुपल्ली कश्यप यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउन्ट डाऊन ५० चे अनावरण करण्यात आले. शिवाजीनगरमधील पीडीएमबीए स्पोर्टस काॅम्प्लेक्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे, संतोष वारुळे, लोकमान्य मल्टीपर्पजचे सुशील जाधव, पी.एन. गाडगीळच्या रेणू गाडगीळ, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोरालकर, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव रणजीत नातु, वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णासाहेब नातु, गिरीष नातु, अविनाश जाधव उपस्थित होते.
पुण्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना कश्यप म्हणाला, मला स्पर्धेचा हा हॉल, इथे बसलेली मुले, त्यांचे पालक पाहून माझे लहानपण आठवत आहे. वरिष्ठ खेळाडूंना बघून त्यांना आता काय वाटत असेल याची मला पूर्णपणे कल्पना येते आहे. याच कोर्टवर मी खेळत असताना माझी आई प्रेक्षकांत बसून मला प्रोत्साहन देत असे.
गंमत म्हणजे मी ज्यावेळी इथे दरवर्षी विजेतेपदासाठी झगडत होतो त्याचवेळी माझी पत्नी साईना मात्र दरवर्षी विजयश्री मिळवून जात असे. जी सात वर्षे आम्ही इथे खेळलो त्या सातही वर्षी ती इथे जिंकली होती, असेही कश्यप म्हणाला.
प्रत्येक खेळाडूचे वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न असते तसेच माझेही होते. मी कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा विजेता ठरल्यावर तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्याही वेळी मला दोन वेळा अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले आणि वरिष्ठ गटात आल्यावर तब्बल पाच वर्षांनी मी राष्ट्रीय विजेता ठरलो.
मुलांना खेळ बघू द्या
यावेळी कश्यपने युवा खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला ही राष्ट्रीय स्पर्धा जवळून बघण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे ती दवडू नका. त्यावेळच्या अव्वल खेळाडूंना जवळून बघता यावे यासाठी मी लहान असताना लाईन अंपायर म्हणून काम करत असे. हे सर्व खेळाडू कसे शॉट मारतात ते पाहून घरी जाऊन त्याचा सराव करत असे. याप्रकारातून मी खूप काही शिकलो आणि मला सुदैवाने मदतीला कायम तत्पर असे सिनीयर खेळाडूही लाभले.
त्यामुळे आवर्जून जाऊन या खेळाडूंना त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स देताना बघा. फक्त खेळच नव्हे तर या स्तरावर येण्यासाठी काय मेहनत लागते हेही तुम्हाला कळेल, असेही कश्यप याने सांगितले.
रणजीत नातु म्हणाले, ८४ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. पुण्यामध्ये ही स्पर्धा होणे ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.