Home Blog Page 99

संप कालावधीत महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत

मुंबई,: वीज कर्मचाऱ्यांच्या २९ पैकी ७ संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवार (दि. ९) पासून सुरू केलेल्या ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. या संपामध्ये महावितरणमधील सुमारे ६२ टक्के अभियंते, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नाहीत.

वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे. तरीही दि. ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाला सुरवात करण्यात आली आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. महावितरणमध्ये गुरूवारी (दि. ९) सुमारे ६२ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यासोबतच २० हजार तांत्रिक बाह्यस्त्रोत कर्मचारी (यंत्रचालक व विद्युत सहायक) कार्यरत आहेत. संपकाळात प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणात आपात्कालिन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाद्वारे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व साधनसामग्रीने नियोजन करण्यात येत आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येत आहे.

संपकाळातील नियोजनानुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यात संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, २० हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.

संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एरिन एन. नगरवाला बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘नदी वाचवा’ जनजागृती मोहीम

पुणे:पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने डॉ. एरिन एन. नगरवाला बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच “नद्या वाचवा” या विषयावर जनजागृती मोहीम राबवली. ही मोहीम कल्याणी नगर जॉगर्स पार्क परिसरात पार पडली, जिथे विद्यार्थ्यांनी सकाळच्या फिरणाऱ्यांशी आणि भेट देणाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी “आपल्या नद्या वाचवा आणि त्यांचे रक्षण करा” असे संदेश असलेले बॅनर्स आणि हातात घालायचे बँड्स वाटले.

या उपक्रमातून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांना नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना प्रोत्साहित केले.

अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये करुणा आणि जबाबदारीची भावना निर्माण होतेच, तसेच समाजालाही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची आठवण करून दिली जाते. शाळेचा हेतू अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये या मूल्यांना अधिक बळकट करण्याचा आहे.

सदनिकाधारकांना अपेक्षित सुविधा न दिल्याने माण मध्ये 2 बिल्डरांना PMRDA चा ,’दे धक्का”

रहदारीचा रस्ता उपलब्ध करून न दिल्याने पीएमआरडीएने थांबविली बांधकामे

पिंपरी : सदनिकाधारकांना अपेक्षित रस्त्यासह इतर महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध न करून दिल्यामुळे माण (ता. मुळशी) भागातील २ विकासकांची बांधकामे थांबव‍िण्याचे निर्देश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी गुरुवारी दिले आहे. खाजगी सदनिकाधारकांच्या प्राप्त तक्रारीनंतर विकास परवानगी विभागाने केलेल्या स्थळ पाहणीच्या अहवालानंतर संबंधित निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वी पाठक रोड, माण भागातील रहिवास गृहप्रकल्पात राहणाऱ्या नागरिकांच्या आम्हाला गृहप्रकल्पात येण्या – जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याच्या तक्रारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे केल्या होत्या. याची दखल घेत महानगर आयुक्त यांच्या निर्देशानुसार विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गृहप्रकल्पांची स्थळ पाहणी करण्यात आली. यानंतर संबंधित नागरिक आणि विकासकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत अटी शर्तीनुसार नागरिकांना गृहप्रकल्पात येण्या – जाण्यासाठी व्यवस्थित वापरण्याजोगा रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे २ विकासकांची बांधकामे थांबविण्यात आली आहे. यात जॉयव्ह‍िले शापूर्जी हाऊसिंग प्रा. लि., मे. येलोस्टोन स्कायस्क्रेपर्स एलएलपी या विकासकांची कामे थांबविण्यात आली आहे.

अतिक्रमणधारकांवर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश
मुळशी तालुक्यातील भुगाव येथील ‘द वन सहकारी गृहरचना संस्था मर्या’ या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्त्याभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने नागरिकांना येण्या – जाण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी पीएमआरडीएकडे आल्या होत्या. त्यानुसार स्थळ पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी अतिक्रमणे आढळून आल्याने संबंधित अधिक्रमणधारकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्याचे निर्देश महानगर आयुक्त यांनी द‍िले आहे.

फ्लॅट घेणाऱ्या ग्राहकांना फसवणाऱ्या बिल्डरांची थांबविली अन्य बांधकामे:PMRDA चा लोकांना दिलासा देणारा धडक कार्यक्रम

नागरी सुविधा न देणाऱ्या विकासकांची थांबव‍िली बांधकामे

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी घेतला निर्णय; वाघोलीमधील गृहप्रकल्प

पिंपरी : अटी शर्तीनुसार बांधकाम व्यवसायिक (विकसक) सदनिकाधारकांना अपेक्षित नागरी सुविधा देत नसल्याचे पुढे येत आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित गृहप्रकल्पांच्या बांधकामांची स्थळ पाहणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आलेल्या विकासकांची बांधकामे थांबव‍िण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहे. वाघोलीतील काही खाजगी सदनिकाधारकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महानगर आयुक्त यांनी संबंधित विकासकांची कामे थांबव‍िली आहे.

विकसक आपल्या गृहप्रकल्पांना मान्यता घेताना संबंधित शासकीय यंत्रणेकडे आम्ही नागरिकांना अपेक्षित असलेल्या नागरी सुविधा देणार असल्याचे नमूद करतात. मात्र काही विकसक सोयी-सुविधांकडे कानाडोळा करत असल्याने त्या गृहप्रकल्पातील नागरिकांना अनेक अडचणी येतात. त्या अनुषंगाने वाघोली पर‍िसरातील गट नंबर ११८५ अ आणि ब भागातील रहिवास गृहप्रकल्पात राहणाऱ्या नागरिकांनी पीएमआरडीएकडे तक्रारी आल्या होत्या. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महानगर आयुक्त यांनी तीन आठवड्यापूर्वी संबंधित नागरिक आणि विकासकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत अटी शर्तीनुसार नागरिकांना सुविधा देण्याचे निर्देश दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ३ विकासकांची बांधकामे थांबविण्यात आली आहे.

वाघोली गट नंबर ११८५ अ आणि ब या भागातील गृहप्रकल्पाच्या रस्त्यालगत भूमिगत गटार नसल्यामुळे सांडपाणी साचून नागरी समस्या उद्भवत होत्या. त्याअनुषंगाने स्थळ पाहणी केल्यानंतर अपेक्ष‍ित नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व सोसायटी धारकांचे चटई क्षेत्र वापरून बांधकाम परवाने प्राप्त केलेल्या ॲम्को डेव्हलपर्स, कृष्णा डेव्हलपर्स, बेलवलकर हाऊसिंग यांची बांधकामे थांबवण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.

समस्यांच्या निराकारणानंतरच परवानगी
अटी शर्तीनुसार नागरी सुविधा न पुरवणाऱ्या संबंधित गृहप्रकल्पाच्या विकासकांची पुढील बांधकामे थांबविण्यात आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने नागरी समस्यांचे निराकरण झाल्यानंतरच संबंधित विकासकांना सुधारित बांधकाम परवानगी देण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी विकास परवानगी विभागाला दिले आहे. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याबाबत तसेच सांडपाण्याची व्यवस्था असल्याबाबत पुणे महानगर पालिकेकडून ना – हरकत प्राप्त झाल्यानंतरच समूह गृहप्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

औंध बाणेर मध्ये रस्त्यावर पुढे सरकणारी 60 अतिक्रमणे उध्वस्त

पुणे : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागामार्फत परिहार चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दुतर्फा रस्ते इत्यादी ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करून फ्रंट मार्जिन,साईड मार्जिन तसेच अनधिकृतपणे उभारलेले कच्चे बांधकाम, हॉटेल, दुकाने,कच्चे पक्के शेड जवळपास ६० अनधिकृत शेड वर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.संयुक्त कारवाई साठी बांधकाम विभागाकडील कनिष्ठ अभियंता श्रीमती कामिनी घोलप , सहायक कोकरे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलिस कर्मचारी,बिगारी सेवक ,औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक श्री.राहुल बोकन,सहायक अतिक्रमण निरीक्षक श्री.वैभव जगताप,राहुल डोके, हाशम पटेल, पंकज आवाड यांच्या धडक कारवाई पथकाने कारवाई केली. तसेच कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय व घोलेरोड शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण विभागाची मदत झाली.०३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.यामध्ये तंबू,लोखंडी जाळ्या,फ्रिज,काउंटर,स्टॉल, इतर साहित्य जप्त करण्यात आले.सुमारे ९,५०० चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले.अतिक्रमण निर्मूलन विभाग उपआयुक्त .संदीप खलाटे, महापालिका सहायक आयुक्त .गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक बोकन यांनी सांगितले

देवेंद्र भुजबळ यांना “माध्यमभूषण” पुरस्कार जाहीर

मुंबई : कोकणातील दि म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई,आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित, डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालय व आदर्श टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, “गौरव महाराष्ट्राचा: राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार ” श्री देवेंद्र भुजबळ यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. दादासाहेब धनराजजी विसपुते सभागृह ,आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे, नवीन पनवेल- ४१०२०६ येथे शनिवार दि.११ ऑक्टोबर २०२५ दुपारी १.०० वाजता होणार आहे.

श्री देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले. पत्रकार, दूरदर्शन निर्माता, माहिती खात्यात अधिकारी आणि गेली ५ वर्षे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे (www. newsstorytoday.com)
संपादक असे मिळून गेली ४० वर्षे ते प्रसार माध्यमात सक्रिय आहेत.

अल्प परिचय

देवेंद्र भुजबळ यांना प्रसार माध्यमातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार, मान सन्मान प्राप्त झाले आहेत. ४ महिन्यांपूर्वीच त्यांना व्यावसायिक नैपुण्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. आता पर्यंत त्यांची भावलेली व्यक्तिमत्वे, गगनभरारी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता, प्रेरणेचे प्रवासी, अभिमानाची लेणी ( ई पुस्तक ) करिअरच्या नव्या दिशा,( दुसरी आवृत्ती प्रकाशित) समाजभूषण, आम्ही अधिकारी झालो,
( दुसरी आवृत्ती प्रकाशित) माध्यमभूषण ही पुस्तके प्रकाशित झाली असून
संवाद भूषण हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

अजितदादांच्या बारामतीत बावनकुळेंचा चौकार :‘श्री. सावतामाळी सभागृहास 508 चौ मी जमीन दिली नगरपालिकेला

मुंबई
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने बारामती शहराच्या सांस्कृतिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे. मौजे बारामती येथील श्री. सावतामाळी सभागृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली ५०८ चौरस मीटर शासकीय जमीन बारामती नगरपरिषदेला कब्जेहक्काने (भोगवटादार वर्ग-२) प्रदान करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

सिटी सर्वे क्रमांक ९० आणि १२९ मधील एकूण ५०८ चौरस मीटर जमीन नगरपरिषदेला विनामूल्य न देता, चालू बाजारमूल्य वसूल करून हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे शासनाला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि नगरपरिषदेला सभागृह बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध होईल. या जमीन हस्तांतरणासोबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “श्री. सावतामाळी सभागृहाच्या बांधकामामुळे बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. हा प्रकल्प शहराच्या विकासात मोलाची भर घालेल.”


पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर मात

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये पुणे महानगरपालिका क्रिकेट संघाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघावर अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून विजेतेपद पटकविले.पुणे मनपा क्रिकेट संघाने १० षटकात ४ बाद १०८ धावा केल्या. यात कपिल भापकर यांनी १६ चेंडूत ३३ धावा केल्या तर किरण शेवाळे यांनी १४ चेंडूत ३९ धावा केल्या. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाला मात्र अवघ्या ७१ धावा करता आल्या. संघाने ८ विकेट गमावल्या आणि सामना देखील गमावला. यात पुणे महापालिकेच्या अतुल धोत्रे यांनी २ ओव्हर मध्ये ५ धावा देत ३ विकेट घेतल्या. पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनी देखील पुणे मनपा संघाने पिंपरी चिंचवड महापालिका संघाला मात दिली होती.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ७ वा दीक्षांत समारंभ ११ ऑक्टोबर रोजी

पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांच्या हस्ते पदवी प्रदान,६८०० विद्यार्थ्यांना मिळेल पदवी

पुणे ९ ऑक्टोबरः तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती, भागीदारी आणि विश्वशांती यावर आधारित असलेल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ७वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वा. विश्व सभामंडप, वर्ल्ड पीस डोम, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी ६८०० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे आणि परिक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी यांनी दिली.
या समारंभासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार आणि लेखक प्रा.डॉ. राम चरण हे सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
तसेच माईर्सचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, माईर्सच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ आर.एम.चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात श्वेता राजश्री अय्यर हिला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व वेदांगी गुणेश  पाटकर हिला ‘एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडल’  ने गौरविण्यात येणार आहेत. तसेच ११४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ९६ रौप्य आणि ९६ कांस्य पदक असे एकूण ३०६ विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात येणार आहेत. तसेच ३७ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात येणार  आहेत.
डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अ‍ॅण्ड इंजीनियरिंग, रामचरण स्कूल ऑफ  लिडरशीप बिझनेस, ईकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड कॉमर्स, स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड एनवोमेंटन्टल स्टडीज, डिझाइन, लिबरल ऑर्टस, लॉ आणि कॉन्शसनेस या व्यतिरिक्त अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे.

लेखी आश्वासनानंतर रिक्षा-टॅक्सींचा ‘बंद’ मागे :- डॉ बाबा कांबळे यांची घोषणा.

बेकायदेशीर बाईक टॅक्सी व ‘मुक्त परवाना’ धोरणाविरोधात रिक्षा चालकांचे तीव्र निदर्शने; एक दिवसाचा लाक्षणिक संप स्थगित
पुणे/पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी), ९ ऑक्टोबर २०२५: बेकायदेशीर बाईक टॅक्सी आणि ‘मुक्त परवाना’ (Open Permit) धोरणाविरोधात रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांनी पुकारलेला राज्यव्यापी लाक्षणिक बंद आज पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्के यशस्वी झाला. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र विभाग), महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा ब्रिगेड आणि ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. या बंदमुळे शहरातील रिक्षा-टॅक्सी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, मात्र पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हा एक दिवसाचा संप स्थगित करण्यात आला.
लाखो चालकांनी आपल्या ‘अस्तित्वाच्या लढ्याकडे’ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णायक प्रयत्न केला. ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया दिल्ली व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेतेवडॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील हजारो रिक्षा चालक-मालक सहभागी झाले होते.
आरटीओअधिकारी यांच्या आश्वासनानंतर बंद मागे घेण्यात आला,

सकाळपासूनच शहरात रिक्षा-टॅक्सी सेवा बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. दुपारी १ वाजता पुणे येथील आरटीओ कार्यालयात शिष्टमंडळाची बैठक झाली. यावेळी पुणे आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड आणि स्वप्निल भोसले यांच्या सोबत चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा डॉ. बाबा कांबळे यांनी केली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी यावेळी सांगितले की, “रिक्षा चालकांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक आयोजित करून हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” हे आश्वासन लेखी पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या
‘मुक्त परवाना’ धोरणामुळे बाजारात वाहनांची गर्दी वाढल्याने आणि ‘प्रवासी कमी, रिक्षा जास्त’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पारंपरिक चालकांच्या उदरनिर्वाहाचा हक्क धोक्यात आला आहे, असे मत डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केले. या आंदोलनात प्रामुख्याने खालील पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

  • ‘मुक्त परवाना’ (Open Permit) धोरणावर तात्काळ व कायमस्वरूपी बंदी.
  • बेकायदेशीर टू-व्हीलर बाईक टॅक्सींवर संपूर्ण व तात्काळ बंदी.
  • रिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची त्वरित स्थापना (आरोग्य विमा, पेन्शन, अपघात विमा यांसारख्या सामाजिक सुरक्षांसाठी).
  • ओला-उबर सारख्या अॅग्रीगेटर्स प्लॅटफॉर्मवरील दरांचे नियमन: किमान दर (उदा. रिक्षा: ₹१७/किमी) निश्चित करून चालकांचे शोषण थांबवावे.
  • CNG बॉटल टेस्टिंग शुल्क पुन्हा ₹५०० करावे.
    युवा अध्यक्ष शुभम तांदळे यांनी इशारा दिला की, “जोपर्यंत या मागण्यांवर शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालक शांत बसणार नाहीत. शासनाने आमचे प्रश्न तातडीने सोडवावेत आणि परिवहन क्षेत्रातील बदल हे रिक्षा चालक-मालकांच्या अस्तित्वाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तात्काळ उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी.”
    बैठकीस उपस्थित प्रमुख पदाधिकारी
    यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख, युवक अध्यक्ष शुभम तांदळे, कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील, ज्येष्ठ सल्लागार कुमार शेट्टी, सचिव अविनाश वाडेकर, उपाध्यक्ष निशांत भोंडवे, प्रवीण शिखरे, अल्ला बकत शेख, सहसचिव गणेश कांबळे, फिरोज शेख, रमेश इंगळे, राजू शेख, अमित मिश्रा, अशोक तेमगिरे, आदी उपस्थित होते. तसेच, पिंपरी-चिंचवड येथून रिक्षा ब्रिगेड प्रमुख अनिल शिरसाट, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष जाफर भाई शेख, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष विशाल ससाने,सहकार्याध्यक्ष सिद्धार्थ साबळे, विभागीय अध्यक्ष उमाकांत शिंदे, वाकड विभाग अध्यक्ष पप्पू वाल्मीक, डांगे चौक विभाग अध्यक्ष सलिम पठाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.
    शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

‘धंगेकरांना समज द्यावी अन्यथा आम्ही ठोकू…’, भाजप शहर अध्यक्ष घाटेंनी दिला इशारा

धंगेकर ठेकेदारांच्या गराड्यातला ब्लॅकमेलरचंद्रकांत दादा एक सुसंस्कृत नेता

पुणे-निलेश घायवळ प्रकरणी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाटील यांच्या वरदहस्तामुळे कोथरूड मधील गुन्हेगारी फोफावली असल्याचा अप्रत्यक्ष आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर पक्षातील नेते आक्रमक झाले असून त्यांनी ‘धंगेकर यांना समज द्यावी अन्यथा आम्ही ठोकू’, असा इशारा दिला आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे शहरातील गुन्हेगारी प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धंगेकर यांना सडेतोड उत्तर देत कोणालाही शहाणपण शिकवण्याची गरज नाही असे म्हटले आहे.

धंगेकर ज्या पद्धतीने महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत आहे. त्यामुळे त्यांना समजेल अशा पद्धतीत त्यांना शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी अन्यथा आम्ही आमच्या जशास तसे पद्धतीने त्यांना ठोकू अशा शब्दात घाटे यांनी इशारा दिला आहे.वक्तव्य करायचं आणि नंतर मूग गिळून गप्प बसायचं अशी त्यांची अनेक प्रकरणा बघितलं आहेत. ब्लॅकमेलर आहोत अशा पद्धतीने विधान करायचं आणि प्रसिद्धीमध्ये राहायचं ही धंगेकर प्रवृत्ती पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कोणालाही शहाणपण शिकवण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील यांच्यावर होणारी टीका भाजपचा कोणताही भाजप कार्यकर्ता आता खपून घेणार नाही.‘चंद्रकांत पाटील यांच्यावर रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोप बिनबुडाचे असून फक्त ते वैयक्तिक आकसाने केलेले आहेत. फक्त प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी हे आरोप करत आहे.महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड आहे. त्यामुळे धंगेकर यांच्यासारख्या कोण्या एका व्यक्तीने टीका केल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं काही होणार नाही. धंगेकर यांनी काल-परवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये आणि मनसे मध्ये होते त्यामुळे सातत्याने पक्ष बदलण्याचा त्यांचा स्वभाव असून त्यांना अद्याप आपण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलो आहोत याबाबतचा भान राहिलेलं नाही. अशी टीका घाटे यांनी यावेळी केली.

सिटी पोस्टच्या सेवेला शंभर वर्षे झाल्यानिमित्त पोस्टमनचा विशेष सन्मान

पुणे : संवाद, संपर्काची साधने कमी असतानाच्या काळापासून पोस्ट खात्याने अतुलनीय सेवा बजावली असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याचे समाजमनाशी भावनिक नाते जडले आहे. आजच्या आधुनिक काळात माणुसकी, कृतज्ञतेचे महत्त्व कमी होत चाललेले असताना सामान्य माणसाचा जपलेला विश्वास हे शंभर वर्षातील संचित आहे, असे गौरवोद्गार अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.

पुण्यातील सिटी पोस्ट येथील सेवेला शंभर वर्षे होत असल्याचे तसेच जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून बुधवार पेठ येथील साईनाथ  मंडळ ट्रस्ट, भवानी पेठ येथील श्री शिवाजी मित्र मंडळ, फडके हौद येथील विधायक मित्र मंडळ, गुरुवार पेठ येथील वीर शिवाजी मित्र मंडळ यांच्यावतीने आज (दि. 9) पोस्टमन तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान प्रा. मिलिंज जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, वरिष्ठ पोस्ट मास्तर विलास घुले, वरिष्ठ अधीक्षक (पश्चिम विभाग) नितीन येवला यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टमनच्या पोशाखात असलेल्या मीरा पियुष शहा हिने कर्मचाऱ्यांचे औक्षण केले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा यांच्या संकल्पनेतून आणि प्रल्हाद थोरात, अभिषेक मारणे, शिरीष मोहिते, किरण सोनीवाल यांनी सिटी पोस्ट ऑफिस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोस्टमन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्याविषयी कौतुक व्यक्त करून प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, काळानुरूप बदल स्वीकारल्याने पोस्ट विभाग आज टिकून आहे. कामाप्रती सचोटी आणि प्रामाणिकपणा हे पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, कर्मचाऱ्यांनी सेवेला श्रद्धेची जोड दिल्याने पोस्ट विभागाची उपयुक्तता आजही टिकून आहे. गणेशोत्सवाने काळानुरूप बदल स्वीकारले त्याच प्रमाणे पोस्ट विभागानेही आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने त्याचा निश्चितच उपयोग झाला आहे. आनंद सराफ म्हणाले, पोस्ट कर्मचारी हा जिव्हाळ्याच्या नात्यांमधील दुवा आहे.

जागतिक टपाल दिन व भारतीय टपाल दिवस आज खऱ्या अर्थाने साजरा झाला, अशी भावना विलास घुले यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची संकल्पना मांडताना पियुष शहा म्हणाले, समाजातील अखेरच्या घटकापर्यंत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मान्यवरांचे स्वागत प्रल्हाद थोरात,  अभिषेक मारणे  , किरण सोनीवाल यांनी केले. अमर लांडे यांनी पोस्टाच्या आवारात सुंदर रांगोळी रेखाटली होती तर जितेंद्र भुरुक यांनी ‌‘डाकिया डाक लाया‌’ हे गीत सादर केले. शाह यांनी आभार मानले

नाविन्यपूर्ण कौशल्यांचे सतत शिक्षण घ्यावे लागेल – एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम

डीईएस पुणे युनिव्हर्सिटीचा पहिला पदवी प्रदान समारंभ उत्साहात

पुणे – तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने, आपल्याला सतत नवीन कौशल्ये आत्मसात करावे लागणार आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कुत्रिम बुद्धीमत्तेचे आव्हान आपल्यासमोर आहे. मात्र, आपल्यासाठी ही संधी आहे. अशा परिस्थितीत नाविन्यतेची कास धरत आगामी काळात स्किलिंग, अपस्किलिंग आणि रीस्केलिंगवर भर द्यावा लागेल, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात प्रा. सीताराम बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, कुलसचिव डॉ. संजीवनी शेळके, परीक्षा संचालक डॉ. महेश गायकवाड उपस्थित होते. या समारंभात एकूण १८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली.

प्रा. सीताराम म्हणाले की, पदवी प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा असतो. यानंतर विद्यार्थ्यांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. आज पदवी मिळवणारे विद्यार्थी हे पुढील पिढीसाठी आदर्श राहणार आहे. या नवीन प्रवासात भरपूर आव्हाने असतील आणि काही ठिकाणी अपयश येईल. मात्र, आत्मविश्वासाने मार्गक्रमण केल्यास, नक्की यशस्वी व्हाल. देशात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू असल्याने, विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एन्ट्री आणि एक्झिटची सुविधा मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण घेतलेल्या शिक्षणाचे क्रेडिट अॅकेडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतात. या फायदा उच्चशिक्षणासाठी होत असून, ही फार मोठी उपलब्धी आहे. एआयसीटीईने विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण आणि संशोधनासाठी स्वयं प्लस, एज्युटेक कोर्स, आयडीया लॅब्सटी निर्मिती केली आहे.

डॉ. आचार्य म्हणाले की, डीईस पुणे युनिव्हर्सिटीचा पहिला पदवी प्रदान समारंभ असल्याने, विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाले असले, तरी आपल्याला पुढील जीवनातही विद्यार्थी बनून नवे तंत्रज्ञान आणि कौशल्यांना आत्मसात करावे लागेल. त्याचप्रमाणे नैतिकतेने सेवा करायची असून, आपल्या संस्कृतीशी जुळून राहायचे आहे. आपल्याला मिळालेले पदवी हे केवळ शिक्षण नसून, जबाबदारी आहे. या भावनेने समाजासासाठी काम करण्याची जाणीव ठेवा, असे डॉ. आचार्य यांनी सांगितले. डॉ. राजेश इंगळे यांनी विद्यापीठाचा आढावा सादर करीत, विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. गायकवाड यांनी आभार मानले.

देशात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २६ कोटी आहे, तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या ४ कोटी आहे. हे विद्यार्थी १४०० विद्यापीठे आणि ४० हजार महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहे. सरकारकडून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी विविध सरकारी योजना आखण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठांची संख्या आपल्याला दुप्पट करावी लागेल, अशी माहिती प्रा. टी. जी. सीताराम यांनी दिली.

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी खानवडीत होणार

दशऱथ यादव यांची माहिती
सासवड, दि. ९ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. अशी माहिती संमेलनांचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला मराठा महासंघ पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल भोसले, बदाम अण्णा माकर, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे, सचिन होले, विजय होले, योगेश रासकर, गणेश होले, संतोष डूबल, सनी चव्हाण, किशोर झुरंगे, कैलास धीवर, शिवाजी झुरंगे आदी उपस्थित होते.
या संमेलनात राज्यभऱातून दरवर्षी मोठ्या संख्येने लेखक, कवी, कलावंत सहभागी होतात. सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.

ब्राह्मण युवकांनी उद्योग, व्यवसाय उभारावे – विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे

परशुराम महामंडळाचे कर्ज घेऊन सक्षम व्हा – आशिष दामले

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचा पिंपरीत भव्य सत्कार

पुणे – सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाजाने चांगले काम केले आहे. ते जेथे जातील तेथे लोकांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण करतात. या समाजातील बेरोजगार युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती केली आहे. या महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा लाभ घेऊन युवकांनी उद्योग व्यवसाय उभारून देश विकासात हातभार लावावा असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केले.
विप्र फउंडेशन च्या वतीने प्राधिकरण आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ब्राह्मण समाजातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने दिवाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांचा पुणेरी पगडी, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, राष्ट्रीय विप्र महासंघ अध्यक्ष सुभेदार तिवारी, समन्वयक अनिल शर्मा, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली अध्यक्ष प्रमोद भावसार, सीमा जोशी, ब्राह्मण नारी एकता मंच अध्यक्ष संजीवनी पांडे, सुनील कौशिक, नवीन शर्मा, रवींद्र कौशिक, हरि शर्मा, लवकांत शर्मा, वैभव मोरे आदींसह समाजातील बहुसंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी शिवानी भारद्वाज व दीपिका शर्मा यांनी भजन सादर केले. तसेच परशुरामाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.
सत्काराला उत्तर देताना कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज हा सहिष्णू समाज आहे. पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबातील युवकांना रोजगाराच्या समस्या आहेत. आता परशुराम आर्थिक विकास मंडळास भरघोस निधी मिळाला आहे. युवकांनी स्टार्टअप सुरू केल्यास १५ लाख रुपयांचा व्याज परतावा, भागीदारीत केलेल्या व्यवसायासाठी ५० लाख रुपयांचा व्याज परतावा आणि देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी १० लाख आणि परदेशातील शैक्षणिक कर्जासाठी २० लाख रुपयांचा व्याज परतावा महामंडळाच्या वतीने देण्याचे नियोजन करणार आहे. त्याचा युवकांनी लाभ घेऊन सक्षम व्हावे. जयपूर येथे उभारण्यात आलेल्या परशुराम भवन प्रमाणे राज्यातील सर्व विभागात परशुराम भवन उभारले जावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. कल्याण डोंबिवली येथे जागा मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामंडळाच्या निर्मितीच्या नऊ महिन्यांतच पुण्यात पहिले ब्राह्मण भवन कार्यालय सुरू झाले आहे. भगवान परशुरामांचे नाव कुठेही कमी होऊ देणार नाही. तर समाजाचा अभिमान आणि स्वाभिमान जपला जाईल असे कार्य या महामंडळाच्या वतीने करण्याचा विश्वास दामले यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार उमा खापरे यांनी सांगितले, ब्राह्मण युवक आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे हे महामंडळ स्थापन करून चालना दिली आहे.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज सर्वात स्फूर्तीदायी समाज आहे. या समाजाकडून अनेक गोष्टी शिकता येतात. स्पर्धा परीक्षेत पास होऊन अधिकारी होणारे ब्राह्मण समाजातील लोक जास्त असतात.
माजी महापौर योगेश बहल यांनी सांगितले की, भक्ती शक्ती चौक येथे परशुरामाचे शस्त्र असणाऱ्या “परशु” ची स्थापना करून विकसित केलेले उद्यान सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करू. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत परशुराम भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करू.
या कार्यक्रमाच्या आयोजनात विप्र फाउंडेशन, गौड ब्राह्मण संघठन पुणे, पारीक ब्राह्मण समाज, खंडेलवाल ब्राह्मण समाज, पुना सिखवाल ब्राह्मण समाज, श्री राजस्थानी छ:न्याती विप्र मंडल, राजपुरोहित ब्राह्मण समाज, अखिल ब्राह्मण संघ महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन ब्राह्म समाज, सिद्धिविनायक संस्थान, दाधीच समाज सेवा संघ, बाँड ब्राह्मण संघटन, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, सारस्वत ब्राह्मण समाज, श्रीगौड ब्राह्मण समाज, ११ परगना राजपुराहित समाज, श्री महर्षी गौतम गुर्जरगौड ब्राह्मण सेवा संस्था, समस्त ब्राह्मण समाज व संघटना पिंपरी चिंचवड पुणे यांनी सहभाग घेतला होता.
स्वागत अनिल शर्मा, सूत्रसंचालन शुभम खेडेकर आणि मदनलाल कौशिक यांनी आभार मानले.