पुणे: भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या वाहन फेरीचा प्रारंभ नाना नानी पार्क, वर्तक उद्यान येथून होऊन शनिवार वाडा येथे समारोप झाला. उमेदवार रासने यांचे चौकाचौकात महिलांनी औक्षण करून तसेच नागरिकांनी पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या रॅलीला प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ,माजी नगरसेवक दीपक पोटे,राजेश येनपुरे , सरचिटणीस गणेश घोष बापू मानकर , कसबा अध्यक्ष प्रमोद कोंढरे बाळासाहेबांची शिवसेनेचे राज्य सचिव किरण साळी,शहर प्रमुख नाना भानगिरे, धनंजय जाधव, आर पी आय चे शैलेंद्र चव्हाण सुशील सर्वगौड ,पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक,यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलताना, कसब्यातील मतदारांचे गेली ३० वर्ष भारतीय जनता पार्टीच्या मागे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल रासने यांनी आभार मानले. खासदार गिरीश बापट यांनी हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने बांधला स्व. मुक्ताताई टिळक यांनी तो राखला. आता ती जबाबदारी पक्षाने माझ्या खांद्यावर दिली आहे. भा ज पा चा हा किल्ला अभेद्य रहावा या साठी आपण सगळे रस्त्यावर उतरून काम करत आहोत. त्याच प्रमाणे आपण केलेले कोरोना काळातील काम हे लोकांच्या स्मरणात आहे. आपली नाळ ही नागरिकांशी जोडली गेली आहे. जातीयवादी तेढ आणि चुकीच्या अफवा पसरवून केवळ सत्ता मिळवण्यासाठी जे धडपड करत आहेत त्यांना मतदानाच्या माध्यमातून कसब्यातील मतदार खणखणीत उत्तर देतील हा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.
