Home Blog Page 95

गुजरातमधील पाचवीतला इशित भट्ट पहा kbc मध्ये कसा बोललाय बिग बीं बरोबर

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिएलिटी शोमध्ये काही ज्युनियर्स त्यांची हुशारी दाखवणार आहेत. केबीसी ज्युनियर सुरू झालं असून अतिशय हुशार असलेली छोटी मुलं हॉटसीटवर बसताना दिसत आहेत.त्यांच्या हुशारीने बिग बी आश्चर्यचकित झाले. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एका भागात गुजरातचा इशित भट्ट सहभागी झाला होता. पण, वयाने मोठ्या असलेल्या आणि एका दिग्गज अभिनेत्यासमोर इशित त्याच्या अकलेचे तारे तोडताना दिसला. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


केबीसीमधील इशितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनीही ट्रोल केलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत “बोलायला काहीच नाही, स्तब्ध आहे” असं म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत “त्या मुलाला दोन कानाखाली द्यायच्या होत्या”, असं म्हटलं आहे.
यामध्ये हॉटसीटवर बसलेला इशित बिग बींशी उद्धटपणे बोलताना दिसत आहे. नवीन स्पर्धक हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बी त्याला खेळाचे नियम प्रत्येकवेळी समजावून सांगतात. मात्र या मुलाने हॉटसीटवर बसल्यानंतर बिग बींना उद्धटपणे “तुम्ही मला आता नियम समजावत बसू नका. मला सगळं माहीत आहे”, असं म्हटलं. एवढ्यावरच तो मुलगा थांबला नाही तर अमिताभ बच्चन यांनी पुढे प्रश्न विचारताच तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलताना दिसला. बिग बींनी प्रश्न विचारताच मला उत्तर माहितीये ऑप्शन सांगू नका, असं तो म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर काही प्रश्नांची उत्तर ऑप्शन देण्याआधीच लॉक करा असं तो अमिताभ बच्चन यांना सांगत आहे. पण, पाचवीत शिकणाऱ्या इशितचा हा अतिआत्मविश्वास त्याला नडला.
आगाऊपणा करणाऱ्या इतिशची बिग बींनीही चांगलीच फिरकी घेतली. “वाल्मिकी रामायणाच्या प्रथम काण्डचं नाव काय आहे?” असा प्रश्न इशितला २५ हजार रुपयांसाठी विचारण्यात आला होता. याचं उत्तर त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे तो ऑप्शनची वाट बघत होता. पण, बिग बींनीही त्याला काही वेळ ऑप्शन न देत त्याची फिरकी घेतली. बिग बी म्हणाले, “फक्त तुच हुशार नाहीस, तर हेदेखील हुशार आहेत”. त्यानंतरही त्याने उद्धटपणे “अरे ऑप्शन द्या”, असं अमिताभ बच्चन यांना म्हटलं. पण ऑप्शन दिल्यानंतर त्याने B) अयोध्या काण्ड हा पर्याय निवडला. हा पर्याय लॉक करण्यासाठीही तो बिग बींना जोरजोरात ओरडून सांगत होता. पण, त्याचं हे उत्तर चुकलं आणि अवघ्या पाचव्या प्रश्नावरच इशितची विकेट उडाली

पुणे शहरात महावितरण ग्राहकसेवा कार्यालयांच्या पुनर्रचनेला प्रारंभ

» तत्पर ग्राहकसेवा अन् कर्मचाऱ्यांच्या कामांचे विभाजन

» ८ उपविभागीय कार्यालयांची नव्याने निर्मिती

» कर्मचाऱ्यांचा ताण कमी, कामकाजात होणार सुसूत्रता

पुणे, दि. १३ ऑक्टोबर, २०२५ – महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली आहे. या पुनर्रचनेला पुणे शहरात सोमवार (दि. १३) पासून प्रारंभ झाला असून, पुनर्रचनेमुळे पुणे शहरात ८ उपविभागांची नव्याने निर्मिती झाली आहे.

महावितरणमध्ये उपविभाग व शाखा कार्यालयांद्वारे नवीन वीजजोडणी, मासिक वीजबिल, सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती, वीजबिलांची थकबाकी वसुली, वीजहानी कमी करणे आदी कामे करण्यात येतात. त्यामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत होती. तसेच ही रचना सुमारे २५ वर्षांपूर्वीची व त्यावेळच्या ग्राहकसंख्येनुसार होती. मात्र त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर होत असल्याने व्यवस्थापनाने विशेष समिती स्थापन करून कर्मचारी संघटनांशी वेळोवेळी चर्चा करून पुनर्रचनेचे प्रारूप तयार केले आहे.

नविन रचनेत प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणाऱ्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

महावितरणच्या रास्तापेठ व गणेशखिंड शहर मंडलांतर्गत पुणे महानगराचा भाग येतो. या शहरी  भागातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी पूर्वी २९ उपविभाग होते. आता वीजपुरवठा आणि बिलींगसाठी स्वतंत्र उपविभाग झाल्याने आठ उपविभागांची नव्याने निर्मिती झाली आहे. तर पुणे ग्रामीण मंडलांतर्गत उपविभागांची संख्या १५ असून, तिथेही कामकाजात बदल करण्यात आला आहे.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे, रास्तापेठचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, पुणे ग्रामीणचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांचेसह सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सर्व उपविभागातील कर्मचाऱ्यांना नवीन रचनेनुसार कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी नविन बदलानुसार नविन जबाबदारी स्विकारत कामकाजाला सुरुवात केली आहे.

कर्मचाऱ्यांचा ताण कमी, कामकाजात होणार सुसूत्रता-

पूर्वी अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी १० ते १२ प्रकारची कामे करावी लागत होती. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकसेवेवर परिणाम होत होता. नवीन रचनेत प्रत्येकाला कामाजी जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, कामकाजात सुसूत्रता येणार आहे.

कामातील नविन बदल असे-

देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुली, वीजचोरी रोखणे आदी कामे करणार आहेत.

वीजग्राहकांनी विजेसंबंधिच्या सर्व तक्रारींसाठी महावितरणच्या 1912, 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. महावितरणच्या मोबाईल ॲपवर देखील सर्व सुविधा २४ तास उपलब्ध आहेत.

इस्रायलच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरु असताना’नरसंहार Genocide’ पोस्टर दाखवत निदर्शने करणाऱ्या इस्त्रायली खासदाराला बाहेर काढले

इस्रायलच्या संसदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत असताना गदारोळ झाला. जेव्हा ट्रम्प संसदेला संबोधित करत होते. त्यावेळी एका व्यक्तीने ट्रम्प यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याला तेथेच अडवत संसदेच्या बाहेर काढण्यात आले. गदारोळ करणाऱ्या खासदाराचे नाव ओफर कासिफ आहे. जे इस्रायलच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. ते अरब-बहुल-हदाश-ताअल पक्षाचे एकमेव ज्यू सदस्य आहेत आणि ते गाझापट्ट्यातील कारवाईचे प्रमुख विरोधी आहेत. नेसेटचे सदस्य अयमान ओडेह आणि ओफर कासिफ यांनी भाषणादरम्यान Genocide म्हणजे नरसंहार लिहिलेला पोस्टर दाखवला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा कराराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर इस्रायलच्या संसदेला भेट दिली. पंतप्रधान नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचा इस्रायलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला. यानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात करारासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. “20 धाडसी ओलिस ठेवलेल्या व्यक्ती परत येत आहेत. आज बंदुका शांत आहेत, सायरन शांत आहेत. ईश्वर इच्छितो की ही भूमी आणि हा प्रदेश अनंतकाळ शांत राहील.” डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला सभागृहातून बाहेर काढले. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, ही सलोख्याची सुरुवात आहे. हा एका नवीन मध्यपूर्वेचा ऐतिहासिक उदय आहे. नेतन्याहू यांच्याशी व्यवहार करणे सोपे नाही, पण यामुळेच ते महान आहेत. हा एक अत्यंत असामान्य वळणाचा काळ होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील अलीकडील युद्धविराम आणि स्थिरतेचा उल्लेख करताना म्हटले की, “आकाश शांत आहे, बंदुका शांत आहेत आणि पवित्र भूमीवर शांतता आहे.” डोनाल्ड ट्रम्प यांनी अरब देश आणि मुस्लिम नेत्यांचे आभार मानले, जे ओलिसांना सोडवण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी पुढे सांगितले की, “हा इस्रायल आणि जगासाठी एक मोठा विजय आहे की हे सर्व देश शांततेसाठी भागीदार म्हणून एकत्र काम करत आहेत.” यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले होते की, “आमच्या शत्रूंना आता समजले आहे की इस्रायल किती शक्तिशाली आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणे ही एक मोठी चूक होती.”
नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कौतुक करताना संसदेत उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात म्हटले की, “मी कधीही कोणालाही आमचा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे जगाला इतक्या वेगाने, निर्णायकपणे आणि ठामपणे पुढे नेताना पाहिले नाही.” यासोबतच, नेतन्याहू यांनी इस्रायली कुटुंबांसाठी करार घडवून आणल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या निवडणुकीनंतर सर्व काही बदलले.

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट

0

वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार

दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहिर केला.

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतना सोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे श्री सरनाईक यांनी सांगितले.

००००

पुणे शहरासाठी १००० ई-बसेसच्या प्रक्रियेला गती…

नवी दिल्ली

पुणे शहरासाठी आवश्यक असणाऱ्या १००० ई-बसेसच्या विषयासंदर्भात आज केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. १००० बसेसच्या मागणीसंदर्भातील पीएमपीएमएलकडून अपेक्षित असणारा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे दाखल झाला असून याबाबत पुढील प्रक्रिया वेगाने करण्यासंदर्भात कुमारस्वामीजी यांच्या चर्चा केली.पुणे शहराला १००० बसेस मिळण्याच्या दृष्टीने असणाऱ्या प्रक्रियेला आता गती आली असून ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न आहे. या चर्चेवेळी कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत पुढील प्रक्रियेसंदर्भात सूचित केले आहे.

मोहोळ यांनी म्हटले आहे कि,’ पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करण्याच्या दृष्टीने एकीकडे मेट्रो मार्गांचा आपण विस्तारत करत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हादेखील आपला प्रमुख अजेंडा आहे. या दृष्टीने या बसेससाठी आवश्यक असणारे पत्र राज्य सरकारने रिझर्व बँकेला प्रस्ताव पाठवावा, याबाबत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव रिझर्व बँकेला राज्य सरकारकडून पाठवण्यात आले असून या प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून पीएमपीएमएलकडून अधिकृत प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.

पदवीधर व शिक्षक मतदार संघांची नोंदणी मोहीम सुरू

▪️ नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कॅम्पचे आयोजन

पुणे, दि. १३ ऑक्टोबर
पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपासून सुरू झाला असून नागरिक ६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करू शकतात.

या मोहिमेसाठी विभागीय आयुक्त पुणे श्री. चंद्रकांत पुलकुंडवार हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त असून, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम पाहतील.

या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे कार्यालयातील सर्व पदवीधर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी श्री. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या वेळी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अशा प्रकारचे विशेष नोंदणी कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “जास्तीत जास्त पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही या विशेष कॅम्पला भेट दिली आणि सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू

-शालेय शिक्षण विभागाची माहिती

मुंबई, दि. १३ : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या स्पर्धात्मक अभियानास दोन वर्षात मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२५-२६ मध्ये हे अभियान राबविण्यासाठी ८६.७३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली.

२०२५-२६ या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविताना या अभियानाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यावर्षीही अभियानासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षामध्ये सदर अभियान सुधारित निकषांसह राबविण्याच्या अनुषंगाने सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त (शिक्षण) यांना कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने २०२५-२६ या वर्षाकरीता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-३ अभियान राबविण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण) यांच्यामार्फत २९ ऑगस्ट २०२५ रोजी शासनास प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून हे अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ९५ टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

२०२४-२५ मध्ये देखील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा-२ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह २६ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये २९ जुलै २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. १८ नोव्हेंबर २०२४ व ९ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पारितोषिकाची ७३.८२ कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर अभियानास २०२३-२४ प्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला.

आता २०२५-२६ या वर्षाकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून सदर अभियान नवीन उपक्रमांसह राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

अवजड वाहनांच्या चालकांची तपासणी करण्याचे निर्देश

पीएमआरडीएमधील बैठकीत महत्त्वपूर्ण न‍िर्णय; रहदारीच्या वेळेत अवजड वाहने नको

पुणे / पिंपरी (दि.१३) : हिंजवडीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी अवजड वाहने पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेतच शहरात यायला हवी. यासह बांधकाम व्यवसायिकांनी याबाबत खबरदारी घेत ज्या भागात त्यांची बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी रहदारीच्या नियमांचे पालन करत संबंधित वाहन चालक कुठल्या नशेत नसल्याची खात्री करूनच त्याचे परवाने अध्यायवत असलेल्याबाबत खात्री करूनच एकत्रित माहिती विकासकाने त्याच्या प्रकल्पसाइटवर अद्यावत ठेवावी, असे निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात सोमवारी झालेल्या अधिकारी आण‍ि बांधकाम व्यवसायिकांच्या बैठकीत व‍िव‍िध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली

सध्या शहरालगत असलेल्या हिंजवडी – माण, म्हाळुंगे परिसरात अनेक बांधकाम व्यवसायिकांच्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकाम करताना संबंधितांना अवजड वाहनांद्वारे सिमेंट, स्टील आदी साहित्यांची वाहतूक करावी लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित वाहनांपासून सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. संबंधित अपघात टाळण्यासाठी पीएमआरडीएने सोमवारी हिंजवडी – माण, म्हाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिकांच्या प्रतिनिधींची बैठक घेत अवजड वाहनांबाबत पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात आणावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

आयटीनगरी असलेल्या हिंजवडी – माण भागात सकाळी आण‍ि सायंकाळी दुचाकीसह चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. यादरम्यान बऱ्याचदा बांधकाम व्यवसायिकांची अवजड वाहने या मार्गावर धावत असल्याने इतर वाहनचालकांना अडचणी येतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार सोमवारी विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह हिंजवडी – माण, महाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिक यांच्या प्रतिनिधी व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

त्या बांधकाम व्यवसायिकाचे काम थांबवणार
हिंजवडी भागात शुक्रवारी काँक्रीट मिक्चरखाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवला असून याआधारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संबंधित वाहन ज्या ठिकाणी काम करण्यासाठी जात होते, त्या ठिकाणची बांधकाम परवानगी रोखणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

  • डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

त्रिधारा’मध्ये रसिकांनी अनुभवला सुरेल स्वराविष्कार

तीन पिढीतील कलाकारांचे बहारदार सादरीकरण

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित कैवल्यकुमार गुरव, ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायकीची परंपरा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या मुकुल कुलकर्णी यांच्यासह युवा पिढीतील आश्र्वासक शास्त्रीय गायक अभेद अभिषेकी यांच्या सुरेल स्वराविष्कारात रसिकांनी ‘त्रिधारा’ मैफलीचा आनंद लुटला.

निमित्त होते ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘त्रिधारा‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ कोथरूड येथे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

ख्यातनाम गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू व प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांचे पुत्र अभेद अभिषेकी यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग पुरिया धनश्रीतील ‘बल बल जाऊ मीत मोरे’ या बंदिशीने केली. त्याला जोडून ‘पायलिया झनकार मोरी’ ही सुप्रसिद्ध बंदिश प्रभावीपणे सादर केली. उत्तम फिरत असलेला सुमधुर आवाज आणि बहारदार सादरीकरणाने अभेदने रसिकांची मने जिंकली. कौस्तुभ स्वैन (तबला), माधव लिमये (संवादिनी), चिन्मय कुलकर्णी, ऋचा कुलकर्णी (तानपुरा) यांनी सुरेल साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या मध्यधारेत ग्वाल्हेर आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक मुकुल कुलकर्णी यांनी आपल्या नजाकतपूर्ण सुरांनी रसिकांना मोहित केले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग श्यामकल्याण मधील तिलवाडातील ‘जियो मोरे लाल’ या पारंपरिक बंदिशीने केली. त्यानंतर मुकुल कुलकर्णी यांनी ‘ऐसो तुम्हीको मै’ ही शामकल्याणधील बंदिश आणि  ‘आन बान जिया मे लागे’ हा पारंपरिक दादरा सादर केला. अलवार सुरांची पक्की बैठक त्यांच्या गायनातून प्रकर्षाने जाणवली. वेदांग क्षीरसागर (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी), कुणाल भिडे, कन्हैया बाहेती (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.

कार्यक्रमाची सांगता किराणा घराण्याचे विख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या मैफलीने झाली. त्यांनी सुरुवातीस राग मारुबिहागमधील ‘अब मे हू न जानू’ ही बंदिश सादर केली. त्याला जोडून ‘तरपत रैना दिन’ ही बंदिश प्रवाभीपणे सादर केली. त्यानंतर ‘छेडो ना मोहे’ ही रचना ऐकविली. रसिकांच्या आग्रहास्तव पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी ‘मै तोरी ना मानुंगी बतिया’ ही बंदिश तर राग दुर्गा सादर करताना ‘तू रस कान्हा रे’ आणि ‘अजहू न आयिल पिया मोरा रे’ या बंदिशी सुमधुरपणे सादर केल्या. आपल्या मैफलीची सांगता भैरवीतील ‘अकेली जी न जय्यो राधा जमुना के तीर’ या पारंपरिक बंदिशीने केली. बहारदार आवाज, सुरांवरील पकड, तीन सप्तकात सहज फिरत असणारा आवाज असलेल्या या अद्भुत सादरीकरणाने रसिक मोहित झाले.

प्रणव गुरव (तबला), स्वरूप दिवाण (संवादिनी), आदित्य जोशी, वैष्णवी बरकते, सचिन जाधव  (तानपुरा, सहगायन) यांनी सुमधुर साथसंगत केली.

कलाकारांचा सत्कार ऋत्विक फाऊंडेशनच्या संचालिका चेतना कडले, सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी, प्रसिद्ध गायिका सुमन नागरकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद देशपांडे यांनी केले.

“आयुर्वेद-युनानी महाविद्यालयांना शासनमान्य सेवा नियम लागू करावेत”, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शासन-अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांमधील अध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मागणी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागांतील एकूण १६ आयुर्वेद आणि ३ युनानी शासन-अनुदानित महाविद्यालयांमध्ये शेकडो शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व संस्थांना शासनाकडून शंभर टक्के आर्थिक अनुदान मिळते. तरीदेखील आजपर्यंत या संस्थांना महाराष्ट्र सेवा नियम किंवा शासनमान्य Grant-in-Aid Code लागू करण्यात आलेला नाही. या दुर्लक्षामुळे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय्य सेवा नियमांचा लाभ मिळालेला नाही आणि परिणामी, वारंवार न्यायालयीन वाद निर्माण होत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी याबाबत पुढे म्हटले आहे की, शासनमान्य पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका आणि वेतन नोंदींचे लेखापरीक्षण वर्ष २००० पासून आजपर्यंत झालेले नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक आणि अन्यायकारक असून तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी शासन अनुदानित आयुर्वेद आणि युनानी संस्थांसाठी महाराष्ट्र सेवा नियम किंवा शासनमान्य Grant-in-Aid Code तत्काळ लागू करणे, सर्व अध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका व वेतन नोंदींचे शासनमान्य प्राधिकरणामार्फत नियमित लेखापरीक्षण करणे, तसेच या विषयावर आयुष संचलनालय आणि वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत एक समन्वय समिती स्थापन करून कालबद्ध कार्यवाही करणे अशी पावले शासन स्तरावर उचलण्याची मागणी केली आहे .

डॉ. गोऱ्हे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या न्याय्य मागण्यांचा विचार होऊन सकारात्मक निर्णय झाल्यास आयुर्वेद आणि युनानी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शासनाच्या पारदर्शक व न्याय्य कारभाराला बळकटी मिळेल.

शिरूरसह पुणे विभाग बिबट्या संघर्ष बाधित विभाग म्हणून (‘Leopard Conflict Management Zone’) घोषित करावा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बालिकेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, मानव–वन्यजीव संघर्षावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

पुणे, दि. १३ ऑक्टोबर २०२५ : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे १२ ऑक्टोबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात बालिका शिवण्या शैलेश बोंबे हिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षावर तातडीने सर्वंकष आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे की, ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नसून संपूर्ण समाजाचे दु:ख आहे. मागील काही वर्षांपासून शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अशा घटना सातत्याने घडत असून ग्रामस्थांमध्ये भीती आणि असहायतेचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात आ.शरद सोनावणे आणि सचिन बांगर ,युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांनी डॉ.नीलम गोर्हे यांच्याकडे पाठपुरावा करून लक्ष वेधले होते

वनविभागाकडून तातडीने कारवाई करण्यात आली असली तरी आता केवळ उपचारात्मक उपायांपेक्षा प्रतिबंधात्मक आणि शाश्वत नियोजनाची गरज आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यांनी शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड हे चार तालुके ‘Leopard Conflict Management District Zone’ म्हणून घोषित करून या क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि मनुष्यबळ मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच पुणे येथे २४ तास कार्यरत राहील असा ‘Wildlife Conflict Command Center’ स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली आहे. या केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष, ड्रोन सर्व्हेलन्स आणि रॅपिड रिस्पॉन्स यंत्रणा एकत्रितपणे कार्यान्वित राहील, असेही त्यांनी सुचविले आहे.

त्याचप्रमाणे सर्व संवेदनशील गावांचा GIS आधारित डिजिटल Conflict Map तयार करून नागरिकांवरील आणि पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचा एकत्रित डेटाबेस विकसित करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. वाघांप्रमाणे बिबट्यांना RFID कॉलर बसविण्याचा प्रयोग करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल का, याची चाचपणी करावी, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अशा तांत्रिक उपाययोजनांनी या भागातील बिबट्यांच्या वर्तनाचा अभ्यास होऊन भविष्यातील धोके ओळखणे शक्य होईल.

डॉ. गोऱ्हे यांनी संरक्षणात्मक उपाययोजनांबाबतही ठोस सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावात शालेय मुलांना सुरक्षितपणे थांबता येईल अशा “Safe Waiting Zones for Children” उभाराव्यात, ज्यामध्ये शेड, लाईट आणि CCTV कॅमेऱ्यांची सोय असेल. याशिवाय फक्त सौर कुंपणांवर अवलंबून न राहता “Hybrid Shock-Fence + Sound Alarm Units” या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन किलोमीटरच्या परिसराला संरक्षण द्यावे. सर्वाधिक सक्रिय असलेल्या पिंपरखेड, कोळवाडी आणि घोडनदी परिसरात Forest Drones आणि AI Pattern Tracking System तैनात करून बिबट्यांच्या हालचालींवर सतत नजर ठेवावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना स्पष्ट अधिकार देऊन “Attack-Prone Leopard Capture Protocol” लागू करावा, जेणेकरून फक्त अटकावच नव्हे तर आवश्यक असल्यास तत्काळ स्थलांतरही करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

या संघर्षावर दीर्घकालीन उपाय म्हणून डॉ. गोऱ्हे यांनी सामाजिक सहभागाचीही गरज अधोरेखित केली आहे. प्रत्येक गावात “बिबट्याशी सहजीवन समिती” स्थापन करून ग्रामपंचायतीच्या मान्यतेनेच रात्रीची हालचाल, कचरा व्यवस्थापन आणि पशुधन चराईसंबंधीचे नियम ठरवावेत, असे त्यांनी सुचवले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धर्तीवर “मानव–वन्यजीव संघर्ष विमा योजना” सुरू करून मृत्यू किंवा जखमी झालेल्या प्रकरणात शासकीय मदत २४ तासांच्या आत संबंधितांच्या खात्यात जमा व्हावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

त्यांनी विशेष नमूद केले की, पिंपरखेड येथील मृत बालिकेच्या कुटुंबाला शासनमान्य आर्थिक मदत तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पुणे विभागाने या प्रसंगाच्या दृष्टीने “शिरूर मॉडेल” तयार करावे, जे राज्यातील आणि देशातील मानव–वन्यजीव सहअस्तित्वाचे आदर्श उदाहरण ठरेल.
“मृत्यूमुखी पडलेल्या छोट्या शिवण्याची न्याययात्रा केवळ कागदपत्रांत न राहता ती धोरणात्मक निर्णयांमध्ये परावर्तित व्हावी, हीच आपली जबाबदारी आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी नमूद केले आहे.

कृषी पदवीधरांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतःचे उदाहरण निर्माण करावे- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ‘ॲग्रीकॉस २०२५’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

पुणे, दि.१३: महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांनी फार मोठी उंची गाठली आहे. विविध उद्योजक, राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरी न लागता उत्तम शेती करून व शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजामध्ये स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचं आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो श्वास जिवंत ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित ॲग्रीकॉस मासिकाच्या ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ चे प्रकाशनाच्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले, “अतिवृष्टीमुळं नुकसान झाल्याने आज राज्यभरातील शेतकरी खचला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमत्री अजित पवार यांनी एकतीश हजार सहाशे कोटी रुपयाचे शेतकऱ्यायांना मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने नवनवीन योजना राबविण्यात येत आहे, कृषी विभागाच्या जवळपास ५० हून अधिक महत्वपूर्ण योजना आहेत, त्याचा ही शेतक-यांना लाभ मिळत आहे. येत्या काळामध्ये आपल्याला शेतीची दिशा बदलावी लागेल काय? असं सांगणारा हा काळ आहे. अशावेळी कृषी पदवीधरांनी या संकटाच्या काळात आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा आणि तरुणांच्या कल्पकतेचा उत्सव
श्री. भरणे म्हणाले, ‘ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५’ हा ॲग्रीकॉस आणि विनोद या विषयावर आधारित असून, शेती, ग्रामीण जीवन, नवकल्पना आणि विनोदी लेखन यांचा समतोल साधणारा अंक आहे. ॲग्रीकॉस दिवाळी अंक हा शेतकऱ्यांच्या अनुभवांचा, संशोधनाचा आणि तरुणांच्या कल्पकतेचा उत्सव आहे. या अंकाच्या निमित्ताने शेखर गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी राज्यातील कृषी पदवीधरांना एकत्र आणून त्यांच्या संघटन शक्तीचा वापर सकारात्मकरित्या केले आहे. कृषी पदवीधरांची पहिली राज्य पातळीवरील कृषी पदवीधर पतसंस्था स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावानं उभारण्यात आली आहे.

येत्या काळामध्ये ही संस्था शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जापासून अन्य वित्तीय गरजा भागविण्यामध्ये निश्चितपणे योगदान देईल. नुकताच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. याप्रमाणेही कृषी विभागाने कृषी शिक्षणाच्या बाबतीतही अशाचप्रकारे निर्णय घेईल. पुणे कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेला दिलेल्या जागेबद्दल देखील माझ्याकडे संघटनेने मुद्दा लक्षात आणून दिला आहे, असेही श्री. भरणे म्हणाले.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अर्थसहाय्यकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे दि.१३ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींनी स्वयंरोजगाराकरीता विविध योजनांअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे; याकरिता www.msobcfdc.org/msobefde.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना, १ लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

अर्जदाराचे वय १८-५० वर्ष असल्याबाबतचा वयासंबंधित कागदपत्रे (शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला), ३. जातीचा दाखला, आठ लाखाच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला उत्पन्नाचा दाखला. स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला (तहसीलदरांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र.) कुटुंबाचे शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, आधारसंलग्न बँकचे पासबुक, विवाहीत स्त्री अर्जदारासाठी नावात बदलाबाबतचे प्रतिज्ञापत्र किंवा लग्नपत्रिका किंवा राजपत्र आणि अर्जदाराचा छायाचित्रांची आवश्यकता आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक-बी, सर्वे क्रमांक, १०४/१०५, मनोरुग्णालय कॉर्नर, पोलीस चौकी समोर, विश्रांतवाडी, येरवडा. दुरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३०५९, ई-मेल dmobcpune@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

१३ वर्षीय दोन मुली पुण्यातून हरवल्या पण ….

पुणे-१३ वर्षीय दोन मुली पुण्यातून हरवल्या पण …. सुमारे ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजचे आधारे पोलिसांनी त्यांना शोधुन काढण्यात अखेरीस यश मिळविले . म्हणतात ना , इछ्या असेल आणि तयारी असेल तर कितीही कठीण परिस्थिती असू द्यात यश येणारच या प्रमाणे पुणे पोलिसांनी हि मोहीम फत्ते केली आणि मुलीना सुखरूप माघारी आणले .
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १९०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) हा गुन्हा दि.०७/१०/२०२५ रोजी नोंद झाला. त्यामध्ये स्वाधार अनाथालय बुधवार पेठ पुणे येथे राहणा-या १३ वर्षे वयोगटातील राजमाता जिजाऊ विद्यायलय, कसबा पेठ, पुणे येथील ७ वी इयत्तेत शिकणा-या दोन अल्पवयीन मुली सदर शाळेतून अपह्त झाल्याची तक्रार दाखल होती.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य.) श्री उत्तम नामवाडे, यांनी फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी सपोनि वैभव गायकवाड व पोलीस उप-निरिक्षक अरविंद शिंदे तसेच पोलीस अंमलदार यांना घटनेची गांभिर्य लक्षात घेवुन महत्वाच्या सुचना देवुन वेग-वेगळी २ पथके तयार करुन, त्यांना कामाची विभागणी करुन दिली. त्याप्रमाणे तपासकामी नेमण्यात आलेल्या पथके यांनी एकमेकांचे संपर्कात राहुन, वर नमुद गुन्हयातील अपहत झालेल्या दोन अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने शोध सुरु केला, सदर अल्पवयीन मुली या अनाथ असल्याने व त्यांचे कोणीही नातेवाईक अथवा ओळखीचे इसम उपलब्ध नसल्याने सदर अल्पवयीन मुली शोधण्यात खूप अडचणी आल्या होत्या. परंतु तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड व चेतन होळकर यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने कसबा पेठ, पवळे चौक कुंभारवेस चौक, शिवाजीनगर येथील सीसीटीव्ही कॅमे-याचे साहाय्याने शोध घेता त्यांतील एक अल्पवयीन मुलगी एकटीच वाकडेवाडी शिवाजीनगर येथे त्याच दिवशी रात्री मिळून आली. परंतु दुसरी अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही.
सदर मिळालेल्या अल्पवयीन मुलीकडून दुस-या अल्पवयीन मुलीबाबत कोणतीही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे तपास पथकाने परत दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा सीसीटीव्ही च्या आधारे शोध सुरू केला. दिनांक ०८/१०/२०२५ पासून शिवाजीनगर, पाटील इस्टेट, संगमवाडी, बॉम्बे सॅपर चौक, विश्रांतवाडी, मॅगझीन चौक, दिघी, आळंदी, मोशी व भोसरी या परिसरातील दिनांक ११/१०/२०२५ रोजी पर्यंत सलग चार दिवस रात्रंदिवस ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही च्या आधारे शोध घेतला असता तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पासलकर व प्रशांत पालांडे यांचे पथकास सदर अल्पवयीन मुलगी मोशी परिसरात तुपे वस्ती, गणेश नगर येथे दिसून आल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तात्काळ रात्री ०९.०० वा. तेथे जाऊन सदर परिसरात शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी तेथील रस्त्याचे कडेला बसलेली मिळून आल्याने तिला सुस्थितीत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-१, कृषिकेश रावले, पोलीस उप-आयुक्त विवेक मासाळ, (अति.कार्य.) सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग साईनाथ ठोंबरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरिक्षक, (अति. कार्य.) उत्तम नामवाडे, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप-नि. अरविंद शिंदे, संतोष गोरे, सपोफौ मेहबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर, पोलीस अमंलदार, प्रविण पासलकर, प्रशांत पालांडे, महेश राठोड, चेतन होळकर, विशाल शिंदे, तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, मनिषा पुकाळे यांनी केलेली आहे.

पुण्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

पुणे, दि. 13 ऑक्टोबर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे या कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या पार्श्वभूमीवर हा महोत्सव दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, कॅम्प, पुणे येथे पार पडणार आहे.

या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र आणि बक्षीस रक्कम देण्यात येईल. तसेच प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा निश्चित करण्यात आला असून वयाची गणना 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. नावनोंदणी करताना आधार कार्ड आणि जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे; शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत dsopune6@gmail.com ई-मेल अथवा व्हॉटस् अपद्वारे अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी – 7387880427, ताहेर आसी – 9145402115, आशद शेख – 8484803529 सादर करावेत. सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी व संस्था येथील इच्छुक कलावंतांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन , जिल्हा क्रीडा अधिकारी, जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.