‘टीटीए’ व ‘आयईआय’तर्फे ‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’वर व्याख्यान
पुणे : “अल्बर्ट आईन्स्टाईन लहानपणासून अंतर्मुख स्वभावाचे, सतत नाविन्यपूर्ण गोष्टी करून पाहणारे प्रयोगशील व जिज्ञासू व्यक्तिमत्व होते. कुतूहल व उत्सुकतेपोटी प्रत्येक विषयाचा सखोल व निर्णायक अभ्यास करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यामुळेच ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले आणि त्यांनी अनेक सिद्धांत जगाला दिले,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मुकुंद मोहरीर यांनी केले.
टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशन (टीटीए) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया पुणे स्थानिक केंद्र यांच्यातर्फे ‘आईन्स्टाईनच्या मेंदूचा प्रवास’ या विषयावर डॉ. मुकुंद मोहरीर यांचे व्याख्यान झाले. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे, खजिनदार वसंत शिंदे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणेचे ज्येष्ठ आर्किटेक्ट दिलीप पाटील, विज्ञान प्रसारक दीपाली अकोलकर आदी उपस्थित होते.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवीधर आणि एअरोस्पेसमध्ये पीएचडी असलेले डॉ. मोहरीर नासामधून शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले आहेत. रॉकेट्स, स्पेस शटल्स, क्रूज मिसाईल्स, स्पेस प्लॅन, एअर वेहिकल्स, स्पेस लॅब आदी प्रकल्पांवर काम केले आहे. या प्रवासाविषयी देखील यावेळी माहिती देण्यात आली. आईनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा व ‘उर्जा-वस्तुमान समीकरण’ याचा खास उल्लेख करून मोहरीर यांनी त्या काळातील ‘विज्ञानविश्वात’ झालेल्या चिकित्सक चर्चांचे सुरेख वर्णन सादर केले.
डॉ. मुकुंद मोहरीर यांनी आईन्स्टाईनच्या विविध शोधांचा, त्यांच्या संशोधक वृत्तीचा आढावा घेतला. डॉ. मोहरीर म्हणाले, “आईन्स्टाईनचा जन्म १८७९ मध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी मॅग्नेटिक एरिया म्हणजे काय हे शोधून काढले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी बीजगणितात लक्ष घालत मेडिकल सायन्सचे गणित सोडवले होते. त्यासोबतच तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु केला. आईनस्टाईन यांनी भगवान श्रीकृष्ण आणि वेदांचाही अभ्यास केला.”
“पुढे त्यांनी एकामागून एक शोध लावले. प्रत्येक गोष्टीत हे असे का? यावर ते विचार करत. वेग आणि काळ याचा संबंध त्यांनी अभ्यासला. कृष्णविवर, देवकण याबाबत ते ठाम होते. आयुष्यभर गूढ उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईन्स्टाईन यांना १९२१ मध्ये नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले,” असे डॉ. मोहरीर यांनी नमूद केले.