पुणे : ‘सरकारी नोकर्यांमधील वाढलेली स्पर्धा, समाजातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि अॅमस्टेड क्लोदिंग कंपनीने पुढाकार घेतला असून, अवघ्या दीड लाख रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची संधी शहरी व ग्रामीण तरुणांना मिळणार आहे. या दीड लाखामध्ये तरुणांना व्यवसायाची संपूर्ण सामग्री, प्रशिक्षण आणि उत्पन्नाची हमी देण्यात येणार आहे,“ अशी माहिती अॅमस्टेड क्लोदिंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल सोंडकर व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. नवी पेठेतील पत्रकारभवनात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी एमस्टेड कंपनीचे प्रमुख राकेश ओसवाल, स्टुडंट्स राईट्सचे किरण निंभोरे, विजय मते, साईनाथ डहाळे उपस्थित होते.
निखिल सोंडकर म्हणाले, “अॅमस्टेड क्लोदिंग कंपनीही 2004 पासून पुण्यात कार्यरत आहे. कापड उद्योगांमध्ये ही कंपनी काम करत असून, कंपनीचा पसारा संपूर्ण जगभर पसरलेला आहे. सामाजिक व्यावसायिक बांधिलकीच्या नात्याने व या तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कंपनीने पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कंपनीकडून शंभर ते दीडशे तरुणांना व्यवसाय उभारण्याची संधी देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीला होणार्या नफ्यातून कंपनी त्यातील काही रक्कम स्पर्धा परिक्षा करणार्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व व्यवसाय उभारणीसाठी देणार आहे. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी अभ्यासिका, अल्पदरात भोजनव्यवस्था, दिव्यांगांसाठी विशेष अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन व सेमिनार्स, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य, गरीब-होतकरूंना शैक्षणिक मदत अशा प्रकारची विविध सामाजिक कामे या निधीमधून करण्यात येणार आहेत.”
किरण निंभोरे म्हणाले, “जून महिन्यात गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा महोत्सवातच ‘उभारा दीड लाखात व्यवसाय’ या उपक्रमाचे अनावरण झाले. तरुणांनी व्यवसाय सुरू करावा, हाच हेतू यामागे आहे. आर्थिक समावेशन करून सामाजिक समावेशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोन संस्था करू पाहात आहेत. अशाच प्रकारे भविष्यात विविध व्यावसायिक कंपन्या, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन तरुणांना कमी भांडवलात व्यवसाय उभा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र पातळीवर राबविण्यात येणार आहे.