Home Blog Page 96

ग्रँड शेरेटन येथील टॅायरुम पब शासनाचे नियम डावलून रात्री दीड नंतर देखील सर्रास सुरूच

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला पर्दाफाश

पुणे- बॉम्बे प्रोहिबीशन अॅक्ट १९४९ मधील कलम ११.३ नुसार व शासन धोरणानुसार रात्री १:३० वाजल्यानंतर कुठल्याही लायसेन्स धारक आस्थापनांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई आहे तरीही आज रात्री दीड नंतर ” टॅायरुम ” या पब मध्ये रात्री उशिरा ३.०० पर्यंत उघडपणे मद्य विक्री होत होती, याबाबत मनविसे पदाधिकाऱ्यांनी तत्काळ उत्पादन शुल्क विभागाच्या मा. नम्रता वाघ यांना तक्रार केली व पार्टी सुरू असताना विहित कालावधी नंतर मद्य विक्री होत असल्याचे व्हिडिओज आणि मद्य खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या, तदनंतर उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड मारून पब बंद केला. आताही रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी कारवाई सुरू होती .

मनविसे सातत्याने पब क्लब च्या गैरप्रकारांबाबत आक्रमकपणे आवाज उठवत आहे, या आधी देखील सदर पब विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे तरीही आज देखील ह्या “टॅायरुम” मध्ये कायद्याचा भंग करून सुरू असलेल्या मद्य विक्री सर्रास होती ही बाब मनविसेने प्रशासनास निदर्शनास आणून दिली.तरी या टॅायरुम आस्थापनेवर उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ कठोर कारवाई करून हा पब कायमचाच सिल करावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

यापुढेही मनविसे अशा पब क्लब मधील गैरप्रकाराविरोधात आक्रमकतेने लढा देणार आहे.आज शहर अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे,विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, निलेश जोरी, संतोष वरे, विभाग सचिव मयुर शेवाळे, उपाध्यक्ष तेजस उमाप व मोठ्या संख्येने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

अबब.. ऑनलाईन माध्यमाद्वारे तब्बल ३ कोटी ६६ लाखाची फसवणूक

पुणे- सायबर फसवणुकीच्या जाळ्यात हळूहळू असंख्य लोक अडकून फसविले जात असून हडपसर येथील एकाला शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली आमिष दाखवून ऑनलाईन माध्यमाद्वारे तब्बल ३ कोटी ६६ लाख ४४ हजाराला सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

एका ५२ वर्षीय व्यक्तीने या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. १५ जुलाई ते ७ ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे (९९२३७९६५८७) या अधिक तपास करत आहेत.

नवकार आर्ट फाऊंडेशन आयोजित चित्र प्रदर्शनाला बालगंधर्व कलादालनात सुरुवात

पुणे : कला जोपासण्यासाठी वयाचे बंधन नाही. उद्योग-व्यवसायात राहून अनेकांनी कला जोपासली आहे. जीवनाकडे कसे बघावे याचा वस्तुपाठ कलेतून मिळतो, असे प्रतिपादन कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले. कलाकारांमधील कलेला प्रोत्साहन दिल्याशिवाय समाजात कलाकारांची संख्या वाढणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

नवकार आर्ट फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील 40 चित्रकारांनी रेखाटलेल्या 90 चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि. 12) कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, सुरेश लोणकर, सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, आनंद दरबारचे संस्थापक बाळासाहेब धोका, जैन अल्पसंख्याक विकास आणि आर्थिक मंडळाचे संदीप भंडारी, वंचित विकासचे अध्यक्ष विजय मारलेचा, उद्योजिका राजश्री पारख, संयोजक मनसुख छाजेड, प्रेरणा नहार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शन 14 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.

प्रेरणा नहार, कीर्ती ओसवाल, संजय संचेती, प्रतिभा दुगड, रोशनी नहार, सतिश दुगड, मनोज नहार, अनुज नहार यांनी संयोजन केले आहे.

महाराष्ट्रातील 60 चित्रकारांच्या 200 चित्रांमधून 90 चित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनात 23 महिला, 7 पुरुष आणि 10 बाल कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे संयोजक मनसुख छाजेड यांनी प्रास्ताविकात सांगितले. कलाकारांसाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

प्रदर्शनातील चित्रांची पाहणी केल्यानंतर कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, कलाकारांनी सुंदर चित्रे रेखाटली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र बघितले की मनात शौर्याची, देव-देवतांची चित्रे बघितली की भक्तीची, निसर्गाची चित्रे बघितले की सौंदर्याची अनुभूती येते.

दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे राजश्री पारख यांनी कौतुक केले.

मुरली लाहोटी म्हणाले, चित्रकाराचे चित्र बोलते, लेखकाचा लेख बोलतो तर कवीची कविता बोलते. यातूनच पुढे इतिहास घडतो. सुरेश लोणकर यांनी चित्रकारांच्या कलेचे कौतुक केले.

कला समाजाला जोडण्याचे काम करते असे सांगून संजय नहार म्हणाले, नवकाराचा उच्चार केला की मांगल्याचे विचार मनात येतात. मांगल्याच्या भावनेतून सुरू असलेले उपक्रम अभिनंदनीय आहेत. बाळासाहेब धोका, राजेंद्र मेहता, संदीप भंडारी, विजय मारलेचा यांनी मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचा सत्कार मनसुख छाजेड, पलक देसरडा, मनोज पवार, रोशनी नहार, कीर्ती ओसवाल, अमिता देसाई, अर्चना शहा, सतीश दुगड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा दुगड यांनी केले तर आभार अनुज नहार यांनी मानले.

एमआयटी एडीटी विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन साजरा

सेंट तेरेसा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर

लोणी-काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य दिनानिमित्त सेंट तेरेसा स्कूल, लोणी-काळभोर येथे “मानसिक आरोग्याची संवेदनशीलता” या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले.

शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणारा मानसिक ताण, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त तणाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवरील उपाय तसेच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी पालक व शिक्षक यांची भूमिका या विषयांवर या पथनाट्यातून महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मोबाईलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणारे व्यायाम व प्राणायाम आदींची माहितीही या सादरीकरणातून देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे उपस्थित चिमुकल्यांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

सेंट तेरेसा स्कूलचे मुख्याध्यापक विनय सुकुल आणि उपमुख्याध्यापिका सॅलविना सुकुल यांचे या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य लाभले. तसेच शाळेचा शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे सर्व प्राध्यापक व छात्र-अध्यापक यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड आणि कुलगुरू डॉ. राजेश एस. यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि अधिष्ठाता डॉ. प्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. डॉ. नीता म्हवाण यांनी कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून काम पाहिले.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1483 पंचायत सचिव पदांसाठी भरती; फी 100 रुपये, पगार 50 हजारांपेक्षा जास्त

तामिळनाडू ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने १,४०० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट tnrd.tn.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता:

  • दहावी पास
  • किमान आठवीपर्यंत तमिळ भाषेत शिक्षण घेतलेले असावे.

वयोमर्यादा:

  • किमान: १८ वर्षे
  • कमाल: ३२ वर्षे
  • अनुसूचित जाती, जमाती, अपंग, विधवा: १८ – ३७ वर्षे
  • माजी सैनिक, जनरल: १८ – ५० वर्षे

पगार:

दरमहा ₹१५,९०० – ₹५०,४००

निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी

शुल्क:

  • सर्वसाधारण, मागासवर्गीय: १०० रुपये
  • एससी, एसटी, पीडब्ल्यूडी: ५० रुपये

अर्ज कसा करावा:

  • अधिकृत वेबसाइट tnrd.tn.gov.in ला भेट द्या.
  • “भरती → पंचायत सचिव २०२५” वर क्लिक करा.
  • कागदपत्रे अपलोड करून फॉर्म भरा.
  • फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती जपून ठेवा.

https://tnrd.tn.gov.in

https://tnrd.tn.gov.in/project/Recruitment_Report/ps_communal_category_wise_vacancy_details_roaster.php

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी चित्रपटाच्या टिझरच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानांच त्यांची उत्कंठा शिगेला पोहचविणारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका दिमाखदार कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी रोचक कल्पना असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलरही अंगावर शहारे आणणारा असाच झाला आहे. द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्हची निर्मिती असलेला हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

चित्रपटाच्या या ट्रेलर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रखरपणे मांडणारा चित्रपट आहे. महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना मनात जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत. शेतकऱ्यांचा विषय अशा पद्धतीने मांडणं हे धाडसाचं काम आहे आणि हे धाडस आजच्या घडीला फक्त महेश मांजरेकर करु शकतात हेही तितकंच खरं आहे. आातापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेल्या कलाकृती या इतिहासावर आधारित होत्या. परंतू हा चित्रपट इतिहास आणि वर्तमानाच्या सुरेख संगमावर उभा राहून शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आहे. या चित्रपटाला प्रेक्षक उचलून धरतील यात शंकाच नाही.”

या प्रसंगी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘’शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयाचा सखोल अभ्यास करताना मला जाणवलं की, यावर काहीतरी करायलाच हवं. समाजासमोर हा प्रश्न मांडायला हवा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना घेऊन एक चित्रपट करण्याचा विचार करत होतो आणि त्या प्रक्रियेत या चित्रपटाची निर्मिती झाली. सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे.”

याप्रसंगीझी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ”महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओजचं नातं खूप घट्ट आहे. त्यांच्यासोबत झी स्टुडिओजचा हा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आजच्या काळातील रुप बघायला मिळणार आहे. हा चित्रपट अतिशय महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि मनोरंजन विश्वात एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आहे. या ट्रेलर लाँचसाठी माननीय राज ठाकरे यांनी वेळ दिला, यासाठी त्यांचे मनापासून आभार.’’

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ बोडखे म्हणाले की , महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. यात शिवरायांचं प्रचंड संतप्त आणि उद्विग्न रूप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागला अर्थात त्यात महेश मांजरेकर सरांची खूप मदत झाली. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल असा ठाम विश्वास आहे.”

चित्रपटात इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी याची निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

सावधान,पुरंदर विमानतळाच्या परिसरात जमिनी घेऊ नका

पुणे -जिल्ह्यातील पुरंदर या विमानतळ परिसरात काही नागरिक जमिनीची खरेदी-विक्री करण्यासाठी परस्पर लेआउट पाडत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अशा लेआउटला महसूल विभागाकडून मंजुरी दिली जाणार नाही. नागरिकांनी असे व्यवहार टाळून फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.विमानतळासाठी ९० टक्के जागेचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. उर्वरित १० टक्के जागाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे.

पुण्यात भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठकीसाठी आले असता, महसूल मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर विमानतळाबाबत चर्चा सुरू असली तरी, आता भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन ९० टक्के जागा ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र, याच दरम्यान काही दलालांकडून जमिनीचे लेआउट करून ते नागरिकांना विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात महसूल विभागाकडे तक्रारी आल्या असून, अशा लेआउटला मंजुरी दिली जाणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बावनकुळे यांनी जमिनीच्या मोजणीसंदर्भातही माहिती दिली. राज्यात जमिनीच्या मोजणीची सुमारे साडेतीन कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत. याचा निपटारा करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांप्रमाणे खासगी परवानाधारक भूमापक नियुक्त केले जाणार आहेत. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून, याबाबतची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित जमीन मोजणीच्या प्रकरणांना गती मिळेल, तसेच मोजणी करूनच खरेदीखत केल्यास पुढील कायदेशीर अडचणी टाळता येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमधून आणलेल्या तरुणींकडून वेश्याव्यवसाय दोघींची सुटका, दलाल अटकेत

0

आंबेगाव पठार भागात गुन्हेगारीचे वाढते साम्राज्य


पुणे–भारती विद्यापीठ पोलिसांनी ब्युटी पार्लरमध्ये कामाचे आमिष दाखवून तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका दलालाला अटक केली आहे. या कारवाईत पश्चिम बंगालमधील दोन तरुणींची सुटका करण्यात आली. दोन वर्षांच्या छळानंतर संधी मिळताच तरुणींनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यांना सोडवले.राजू चिद्रवार-पाटील (वय २५, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा हिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती फरार आहे. एका २२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी राजू आणि त्याची पत्नी मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते.

या तरुणींना पश्चिम बंगालमधील त्यांच्या गावातून पुण्यात आणण्यात आले. मात्र, त्यांना ब्युटी पार्लरमध्ये काम न देता वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तरुणींनी नकार दिल्यावर त्यांना डांबून ठेवले, धमकावले, शिवीगाळ केली आणि मारहाण करून त्यांचा छळ केला. त्यांना उपाशीही ठेवण्यात आले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून पैसे घेत होते.

गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार भागात आणलेल्या एका तरुणीने संधी साधून तिच्या मोबाईलवरून पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला. या माहितीनंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाला तरुणीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी छापा टाकून आरोपी चिद्रवारच्या ताब्यातून फिर्यादी तरुणीसह दोन्ही पीडित तरुणींची सुटका केली. पोलिस निरीक्षक खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर — डॉ. नीलम गोऱ्हे

बार्बाडोस, ११ ऑक्टोबर २०२५
राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या (Commonwealth Parliamentary Association – CPA) 68 व्या जागतिक अधिवेशनाचा आज बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झाला. या अधिवेशनात जगभरातील सुमारे २० ते २२ देशांतील संसद सदस्य आणि ३०० च्या पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नांवर देखील चर्चा झाली. डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी नमूद केले की — “एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक घटक, विशेषतः दिव्यांग नागरिक, समानतेने आणि सन्मानाने सहभागी होतात.” त्यांनी महिलांविरुद्ध हिंसा व भेदभावावरील पुर्ण वर्ज्य (Zero Tolerance )धोरणाची गरज अधोरेखित करत अंमलबजावणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
शेवटच्या दिवशी परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व डॅा.नीलम गोर्हे यांनी केले
आपल्या परिषदेतील अनुभवाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की या अधिवेशनात सहभागी होणे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अनुभव होता. विविध देशांतील प्रतिनिधींशी संवादातून लिंग समानता, महिला आरक्षण,लोकशाही सुदृढीकरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबत नवे दृष्टिकोन समोर आले.
या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती हरिवंश यांच्या भाषणाचे सर्व उपस्थित सदस्यांनी कौतुक केले
.बार्बाडोसच्या पंतप्रधानां श्रीमती मिया मोटली व अध्यक्ष मा. श्रीमती सॅंड्रा मेसन यांचे विचार ऐकतां आली.
नताशा अशगर ,साऊथ वेल्शच्या पुर्व वेल्श कॅाझर्हेटिवह्व पक्षाच्या खासदार , श्री. जुआन वॅाटरसन एसएचके , हाऊस अॅाफ किज, हा ईंग्लडच्या स्वायत्त आयलॅाफ मॅन प्रदेशचे अध्यक्ष, त्रिनिदाद व टोबॅगोचे सिनेटचे अध्यक्ष वडे स्टिफन मार्क यांच्या समवेत चर्चा व संवाद झाला.

`दामिनी` पुन्हा येतेय नव्या रूपात, नव्या दिमाखात!

`सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी` हे गाणं घराघरांत वाजलं कि, घरातला प्रत्येक जण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासमोर हजर व्हायचा आणि `दामिनी` या मालिकेमध्ये गुंतून जायचा. दूरदर्शन सह्याद्रीवरची पहिली दैनंदिन मालिका `दामिनी`… पाच वर्षांचा कालावधी, १५०० एपिसोड्स, अनेक गुणी कलाकार, तंत्रज्ञांचा सहभाग आणि… प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम.

`दामिनी` ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला. प्रतीक्षा लोणकर, क्षिती जोग या अभिनेत्रींनी आधी या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या. सुबोध भावे आणि क्षिती जोग यांची या मालिकेतील जोडीही गाजली. आता तीस वर्षांनी, या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात, नव्या दिमाखात पुन्हा त्याच वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. `दामिनी 2` मध्ये किरण पावसे ही साताऱ्याची अभिनेत्री मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्यासह पुण्याचा ध्रुव दातार हा अभिनेता नायकाच्या भूमिकेत आहे.

येत्या १३ ऑक्टोबरपासून, सायं ७.३० वा. `दामिनी २.०` ही मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे. ही दामिनी आता नव्या रूपात, नव्या उत्साहात दाखल होणार असली, तरी तिची प्रेरणा, ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द तीच आहे. आपल्या आजीचा वारसा घेऊनच ही दामिनीही पत्रकारितेच्या नव्या क्षेत्रात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. ध्रुव दातार हा अभिनेता या मालिकेतून नायकाच्या भूमिकेत झळकत आहे. नव्या दमाच्या कलाकारांबरोबरच आधीच्या `दामिनी` मालिकेतील सुबोध भावे आणि क्षिती जोग, हे कलाकारही या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आधीच्या मालिकेवर प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं, तसंच या मालिकेवरही करतील, असा विश्वास सगळ्यांना आहे.

मूळ संकल्पना स्व. गौतम अधिकारी, मार्कंड अधिकारी यांची आहे. कांचन अधिकारी यांनी कथा, पटकथा लेखन आणि मालिका दिग्दर्शन केले आहे. विठ्ठल डाकवे हे एपिसोड दिग्दर्शक आहेत. कथाविस्तार आणि संवादलेखन अभिजित पेंढारकर यांचे आहे. मुंबई दूरदर्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.

दामिनी २.०, मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, सोमवार ते शुक्रवार सायं ७.३० वा. प्रसारित होणार आहे .

काँग्रेसने देशातील लाखो गरिबांना जमिनी दिल्या पण मोदी सरकारने गरिबांच्या जमिनी हिरावून लाडक्या अदानीला दिल्या.

भाजप कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केलेल्या मामा पगारेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर घेऊन स्टेजवर नेत संविधानाची प्रत देऊन केला सन्मान

सरन्यायाधीश गवई व मामा पगारेंवरील हल्लामागे मनुवादी प्रवृत्ती, हुकूमशाही व मनुवादी वृत्तीला चोख उत्तर द्या.

मुंबई, दि. ११ ऑक्टोबर २०२५.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीतून लाखो भूमिहिनांना जमीन मिळवून दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

कल्याण येथील अदानीच्या सिमेंट कंपनीला स्थानिकांचा विरोध असून त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईचे वितानतळ, धारावी, मदर डेअरी, देवनारची जागा मोदी सरकारने लाडक्या मित्राला दिली, त्यानंतर वाढवण बंदराच्या नावाखाली पालघर देऊन टाकले व आता कल्याणमधील ४५० एकर जमीन राष्ट्रीय शेठच्या सिमेंट कंपनीसाठी दिली. फक्त जमीनच दिली नाही तर या सिमेंट कंपनीसाठी पर्यावरणासह सर्व नियमच बदलून टाकले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. ही सिमेंट कंपनी स्थानिकांच्या जीवावर उठलेली असून स्थानिकांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी, दबाव आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवला आहे. या प्रश्नी काँग्रेस पक्ष विधानसभेतही आवाज उठवेल, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले.

सरन्यायाधीश व पगारे मामांवर हल्ला करणारी प्रवृत्ती मनुवादी..
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई व कल्याणचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते पगारे मामा यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही मनुवादी आहे. या मनुवादी वृत्तीला न घाबरता चोख उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हात लावण्याचे धाडस कोणी केले तर त्याच्यापाठीमागे सर्वशक्तिनीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली. यावेळी पगारे मामा यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी खांद्यावर उचलून स्टेजवर नेले आणि देशाचे संविधान, गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन सत्कारही करण्यात आला.

उल्हासनगर काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड, गणेश पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, अजिंक्य देसाई, कल्याण शहराध्यक्ष सचिन पोटे, राजाभाऊ पातकर, उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आदी उपस्थित होते.

रोहित पवारांची जोरदार टीका, ‘सचिन घायवळ’चे नाव घेतानाचा फडणवीसांचा व्हिडिओ दाखवला

पुणे-निलेश घायवळला कोणाचा राजकीय पाठिंबा आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ माध्यमांना दाखवला. या व्हिडिओत एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन घायवळचे नाव घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी सचिन घायवळ मंचावर उपस्थित असल्याचा व्हिडिओ देखील रोहित पवार यांनी दाखवला. तसेच भाजप गुंडांच्या समर्थनात मैदानात उतरल्याचा आरोप केला.

या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेतले, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे निलेश घायवळशी संबंध असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेत, घायवळला मविआ सरकारच्या काळात पासपोर्ट मिळाला असून, स्थानिक आमदार रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव आणला नाही ना? असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

भाजपच्या या आरोपानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. “गुंडाच्या समर्थनात भाजप मैदानात आहे,” अशी टीका करत त्यांनी निलेश घायवळसारख्या गुन्हेगारांना भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीच्या काळात असे प्रकरण घडले असते, तर भाजप नेते आक्रमक झाले असते, पण आता ते शांत आहेत, असे पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावरही टीका केली. शिरोळे यांना अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जाते, पण त्यांनी नेत्यांनी पाठवलेला कागद वाचत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या अभ्यासाच्या अभावामुळे त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, असे पवार म्हणाले.

आपल्या आरोपांना बळकटी देण्यासाठी रोहित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ माध्यमांना दाखवला. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राम शिंदे यांच्या प्रचार सभेत फडणवीस यांनी निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याचे नाव घेतले होते आणि सचिन घायवळ त्यावेळी मंचावर उपस्थित होता, असा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेतोय असे म्हणत नाही. राम शिंदे यांनी जी नावे दिली, ती नावे तिथे वाचून दाखवली. यानंतर रोहित पवार यांनी एका प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिन घायवळ याचे नाव घेताना माध्यमांना दाखवले. सचिन घायवळचे नाव देवेंद्र फडणवीस घेत असतील, आणि केवळ माझ्यासोबत सचिन घायवळचे फोटो आहेत म्हणून टीका करायची, तर असले भाजप प्रमाणे खालच्या लेव्हलचे राजकारण आम्ही करत नाही, असे रोहित पवार म्हणाले.

सुमारे 7,000 प्रवाशांना सामावून घेण्यासाठी तयार केलेल्या, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील नवीन, अत्याधुनिक यात्री सुविधा केंद्राची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी


देशभरातील इतर स्थानकांवरही अशाच प्रकारची यात्री सुविधा केंद्रे विकसित केली जातील: अश्विनी वैष्णव

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2025

देशातील सर्वात वर्दळीच्या टर्मिनल्सपैकी एक असलेल्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या अनुभवात लक्षणीय वाढ करण्यासाठी, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील (एनडीएलएस) नव्याने बांधलेल्या यात्री सुविधा केंद्राची (कायमस्वरूपी क्षेत्र) पाहणी केली. हे केंद्र कोणत्याही वेळी अंदाजे 7,000 प्रवाशांना सामावून घेण्यासाठी तयार केले आहे. या केंद्रामुळे बोर्डिंगपूर्वी आराम आणि स्थानकावरील गर्दीचे नियोजन यात लक्षणीय वाढ होणार आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले, “नवीन विकसित केलेले अत्याधुनिक यात्री सुविधा केंद्र सणासुदीच्या  काळात प्रवाशांना सुविधा देईल कारण या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ होते.  देशातील इतर स्थानकांवरही अशा प्रकारची यात्री सुविधा केंद्रे  विकसित केले जातील.” 

प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उत्तर रेल्वेने केंद्राला व्यापक, आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • तिकीट वितरण: 22 आधुनिक तिकीट काउंटर आणि 25 स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन
  • क्षमता आणि आराम: 200 प्रवाशांसाठी बसण्याची क्षमता आणि वातानुकूलित अनुभवासाठी/ परिसर हवेशीर राहण्यासाठी 18 हाय व्हॉल्यूम लो स्पीड (HVLS) पंखे.
  • स्वच्छता आणि पाणी: 652 चौरस मीटरवर बांधलेला समर्पित शौचालय ब्लॉक, आरओ-आधारित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
  • माहिती आणि सुरक्षितता: 24 स्पीकर्ससह एक मजबूत प्रवासी घोषणा प्रणाली, तीन एलईडी इलेक्ट्रॉनिक ट्रेन माहिती डिस्प्ले आणि आधुनिक अग्निशमन यंत्रणेच्या 7 युनिट्स

अल्पवयीन मुलीचा विनयभंग:२४ तासांत आरोपीवरील दोषरोपपत्र केले दाखल

पुणे- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला पकडून २४ तासांत त्याचेवरील चार्जशीट हडपसर पोलिसांनी कोर्टात दाखल केले .आणि गतिमान तपासाची झलक प्रतीत केली .हडपसर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी संबधित गंभीर गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवून, सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे गोळा केले. पुरावे भक्कम करून केवळ २४ तासांच्या आतच आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

दिनांक ०९/१०/२०२५ रोजी यातील फिर्यादी माळवाडी येथून गाडीतळ हडपसर असा प्रवास करीत असताना अग्रवाल स्वीट, सोलापूर रोड, गाडीतळ हडपसर पुणे येथे एका रिक्षामध्ये बसल्या असता रिक्षाचालकाने फिर्यादी यांना घाणेरड्या व अश्लिल पध्दतीने हात लावला. या कृत्यामुळे फिर्यादीच्या मनास तीव्र लज्जा उत्पन्न झाली. सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र. नं ८६६/२०२५ भा. न्या. सं.क. ७४ सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन, आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे)निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेड व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले.
तपास पथकाने घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर संशयीत आरोपी शैलेश गुंडराव पाटील वय २९ वर्ष रा. मांजरी पुणे याची ओळख पटवून त्यास ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, पोलीस उप-निरीक्षक सत्यवान गेड, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अमित साखरे, बापु लोणकर, अभिजीत राऊत, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, विनोद शिर्के, संभाजी म्हांगरे, स्वप्नाली मोरे, मिरा रंदवे, साधना राठोड, पुनम खामकर व अमोल जाधव यांनी केली आहे.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मुलींच्या वसतिगृहाचे सोमवारी उद्घाटन

पुणे: विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने ३३६ मुलींसाठी उभारलेल्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन येत्या सोमवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता लजपत विद्यार्थी संकुल, विद्यार्थी साहाय्यक समिती, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे होणार आहे. अमेरिकास्थित देणगीदार विभावरी आणि गिरीश गायतोंडे या दाम्पत्याच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी विश्वस्त मंडळातील तुकाराम गायकवाड, संजय अमृते, रत्नाकर मते, प्रभाकर पाटील, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

तुषार रंजनकर म्हणाले, “ग्रामीण भागातील गरजू मुलामुलींकरिता अल्पदरात निवास-भोजन व व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या विद्यार्थी साहाय्यक समितीची आजमितीला आठ वसतिगृहे झाली असून, पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या १४०० वर गेली आहे. ३३६ मुलींकरिता अत्याधुनिक सोयींनी युक्त असे हे वसतिगृह संस्थेच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात उच्च शिक्षण घेताना अल्पदरात निवास, भोजन देताना, त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम गेल्या ७० वर्षांपासून सुरु आहे. अहिल्यानगर येथे मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह यावर्षीपासून सुरू झाले आहे. तसेच महिला सेवा मंडळाच्या सहकार्याने कर्वेनगर येथेही मुलींचे वस्तीगृह सुरू करण्यात आले आहे.”

तुकाराम गायकवाड म्हणाले, “समितीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले आहे. समितीची वसतिगृहे खऱ्या अर्थाने युवा परिवर्तनाची केंद्रे आहेत. कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ समाजाच्या आर्थिक मदतीवर इतकी वर्षे हे काम सुरू आहे. निस्पृह भावनेने वेळ देणारे कार्यकर्ते, व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे हे शक्य होते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा ही संस्थेची त्रिसूत्री आहे. समितीमध्ये विद्यार्थ्यांना कमवा व शिका, चारतास काम करावे लागते. येथील सर्व कामे विद्यार्थी-विद्यार्थिनीच करतात.”

गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी, शेतमजूर पालकांना आपल्या मुली शिकाव्यात असे वाटू लागल्याने त्यांचा पुण्याकडे येण्याचा कल वाढला आहे. परवडणारा खर्च आणि सुरक्षितता यामुळे समितीत प्रवेश मिळावा अशी सर्वाची इच्छा असते. त्यामुळे पुण्यात मुलींसाठी अजून एक वसतिगृह बांधण्याचा संकल्प संस्थेने केला आणि दोन वर्षात ही इमारत पूर्ण झाली. त्यामुळे ३३६ विद्यार्थिनींची व्यवस्था वाढली आहे, असे संजय अमृते यांनी सांगितले.

प्रभाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समितीमध्ये विद्यार्थी विकास केंद्रांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. रत्नाकर मते समितीच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. तसेच समितीमार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी सांगितले.