पुणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरातील १३ वेगवेगळ्या ठिकाणी १९२ फटाक्यांच्या स्टॉलसाठी ऑनलाइन लिलाव केले. शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द (अग्निशमन केंद्र), हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर (सीझन मॉल), वारजे (आरएमडी कॉलेज), लोहगाव आदी ठिकाणी एकूण १९२ स्टॉलसाठी लिलाव झाले. यापैकी १२५ फटाक्यांच्या स्टॉलचा लिलावात गेलेत आणि यातून महापालिकेला एकूण ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.६७ स्टॉल घ्यायला कोणीच पुढे आले नाही ते तसेच पडून आहेत .शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळील नदीकाठावर असलेल्या ४० स्टॉल्सना सर्वाधिक बोली लागल्या, ज्यापैकी सर्वाधिक बोली ६९ लाख होती.
गुंड निलेश घायवळला मविआ सरकारने फेक डॉक्युमेंट च्या आधारावर दिला पासपोर्ट
पुणे- आज पुण्यातील भाजपा कार्यालयात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून गुंड निलेश घायवळला मविआ सरकारने फेक डॉक्युमेंट च्या आधारावर पासपोर्ट दिला असल्याचा आरोप करण्यात आला या पासपोर्ट मुळे घायवळ पळाला आणि त्याचे खापर मात्र महायुती सरकारवर फोडण्यात येऊ लागले आहे . मविआ सरकारमध्ये तेव्हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होते त्यात यांचा किती सहभाग होता या प्रकाराची चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली . या चौकशीनंतर सारे सत्य बाहेर येईल असाही विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला .आमदार सिध्दार्थ शिराेळे म्हणाले, गुंड घायवळ याच्यावर गंभीर १५ गुन्हे दाखल असताना देखील त्याला सन २०२० मध्ये आहिल्यानगर येथून पाेलिसांचे व्हेरिफिकेशन करुन बनावट कागदपत्रांचे आधारे आणि काेणती गुन्हेगारी पार्श्वभूमी न पाहता पासपाेर्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिला गेला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्री, स्थानिक जामखेडचे आमदार यांनी पाेलीसांवर कशाप्रकारे दबाव निर्माण केला आणि चुकीच्या कागदपत्राआधारे पासपाेर्ट दिला गेला याची सखाेल चाैकशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस सुशील मेंगडे,प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित हाेते. आमदार शिराेळे म्हणाले की, गुन्हेगार नीलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असून याप्रकरणी महायुती सरकारला दाेष दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर काही गाेष्टीचा खुलासा करणे गरजेचे आहे. काेणताही व्यक्ती परदेशात जाताना पासपाेर्ट हा महत्वाचा असताे. घायवळ याच्या पासपाेर्टबाबत माहिती जमा केल्यावर धक्कादायक माहिती समाेर आली.
डिसेंबर २०१९ मध्ये घायवळ याने बनावट कागदपत्रा आधारे पासपाेर्टसाठी अर्ज आहिल्यानगर येथे केला. १५ जानेवारी २०२० राेजी त्याला पासपाेर्ट देण्यात आला. मात्र, पाेलिस व्हेरिफिकेशन रिपाेर्ट वेळी त्याने पुण्यातील काेथरुड येथील रहिवासी पत्ता न देता साेनेगाव, जामखेड,जि.आहिल्यानगर असा चुकीचा पत्ता दिला. त्याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दराेडा, आर्म्स ॲक्ट, मारहाण असे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल हाेते. माेक्काची देखील कारवाई त्यावर करण्यात आली परंतु आपल्यावर काेणते गुन्हे दाखल नाही किंवा आपल्या विराेधात काेणत्या न्यायालयात केस सुरु नाही असे लेखी स्वरुपात सांगण्यात आले आहे.
न्यायालयाकडून परदेशात जाण्यासाठी काेणता प्रतिबंध केला आहे का? याबाबत ‘नाही’ अशी उत्तरे देण्यात आलेली आहे. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत हाेते. त्यामुळे पाेलिसांचा अहवाल हा काेणत्यातरी दबावात दिला गेला असल्याचे स्पष्ट हाेते. जे काेणी वरिष्ठ व स्थानिक पाेलिस अधिकारी हाेते, त्यांच्यावर काेणाचा दबाव आला याची सखाेल चाैकशी करावी. जे दाेषी याप्रकरणात असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्या जे खाेटे चित्र रंगवले जात आहे त्यापेक्षा सत्य परिस्थिती जनतेसमाेर चाैकशीतून समाेर आली पाहिजे.
नेत्याभवती समस्यांची गर्दी झाली…उठा उठा मतदानाचे बटन दाबण्याची वेळ आली…
पुणे-खडकवासला मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादीच्या वतीने अजितदादांनी जनसंवादाचा कार्यक्रम हाती घेतला. या माध्यमातून जनतेच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणं, हीच माझी सर्वोतोपरी भूमिका राहील, असा विश्वास त्यांनी सर्वसामान्यांना दिला. कात्रज चौक येथे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत व वॉटर टँकच्या प्रगतीपथावरील विकासकामाची पाहणी करत माहिती घेतली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.तसंच धायरीतील डी. पी. रोड येथे रस्त्याची पाहणी करत, तेथील गाडी प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेतली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत सुधारित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापुरातील पोलीस निघाला मास्टरमाइंड
1.11 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि इनोव्हा कार जप्त
सांगली- मिरजेत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा मोठा भांडाफोड झाला असून, यामध्ये कोल्हापूर पोलिस दलातील हवालदारच मास्टरमाईंड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून 1.11 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हवालदार इब्रार आदम इनामदार (वय 44, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असून, त्याच्यासह सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि मुंबईतील सिद्धेश म्हात्रे यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी 500 आणि 200 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून त्या खपवण्याचे रॅकेट चालवत होती. मिरजेत व्यवहारासाठी येणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. चौकशीतून समोर आले की, या टोळीचे नेतृत्व स्वतः पोलिस हवालदार इब्रार इनामदार करत होता. त्याने कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीतील ऑफिसमध्ये लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर आणि अन्य उपकरणांच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. इनामदार सध्या कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असल्याने, पोलिस विभागातही मोठी खळबळ उडाली आहे.
महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस वेवरील निलजी बामणी परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी सुप्रीत देसाई याला अटक केली असता त्याच्याकडून 84 बनावट नोटा (500 रुपयांच्या), एकूण 42 हजार रुपये किंमतीच्या सापडल्या. चौकशीतून इब्रार इनामदार याचे नाव समोर आले. त्याच्या कार्यालयातून बनावट नोटा तयार करण्याचे संपूर्ण साहित्य, तसेच कोल्हापूर आणि मुंबईतील इतर साथीदारांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रेला अटक केली. या टोळीच्या ताब्यातून 19,687 बनावट 500 रुपयांच्या नोटा, 429 बनावट 200 रुपयांच्या नोटा, इनोव्हा कार, प्रिंटर आणि स्कॅनर असा 1 कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईची माहिती सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी कोल्हापूर आणि मुंबई दरम्यान बनावट नोटा छापून राज्यभर खपवत होती. प्राथमिक चौकशीत, नोटांचा दर्जा अत्यंत उच्च दर्जाचा असून त्या खऱ्या चलनासारख्याच दिसतात. पुढील तपासातून अजून काही बडे मासे समोर येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.
या ऑपरेशनचं नेतृत्व सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या रुपाली बोबडे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पुनम पाटील, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. तसेच सतीशकुमार पाटील, निवास माने, सुधीर खोंद्रे, अजय पाटील आदी अधिकाऱ्यांचा या मोहिमेत महत्त्वाचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई आणि कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून सुरू असून, या बनावट नोटा टोळीचे इतर संभाव्य संबंध राज्यभरातील विविध गुन्हेगारी नेटवर्कशी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
जागतिक बेघर दिवस साजरा
पुणे :काल १० ऑक्टोबर हा जगात जागतिक बेघर दिवस म्हणून साजरा केला जातो. बेघर निरश्रीत लोकांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने जान्हवी फौंडेशन या संस्थे मार्फत बेघर लोकांसाठी हा दिवस साजरा करताना विविध उपक्रम राबविले. पुणे स्टेशन येथे पुणे महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिवस रात्र निवारा प्रकल्प बेघर निरश्रीत लोकांसाठी चालविला जातो. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) या केंद्र शासन पुरस्कृत अभियान अंतर्गत नागरी बेघरांना निवारा (shelter for urban homeless) या घटकाचा नागरी भागातील बेघर व्यक्तींना सर्व पायाभूत सोई-सुविधासह निवारा उपलब्ध करणे हा उद्देश आहे. या घटकांच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण मा. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली होत आहे. तथापि, सदर घटकाच्या उद्धिष्ट पुर्ततेकामी महानगरपालिका व नगरपरिषद स्तरावर कालबद्ध नियोजन केले जाते.याचाच भाग म्हणून विविध उपक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. दि. १० ऑक्टोबर “जागतिक बेघर दिवस” निमित्त जान्हवी फौंडेशन च्या वतीने,मोलेदिना पार्किंग प्लाझा पुणे स्टेशन येथे बेघर निरश्रीत लोकांसाठी या दिवसाच्या निमिताने या प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात आली. (World Homeless Day)
जागतिक बेघर दिनानिमित्त शाळेतील मुलांमध्ये बेघर लोकां प्रती संवेदनशिलता निर्माण होण्याच्या दृष्टीने बेघरांशी निगडीत विषयांवर महात्मा ज्योतिबा फुले ढोले पाटील रोड पुणे या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शबेनाज बागवान व त्यांच्या सहकार्यने विशेष सहकार्य केले.
जान्हवी फौंडेशन संस्थे मार्फत बेघर निरश्रीत लोकांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांचा आराखडा करणे. लाभार्थीं यांचा कृती आराखडा तयार करून त्यातील लाभार्थी यांना मार्गदशन केले.
बेघरांच्या अनेक ठिकाणीचा सर्वे करून ज्याच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड , जात प्रमाणपत्र, लहान मुलांचे जन्म प्रमाणपत्र, आधार शिबिर आयोजित करून त्यांना कागदपत्र काढून देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या मदतीने आधार कार्ड शिबिर, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र इ चे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण ५५ बेघर लाभार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला.त्यापैकी दोन कुटुंबांतील ६ व्यक्तींची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे,९ व्यक्तींचे आधार कार्ड अपडेट करण्यात आले, २ व्यक्तींना नवीन पॅन कार्ड काढन्यासाठी अर्ज केला,अन्य लोकांची कागदपत्रे अपुरी असल्यामुळे त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शहर अभियान व्यवस्थापक श्री. चंद्रकांत मुळे, महिला व बालकल्याण विभागाचे श्री सुधीर ढाकणे हे उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे बेघर लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या शिबिरास लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
बेघर निरश्रीत लोकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये त्यांची आरोग्य तपासणी व HIV ची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये प्रकल्प चे लाभार्थी सहभागी झाले होते यामध्ये तीन बेघर लोकाना उच्च रक्तदाब (Hypertension) याचे निदान झाले त्यांना मोफत गोळ्या औषधे देण्यात आली व पुढील उपचारासाठी ससुन ला पाठवण्यात आले. तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रकल्प व्यवस्थापक श्री.नीलेश सोनवणे, काळजीवाहक अलिम शेख , श्री ओंकार साळुंखे,श्री प्रदीप जगताप, रेखा बोरकर,किरण कांबळे, चांदू सूर्यवंशी, आशीष कांबळे, मुशीद शेख, शिवाजी धनगर आदि उपस्थित होते .जान्हवी फौंडेशन तर्फे दरवर्षी जागतिक बेघर दिन साजरा केला जातो अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी दिली.
राज ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांसोबत घेणार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट:फडणवीस यांच्यासह, शिंदे, पवारांना निमंत्रण- संजय राऊत
मुंबई – महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने येत्या 14 ऑक्टोबर रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. या भेटीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे हे शिष्टमंडळ जाणार आहे. निवडणूक आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे आणि राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या काही समस्या आहेत, त्या मांडण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली आहे.या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचाही समावेश असून, ही बैठक 14 तारखेला दुपारी 12:30 वाजता होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या काही समस्या आहेत. यात भाजपची देखील समस्या आहे. देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासोबत निवडणूक आयोगासमोर जात भूमिका मांडली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यातील तज्ञ आहेत त्यांनी सहभागी व्हावे. हे काही मविआचे शिष्टमंडळ नाही. राज ठाकरे अद्याप मविआचे घटक नाही पण ते देखील आमच्यासोबत येत आहे. नितीन गडकरी यांच्या मतदारसंघात 3 लाख मते गाळली गेली भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी असे गडकरी यांनी स्वत: सांगितले आहे, ते फार गंभीर आहे. निवडणूक आयोग राजकीय दबावाखाली काम करत आहे, तरीही त्यांना भेटून आपल्या भूमिका मांडाव्या लागतात. राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाणं भिंतीवर डोकं मारण्यासारखे आहे.
संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. निवडणूक आयोग हे संवैधानिक पद आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे. प्रत्येकाच्या काही समस्या आहेत. भाजपच्या देखील काही समस्या आहेत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण दिले आहे. याव्यतिरिक्त महायुतीतल्या दोन्ही पक्षांना आम्ही पत्र पाठवले आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. 14 ऑक्टोबर 12.30 वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या कारवाईत ११ लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे, दि. १० : राज्य उत्पादन शुल्क, पुणे, विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत ११ लाख ८६ हजार १९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क , भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पुणे शहारातील उंड्री येथील अमित कोलोरी गृहनिर्माण सहकारी संस्था या उच्चभ्रू वस्तीतील फेज १ मधील घर क्र. ९०१ येथे छापा टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या २४७ सिलबंद बाटल्या, मद्य वाहतूक व वितरणासाठी टाटा सफारी स्टॉर्मे चारचाकी, एक बुलेट दुचाकी असा सर्व मिळून ११ लाख ८६ हजार १९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. १ चे निरीक्षक श्री. पोटे, दुय्यम निरीक्षक दिनेश सुर्यवंशी, प्रकाश एस. कोकरे तसेच के विभाग निरीक्षक नंदकुमार देवणे, दुय्यम निरीक्षक एस.के. हाके. पी. टी. पडवळ, पी.व्ही. कारंडे तसेच भरारी पथक क्र. २ चे निरीक्षक अशोक शितोळे, दुय्यम निरीक्षक एच. एस बोबाटे तसेच जे विभाग निरीक्षक पांडुरंग पाटील, दुय्यम निरीक्षक सचिन कदम आदींनी भाग घेतला.
गुन्ह्याचा पुढील तपास के विभाग निरीक्षक श्री. देवणे हे करीत आहेत. अवैध मद्य निर्मीती, विक्री तसेच परराज्यातील प्रतिबंधीत विदेशी मद्य बाबत कोणास काही माहिती असल्यास तात्काळ अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.
0000
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी सज्ज व्हा : अजितदादा
पुणे:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी सज्ज व्हा असे आवाहन राष्ट्रवादी चे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
पुण्यातील सिद्धी गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विकास अण्णा पासलकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तसंच . सुभेदार शंकरराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली ४५ माजी सैनिकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी अजितदादा यांनी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा, कार्यसंस्कृती आणि समाजकल्याणाच्या दिशेनं पक्षाची सुरू असलेली वाटचाल याबाबत आजच्या मेळाव्यात माहिती दिली. आणि त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आपलं राज्य सरकार सकारात्मक असून त्या दृष्टीनं पावलं टाकत असल्याचं स्पष्ट केलं.तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचं सांगितलं. याशिवाय पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर जलद गतीनं कामं सुरू असून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, हे देखील स्पष्ट केलं.
अजितदादा पुढे म्हणाले,”आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक कार्यकर्त्यानं सज्ज व्हावं, लोकांशी थेट संपर्क साधावा आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करावं, . शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन प्रगतीची वाटचाल आपल्याला करायची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व नव्या सहकाऱ्यांचा योग्य सन्मान करण्यात येईल आणि त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदाऱ्या दिल्या जातील.पुणे आणि रायगड जोडणारा महत्त्वाचा रस्ता लवकरच सुरू होणार आहे. ज्यामुळे आर्थिक तसंच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचा पराक्रम हा आपला अभिमान आहे, त्यातून प्रेरणा घेऊन पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख अधिक दृढ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीनं, निस्वार्थ भावनेनं आपापली कामं केली, तर महाराष्ट्राच्या विकासाची गती आणखी वाढेल. कारण एक मुठ बनली की, ताकद निर्माण होते आणि हीच ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नव्या यशाच्या शिखरावर नेईल, असा विश्वास या वेळी अजितदादांनी व्यक्त केला.
सदानंद शेट्टी यांची पुन्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी, यावेळी सुजाता शेट्टी अन् भीमराव पाटोळेंनाही घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे: जनता पक्षातून काँग्रेसच्या काळात काँग्रेसकडून महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष पद भूषविलेले, सदानंद शेट्टी नंतर शिवसेनेत आणि पुन्हा काँग्रेस मध्ये आल्यावर आता त्यांनी पुन्हा काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपल्या पत्नी सुजाता शेट्टी, आणि PMT,शिक्षण मंडळ काँग्रेसकडून मिळविलेले भीमराव पाटोळेंनाही काँग्रेस मधून राष्ट्रवादीत आपल्यासोबत नेले आहे.
काँग्रेस मध्ये वारंवार प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले जाते,नेत्यांचा एकमेकांना पायपोस नसतो, काँग्रेस आज ना उद्या ठीक होईल असे वाटत होते पण काँग्रेस आता मूळ हेतूपासून भरकटलेला पक्ष बनला आहे असे शेट्टी समर्थकांनी या पक्ष बदलाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सत्तेशिवाय लोकहिताची कामे करणे मुश्किल होते असेही म्हणणे त्यांनी मांडले आहे.
कोलते पाटील तर्फे भूगाव येथे सुमारे 7.5 एकर जमीनीचे संपादन- 1,400 कोटीचा प्रकल्प
पुणे, 10 ऑक्टोबर 2025: मुंबई आणि बंगळुरूमध्ये वैविध्यपूर्ण स्थानासह पुणे स्थित आघाडीची रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) कंपनीने पुण्यातील भूगाव येथे सुमारे 7.5 एकर जमीनीचे संपादन केल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये सुमारे 1.9 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र आणि सुमारे रु. 1,400 कोटी रु. चे एकूण विकास मूल्य (Gross Development Value – GDV) आहे.
पुण्यातील भूगाव हा भाग नैसर्गिक वातावरण आणि उत्कृष्ट नागरी दळणवळण संपर्क सेवा यांचा मिलाफ असलेले एक आकर्षक निवासी ठिकाण म्हणून उदयास येत आहे. ही जमीन बावधन आणि कोथरूडसारख्या प्रीमियम भागांनी वेढलेली असून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या शेजारी आणि शिवाजी नगर रेल्वे स्थानकाजवळ आहे. याशिवाय, प्रमुख रोजगार केंद्रे जवळच असल्यामुळे हे गृहखरेदीदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनत आहे. हा प्रकल्प शाळा, रुग्णालये, शॉपिंग मॉल्स आणि मनोरंजन केंद्रांचा समावेश असलेल्या सामाजिक पायाभूत सुविधांच्या जवळ स्थित आहे. त्यायोगे या मायक्रो-मार्केटच्या आकर्षणात अधिक भर पडत आहे.
या घडामोडीवर भाष्य करताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील म्हणाले, “भूगावमधील या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या जमिनीच्या थेट खरेदीद्वारे उच्च संभाव्य मायक्रो-मार्केटमध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यातील आमचे स्थान अधिक मजबूत होत आहे. सुधारणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे आणि प्रत्येक ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भूगावमधील आमचे स्थान सुयोग्य नियोजन केलेल्या, मूल्य-आधारित विकास प्रकल्प पुरविण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. बदलत्या जीवनशैलीची आम्हाला सखोल जाणीव आहे. त्यावर आणि तीन दशकांहून अधिक काळ असलेल्या परंपरेवर आधारित हा उपक्रम ‘अधिक चांगले जीवनमान साकारण्यासाठी विचारपूर्वक रचलेल्या समुदायांची निर्मिती’ या आमच्या बांधिलकीला अधिक बळकटी देतो.”
वॅस्कॉन इंजिनीयर्सने मिळविला मुंबईतील महालक्ष्मी येथील 161 कोटी रु. चा पुनर्विकास प्रकल्प
मुंबई, 10 ऑक्टोबर 2025: जवळपास चार दशकांचा वारसा असलेल्या अग्रगण्य EPC आणि रिअल्टी कंपन्यांपैकी एक वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेड (VASCONEQ) ला एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड कडून मुंबईतील महालक्ष्मी येथील हाजी अली पार्क, प्लॉट क्रमांक 9, सौदामिनी इमारतीच्या पुनर्विकासासाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) प्राप्त झाले आहे.
या प्रकल्पाची किंमत 161.18 कोटी रु(GST आणि विमा वगळून) इतकी आहे आणि काम सुरू झाल्यापासून 36 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प वॅस्कॉनच्या पुनर्विकास क्षेत्रातील अनुभवात भर घालत असून मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील त्यांचे स्थान अधिक मजबूत करत आहे.
या घोषणेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वॅस्कॉन इंजिनीयर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन मूर्ती म्हणाले, “एमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेडने आमच्यावर या महत्त्वपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी सोपवल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. हा प्रकल्प आमच्या ऑर्डर बुकला अधिक बळकट करतो आणि मुंबईसारख्या बाजारपेठेत एवढ्या मोठ्या स्तरावरील प्रकल्प पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतेवर ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवतो. आम्ही या प्रकल्पाचे काम ठरवलेल्या गुणवत्तेच्या मानकांनुसार आणि वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करू.”मुंबईत वॅस्कॉनने सांताक्रूझ येथील वॅस्कॉन ऑर्किड्स आणि सांताक्रूझ वेस्ट येथील प्रकाश सीएचएस अशा प्रकल्पांद्वारे आपल्या पुनर्विकास-केंद्रित धोरणाला बळकटी दिली आहे. सांताक्रूझ, पवई आणि इतर मायक्रो-मार्केट्समधील सुरु असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांनी एकत्रितपणे सुमारे 0.4 दशलक्ष चौ.फुट क्षेत्र व्यापलेले आहे. त्यांचे अपेक्षित विक्री मूल्य 1050 कोटी रु. इतके आहे.मुंबईतील सध्याचे आणि नियोजित प्रकल्प आर्थिक वर्ष 27 पर्यंत कंपनीच्या एकूण रिअल इस्टेट पोर्टफोलिओत सुमारे 50 टक्के योगदान देतील अशी अपेक्षा आहे. रिअल इस्टेट पुनर्विकासासोबतच, मुंबई आणि पश्चिम भारतातील EPC संधी देखील सक्रियपणे साधल्या जात आहेत. त्यामध्ये संस्थात्मक आणि पायाभूत प्रकल्पांसाठीच्या टेंडर्समुळे कंपनीच्या दीर्घकालीन ऑर्डर पाइपलाइनमध्ये भर पडत आहे.
पुण्यात सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध; संविधान जागर अभियान समितीची निषेधसभा
पुणे: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत पुण्यात संविधान जागर अभियान समितीच्या वतीने निषेधसभा पार पडली. गोपाळ कृष्ण गोखले चौक येथील कलाकार कट्ट्यावर 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता ही सभा झाली.सभेदरम्यान ‘हल्लेखोरावर कारवाई झालीच पाहिजे’, ‘जातीयवाद मुर्दाबाद’, ‘द्वेषाचे मुर्दाबाद’, ‘भारतीय संविधानाचा विजय असो’, ‘सामाजिक समता जिंदाबाद’, ‘लोकशाही जिंदाबाद’, ‘धार्मिक सलोखा जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, लोकायतच्या निमंत्रक अलका जोशी, काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, जनसंघर्ष समितीचे अॅड. संदीप ताम्हनकर, डॉ. संदीप बाहेती, राष्ट्र सेवा दलाचे प्रशांत दांडेकर, अॅड. संतोष म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
“हा हल्ला व्यक्तीवर नाही, तर न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर आहे” अशी एकमुखी भूमिका उपस्थितांनी मांडली.न्या. कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, “सरकारविरोधात निकाल दिल्यास अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, असा दबाव न्यायव्यवस्थेवर आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून जनजागृती करणे आवश्यक आहे.” तसेच त्यांनी पुणे पोलिसांकडे ‘झीरो एफआयआर’ दाखल करण्याची विनंतीही केली.
गोपाळ तिवारी यांनी म्हटले, “ही घटना न्यायव्यवस्थेला खुल्या आव्हानासारखी आहे. १४० कोटी भारतीयांचा हा अपमान असून, संबंधित हल्लेखोरावर त्वरित कारवाई झाली पाहिजे.”अॅड. संतोष म्हस्के यांच्या मते, “हा हल्ला मनुवादी मानसिकतेतून प्रेरित आहे.”
तर फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार नवीन पिढीत रुजविण्यात कमी पडलो त्याची फळ आपल्या समाजाला फेडावी लागत आहेत अस परखड मत लोकायतच्या समन्वयक अलका जोशीयांनी मांडले. ह्या घटनेचा निषेध हा चौका चौकात होण्याऐवजी सोशल मीडियावर होत आहे याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली. निषेध सभेचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मागणीवर विश्रांतवाडी पोलिसांचा नकार
- पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मध्ये सर्व पक्षीय निषेध आंदोलन
पुणे :

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ तसेच देशात कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न या विरोधात पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन येथे सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. शांतीनगर येथील चौकात उपस्थितांनी घोषणा देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच हल्ला करणाऱ्या राकेश तिवारी या व्यक्तीवर देशद्रोह व सुमोटो अंतर्गत कारवाईची मागणी केली.त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे भेट देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. मात्र आपल्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोचवून असे आश्वासन पोलिसांनी दिले.
या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, आमदार बापू पठारे, पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी नगसेवक ॲड. अय्युब शेख, सागर माळकर, भैय्यासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले, संग्राम रोहम ,अझहर खान , फैयाझ पाशा,, शिवानी माने, डॅनियल मगर, गणेश बाबर, शैलेंद्र मोरे, निखील गायकवाड, सुभाष ठोकले, कैलास गोंधळे, नाना नलावडे, डाॅ साठे , भिमराव वानखेडे आदीसह विविध ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ला होऊनही साधा गुन्हा नोंद होत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे. भविष्यात याचे उत्तर सर्वांनाच देऊ. मात्र शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारधारा मानणाऱ्या प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला पाहिजे. जे निषेध व्यक्त करणार नाहीत त्यांना आता आगामी निवडणुकांमध्ये जाब विचारला पाहिजे. काही लोक हिंदु-मुस्लिम, मराठा-ओबीसी, बौद्ध आणि मातंग असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र संविधानिक मार्गावर नागरिक चालत असल्याने त्याला यश येत नाही, असे अंधारे म्हणाल्या.
आमदार बापु पठारे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ला होणे हा गंभीर गुन्हा असल्याचे नमूद केले. तसेच पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करुन घेणार नाही, हे लेखी द्यावे, अशी मागणी पोलिसांना केली.
या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर बुट फेकण्याची कृती म्हणजे एका व्यक्तीवर हल्ला नाही. तर हा हल्ला न्यायव्यवस्था, संविधान आणि सर्व सामान्य नागरिकांवर केलेला हल्ला आहे. देशातील नागरिक संविधानावर मार्गक्रमण करतात. ज्यांना संविधान मान्य नाही तेच असा हल्ला करत आहेत. हल्ला करणाऱ्या राकेश तिवारीला देशद्रोही ठरवून तत्काळ कारवाई करायला पाहिजे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. तेव्हा संबंधितांवर सुमोटो अंतर्गत कारवाई केली. तशीच कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या तिवारी या व्यक्तीवर करायला हवी, असे डॉ. धेंडे म्हणाले. तसेच तिवारी याचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.
श्रद्धेच्या आड दडलेलं रहस्य… ‘गोंधळ’१४ नोव्हेंबरला
सध्या ‘कांतारा’सोबत थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला ‘गोंधळ’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टिझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली असून चित्रपटाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे.
‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘गोंधळ’ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या २० टक्के प्रदेशात ‘कांतारा’मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार’ला मोठे स्थान आहे. मात्र ‘गोंधळ’ ही परंपरा महाराष्ट्रातील तब्बल ८० टक्के भागात साजरी केली जाते, ही या चित्रपटाची मोठी ताकद आहे.
‘कांतारा’ आणि ‘दशावतार’च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. ‘गोंधळ’ही हाच वारसा पुढे नेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.
आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यांचा सुंदर संगम यात दिसत आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी वेगळंच रहस्य घेऊन येते, असं टिझरमधून दिसते. काही सेकंदांची ही झलक पाहून या चित्रपटाची स्केल, टेक्निकल क्वालिटी आणि सिनेमॅटिक भव्यता स्पष्ट दिसते.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ‘ ‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि श्रद्धेचं दर्शन आहे. ‘कांतारा’ने जसं आपल्या लोककलेला नवा आयाम दिला, तसाच ‘गोंधळ’ महाराष्ट्रातील श्रद्धा, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची.”
डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून चित्रपटाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखर असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पानांच्या ठेल्यावर पडू लागले छापे, १७ लाखाचे तंबाखूजन्य पदार्थ पकडले,५ जणांना अटक
पुणे- येथील पोलिसांनी १७ लाखाचे गुटखा तंबाखुजन्य पदार्थ व गांजा अंमली पदार्थ पकडले आहेत आणि पाच जणांना अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजन चौक, भोला पान शॉप, मदर टेरेसा मंदिर जवळ, नगर रोड पेट्रोलपंप समोर, येरवडा पुणे या पान शॉप चा मालक सुभाषचंन्द्र रामअवध मोर्या, वय ३४ वर्षे रा. येरवडा दर्गे वाडी, गणेश नगर गल्ली नंबर १ येरवडा पुणे, मुळ गांव मु.पो भुतावली, प्रतापगड, उत्तर प्रदेश याचे ताब्यात एकुण १०,११,२४०/- रु किं. चा प्रतिबंधक गुटखा व पान मासाला मिळून आल्याने त्याचे विरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.०९/१०/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस स्टाफ असे चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना वडगांव शेरी पुणे येथे १) श्रवण हनुमाराम गेहलोत, वय ३५ वर्षे, रा. प्लॅट नं ए/६ पिनाक सोसायटी, वडगांव शेरी, पुणे २) लावुराम पकाराम देवासी, वय २५ वर्षे, रा. सदर ३) दिनेशकुमार आचलाराम प्रजापती, वय सदर यांचे ताब्यात कि.रू. ६,४५,३१५/- रु कि.चा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला असा ऐवज मिळून आल्याने तो जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत आनंद हाईटस सर्वे नं २२/६, सैनिकवाडी, सोपाननगर, वडगाव शेरी पुणे येथील सार्वजनिक रोडवर, इसम नामे १) विकी विजय काशीद वय २२ वर्ष रा, ए/ओ गायकवाड सावली हॉटेलचे जवळ, आव्हाळवाडी वाघोली ता, हवेली जि. पुणे याचे ताब्यात कि. रू. ५२,०००/-रु.चा २ किलो १०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांचेविरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर, पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, महिला पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार अजिम शेख, साहिल शेख, आझाद पाटील, मयुर सुर्यवंशी, संदिप जाधव, रविद्र रोकडे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, बबनराव केदार, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, शेखर खराडे, दिनेश बास्टेवाड, मच्छिद्र धापसे, उदय राक्षे, संदिप शेळके, परेश सावंत, प्रफुल्ल मोरे, महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर व साधना पवार यांनी केली आहे.
