Home Blog Page 93

समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

पुणे,दि.११: सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे.

यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, ज्ञानेश्‍वर जावळे, समाज कल्‍याण अधिकारी, माधुरी वाघमोडे, समाज कल्‍याण अधिकारी, प्रमुख अतिथी रवींद्र पठारे, समतादूत, विद्यार्थी उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर आज आयोजित कार्यक्रमात “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य” या विषयावर प्रा. डॉ. शैलेश द्रौपदा विश्वनाथ त्रिभुवन उपप्राचार्य, सिद्धिविनायक महाविद्यालय, कर्वेनगर, यांचे व्याख्यान झाले. तसेच श्रीमती उषा कांबळे समतादूत, बार्टी, पुणे यांनी “मी सावित्री बोलतेय” हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र पठारे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त विशाल लोंढे होते. यावेळी समाज कल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, समतादूत, प्रकल्प अधिकारी तसेच शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रस्ताविकामध्ये समाज कल्याण अधिकारी श्रीमती माधुरी वाघमोडे यांनी सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

श्री. पठारे यांनी महामानवांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तर श्री. लोंढे यांनी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाज कल्याण अधिकारी ज्ञानेश्वर जावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र शेलार तालुका समन्वयक, पुणे यांनी केले.

“ए आय चा विवेकी वापर  व्हावा” :संवाद कार्यक्रमातील सूर 

 सत्यशोधक विचार आणि एआय’ विषयावर संवाद कार्यक्रम 

 महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजन 

पुणे :

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त  एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने “सत्यशोधक विचार आणि एआय च्या जमान्यातील आव्हाने” या विषयावर आयोजित विशेष संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता फाऊंडेशन च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या अखंडाचे सामूहिक गायन करण्यात आले.  

या संवादात प्रा. प्रविण चव्हाण ,अभिजित अनाप आणि साथी सुभाष वारे यांनी प्रमुख संवादक म्हणून सहभाग घेतला. उपेंद्र टण्णू यांनी सूत्रसंचालन केले.आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक विचारांची आजची उपयुक्तता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांशी संवाद साधताना वक्त्यांनी विवेकनिष्ठ विचार, अंधश्रद्धा निर्मूलन आणि तंत्रज्ञानाचा सामाजिक भल्यासाठी उपयोग यावर भर दिला.”ए आय चा विवेकी वापर  व्हावा”असा सूर या संवाद कार्यक्रमात उमटला.अभिजित अनाप म्हणाले,’महात्मा फुले हे कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सबिलिटीचा विचार पहिल्यांदा अमलात आणणारे द्रष्टे आणि काळाच्या पुढे पाहणारे व्यक्तिमत्व होते.एआय च्या जगात वावरताना त्यांच्या सत्यशोधनाच्या भूमिकेचा आग्रह धरला पाहिजे.कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे लोकशाहीकरण झाले पाहिजे.प्रा. प्रविण चव्हाण  म्हणाले,’कृत्रिम प्रज्ञेच्या पलीकडे मानवी प्रज्ञा आहे.म्हणून ती वापरून तथ्य आणि सत्याचा शोध घेतला पाहिजे.सुभाष वारे म्हणाले,’कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून असत्य आणि भ्रामक माहिती पसरवली जाऊ नये म्हणून आपण विवेकनिष्ठ वापर करून एआय वर स्वार झाले पाहिजे.बहुजनांनी अंगभूत  निर्मितीच्या कौशल्यासहीत कृत्रिम प्रज्ञेची आधुनिक  कौशल्ये आत्मसात करून संतुलित,समन्यायी  मानवी प्रगती साधली पाहिजे.संगणकाला विरोध झाला तसा एआय ला विरोध करणे योग्य ठरणार नाही. 

कार्यक्रमाला संदीप बर्वे,महेश तनपुरे,शीतल यशोधरा,विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. संवादानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तरांद्वारे सहभाग घेतला आणि विषयावरील आपले विचार मांडले. आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अशा प्रकारचे विचारप्रवर्तक उपक्रम पुढेही आयोजित करण्यात येतील, असे सांगितले.सामाजिक विचार, विज्ञाननिष्ठता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा हा संवाद तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला.

एमआयटी एडीटीचा बेंटली सिस्टिम्ससोबत करार

डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन’ उत्कृष्टता केंद्र सुरू
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी) आणि जागतिक स्तरावरील इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बेंटली सिस्टिम्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याचवेळी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल पायाभूत सुविधा शिक्षणाला चालना देणे आणि उद्योग-संलग्न शिक्षण अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्सेस अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास बेंटली सिस्टिम्सचे दक्षिण आशिया विभागीय कार्यकारी कमलकन्नन तिरुवडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक संचालक हर्ष नागपाल, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक मोनिका जेधे आणि परमर्थ सैनी हे मान्यवर उपस्थित होते.एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून कार्याध्यक्ष व प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. युवराज भिरूड आदी उपस्थित होते.या प्रसंगी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर ऑफ एक्सलन्स’ तसेच बेंटली स्टुडंट क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञान आणि शाश्वत अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगत शिक्षण व संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना ६५ हून अधिक उद्योगमान्य सॉफ्टवेअर, जागतिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि विशेष तांत्रिक प्रशिक्षण सुविधांचा लाभ मिळणार आहे.प्रमुख पाहुणे कमलकन्नन तिरुवडी यांनी आपल्या भाषणात स्मार्ट शहरीकरणासाठी सॉफ्टवेअर-आधारित बुद्धिमान पायाभूत सुविधांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.कार्याध्यक्ष व प्र-कुलपती डॉ. मंगेश कराड यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील डिजिटल अभियांत्रिकी कौशल्ये प्रदान करणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले.

निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी – डॉ. मनसुख मांडविया

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण

नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याला शासनाचे प्राधान्य – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर

पुणे: ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायींसह प्रत्येकाचे योगदान आवश्यक असून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे. त्यादृष्टीने महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याच्या ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात वैद्यकीय व्यवसायी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.

‘जन सेहत सेतू’ शिबीराचे उद्घाटन व पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख बोलत होते. सिम्बॉयसिस ऑडिटोरियम विमाननगर येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. कृष्णप्रकाश, आरोग्य अधिकारी नीना बोराडे, न्यूरोमायलिटिस ऑप्टिकाचे अध्यक्ष अमोल लुंकड, संघटक प्रशांत चौधरी, विविध संघटना, रोटरी क्लब, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, आशा सेविका उपस्थित होत्या.

केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मांडविया पुढे म्हणाले, वैद्यकीय व्यवसायींवर देशाच्या नागरिकांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी आहे. ७५ वर्षांपूर्वी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसत. त्यावेळी वेदशाळांच्या माध्यमातून नागरिकांचा उपचार होत असे. त्यावेळी उपचारासाठी पैशाला प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टरांचे काम म्हणजे व्यवसाय नसून एक जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

डॉ. मांडविया पुढे म्हणाले, पुणे शहरातील विविध संघटना व संस्थांच्या पुढाकाराने तज्ज्ञ वैद्यकीय व्यवसायींनी पुढे येऊन दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने ‘जनसेहत सेतू अभियान’ राबविण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. प्रत्येकाने आपापल्यापरीने वेळ, संपत्ती व ज्ञानाचे दान देऊन समाजाची सेवा करावी. या शिबिरांबाबत आशासेविका, सेवाभावी संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करुन अभियानाला राष्ट्रव्यापी बनवावे. अशाच प्रकारचा उपक्रम देशभरात राबविण्यासाठी वैद्यकीय व्यवासायींनी पुढाकार घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरविण्याला शासनाचे प्राधान्य – आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर
श्री. आबिटकर यावेळी म्हणाले, राज्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा तत्पर, दर्जेदार व मोफत मिळाव्यात अशी शासनाची भूमिका आहे. नागरिकांच्या मनात आजारांचे स्वरूप आणि खर्चाच्या अनुषंगाने वैद्यकीय सेवा व दवाखान्याबाबत भिती असते. त्यामुळे ‘जन सेहत सेतू’ अभियानाच्या माध्यमातून एक दिवस सेवा समर्पित करणे हे महाराष्ट्रातील व देशातील आदर्श उदाहरण ठरेल. देशातील महत्त्वपूर्ण अशी आरोग्य सेवा शिबीरांच्या माध्यमातून देण्याची सुरुवात पुण्यातून होत आहे याचा आनंद आहे. सर्व डॉक्टर्सनी या अभियानाची सुरुवात करावी. वैद्यकीय सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु, उपचारापेक्षा प्रतिबंध हाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. जन सेहत सेतू शिबीरांची सुरुवात संपूर्ण देशात व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा राज्यातील अधिकाधिक नागरिकांना व्हावा असा प्रयत्न आहे. भारत सरकारच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महाराष्ट्रातील काम गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये १ कोटी रुपयांपर्यंतचे मोफत उपचार ईएसआयसीच्या दवाखान्यात होतात. ईएसआयसीच्या सर्वाधिक सेवा राज्यातील नागरिकांना मिळाव्यात अशी विनंती केंद्र शासनाला केली आहे.

श्रीमती नागपुरे म्हणाल्या, सर्वोत्तम मनुष्यबळ ही राष्ट्राची शक्ती आहे. आरोग्याची निगा राखण्यासाठी शिस्तबद्ध जीवनशैली, चौरस आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासोबत नियमित आरोग्य तपासणीला महत्त्व आहे. विशेषत: महिलांना आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. महिलांनी आरोग्य तपासण्यांना न घाबरता नियमित आरोग्य तपासणी करावी. ‘जन सेहत सेतू’ शिबीरांची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी या शिबीरांमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स, सेवाभावी संस्थांचा सन्मान करण्यात आला.
0000

लोहगाव पाणीप्रश्नावर ठोस पावले; आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक व पाहणी

पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांसमवेत बैठक घेतली. बैठकीत सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेत विविध अडचणी, प्रलंबित कामे व भविष्यातील गरजा यावर सखोल चर्चा पार पडली.

बैठकीनंतर वॉटर पार्क रोड परिसरात प्रस्तावित पाणीपुरवठा टाकीसाठी उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या ठिकाणी नवीन टाकी उभारल्यास परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम व नियोजित पद्धतीने करता येईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांना पठारे यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच हरणतळे, लोहगाव बाजारतळ, पवार वस्ती स्मशानभूमी परिसर, लोहगाव ईव्ही बस डेपो तसेच निंबाळकर नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा टाक्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. लोहगावमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत व नागरिकांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, यासाठी कामांना गती देण्याचे पठारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

लोहगाव भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा नलिकांच्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली. नलिका जाळे अधिक सक्षम करून पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला. आमदार पठारे पुढे म्हणाले, “लोहगावमधील पाणीप्रश्न सोडवणे ही आपली प्राथमिकता आहे. नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल.”

या प्रसंगी नगरसेविका ऐश्वर्या पठारे, नगरसेवक रामदास दाभाडे, प्रितम खांदवे तसेच महानगरपालिकेचे विरेंद्र केळकर (अधिक्षक अभियंता), एकनाथ गाडेकर (कार्यकारी अभियंता), सुनिल मुळे (उपअभियंता), राजेंद्र नगरे (उपअभियंता), अमृता खाडे (कनिष्ठ अभियंता), शुभम घाटकर (कनिष्ठ अभियंता) व लोहगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून प्रदूषित झाल्याने शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज थेट घटनास्थळी पाहणी करून तात्काळ 4 अधिकाऱ्यांना सस्पेंड केले आहे. त्यांची आता खातेनिहाय चौकशी होईल.

या संदर्भात सामान्य प्रशासन, उपायुक्त विजय थोरात यांनी सांगितले की,अजयकुमार दत्तात्रय वायसे, कार्यकारी अभियंता व श्री.अतुल कुमार पांडुरंग कडू, कनिष्ठ अभियंता, मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग, पुणे महानगरपालिका यांना पुणे मनपा सेवेतून तूर्तातूर्त निलंबित करण्यात आले आहे.तसेच तसेच आरोग्य निरीक्षक श्री चोपडे आणि विभागीय आरोग्य निरीक्षक श्री भोईर यांना देखील खाते स्तरावरून निलंबित केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील पाषाण तलाव परिसरास महापालिका आयुक्त यांनी दि.१०/०४/२०२६ रोजी समक्ष भेट दिली असता, सदर कार्यक्षेत्रातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शुद्धीकरण न झालेल्या मैलापाण्याचे थेट तलावात मिसळले गेले असल्याने सदर परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन पाषाण तलावातील पाणी दूषित झाल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत पाषाण तलावातील पाण्यामध्ये आढळले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची मानून आयुक्तांनी तातडीने यावर कारवाई केली.महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार या आदेशाचे दिनांकापासून श्री. अजयकुमार दत्तात्रय वायसे, कार्यकारी अभियंता, व श्री.अतुल कुमार पांडुरंग कडू ,कनिष्ठ अभियंता, मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६(२) (फ) नुसार खातेनिहाय चौकशी कामी मनपा सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच आरोग्य निरीक्षक श्री चोपडे आणि विभागीय आरोग्य निरीक्षक श्री भोईर यांना देखील खाते स्तरावरून निलंबित केले आहे.

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन प्राचार्याकडून तब्बल ७ लाख उकळल्याची बातमी येते ना येते तोच पुण्यात पत्रकारांच्या कारवाया हि आता पुढे येऊ लागल्या आहेत. मिडिया आपले काम चोख बजावत नाही म्हणून सोशल मिडिया वर काही फटके फुटू लागलेले असताना मीडियातील कालच्या मोठ्या बातमीने खूपच मोठा धक्का पुण्यातील पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला बसतो आहे. त्यामुळे केवळ कुणा तरी एखाद्याला बळीचा बकरा न करता यामागील कुणालाही सोडता कामा नये अशी भूमिका आता घेण्यात येऊ लागली आहे.

पुणे – बुधवार पेठेमध्ये एका लॉज मध्ये एका पत्रकाराने महिलेसोबत विनयभंग केला हे प्रकरण अतिशय घृणास्पद आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पत्रकारांची बदनामी होते आहे. या पत्रकारांना आणि त्यांच्या सुटकेसाठी त्यांना साथ देणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात श्रमिक पत्रकार संघ उभा असून या सर्वावर कडक कारवाई करा अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे एका पत्रानव्ये केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे वाचा जसेच्या तसे


श्री. अमितेश कुमार
पोलीस आयुक्त
पुणे शहर

विषय : घृणास्पद कृत्य करणाऱ्या पत्रकारावर कारवाई करणे बाबत.

महोदय,
तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेमध्ये एका लॉज मध्ये एका पत्रकाराने महिलेसोबत विनयभंग केला हे प्रकरण अतिशय घृणास्पद आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक पत्रकारांची बदनामी झालेली आहे. हा प्रकार पुणे श्रमिक पत्रकार संघासाठी मनस्ताप करणार आहेत. त्यामुळे या प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एक यंत्रणा कार्यरत होती अशी चर्चाही आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे पत्रकार व अन्य मंडळी यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार सहमत नाही.

गुरुवारी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पत्रकार संघ कोणताही अडथळा आणणार नाही असे भेटून सांगितले आहे. त्यानंतर आता आम्ही आपणास पत्र देऊन हीच भूमिका स्पष्टपणे मांडत आहोत. या प्रकरणात पुणे श्रमिक पत्रकार संघ चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही पत्रकाराच्या पाठीशी उभा राहणार नाही. उलट त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
पुण्यातील पत्रकारांची सुरक्षा, त्यांचा मानसन्मान यासाठी कायमच पत्रकार संघाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. वेळोवेळी त्या संदर्भात पत्र व्यवहार देखील केलेला आहे. पोलिसांनी त्यास प्रतिसाद ही चांगला दिलेला आहे. मात्र अशा प्रवृत्तीच्या विरोधात पत्रकार संघ उभा असून यातील आरोपी व त्यास मदत करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना पत्रकार संघ कोणताही पाठिंबा देत नाही. याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

ब्रिजमोहन पाटील
अध्यक्ष
मंगेश फल्ले
सरचिटणीस

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा

पुणे, दि. १० – १३२ इन्फंट्री बटालियन टीए (इको) राजपूत मध्ये माजी सैनिक तसेच (एमओईएफ व सीसी) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (अकाली निवृत्तीसह) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा २० एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार असून भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी उपस्थित राहावे.

भरतीसाठी रिक्त पदे जेसीओ-2, सोल्जर जीडी २२, लिपिक-१, सोल्जर चिफ-१, सोल्जर स्टेवार्ड १ असून याकरिता माजी सैनिकांसाठी किमान वयोमर्यादा नाही, मात्र सेवानिवृत्ती/डिस्चार्ज झाल्यापासून ५ वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील, माजी महिला कर्मचाऱ्यांसाठीही समान अट लागू राहील, अशा पात्रता व अटी शर्ती आहेत. माजी सैनिक यांना ५० वर्षे व माजी सैनिक यांना ५५ वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे निवृत्तीवेतन आदेश, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे ८ रंगीत फोटो, शैक्षणिक व जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल सतीश दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.
0000

दौंडला राज्यस्तरीय ५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी होणार !

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती

दौंड, ता. १० :  राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि.२३ व रविवार दि.२४ मे २०२६ रोजी केडगाव, चौफुला, ता.दौंड,जि.पुणे येथील श्री बोरमलनाथ मंदिर येथे होत आहे. या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

       अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दिपक पवार, प्रतिष्ठानचे सदस्य कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोकराव जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीश वनशिव, संदिप सोनवणे, रविंद्र खोरकर,भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

         दोन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात मुक्कामी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कवी, लेखक, कलावंत, साहित्यिक यांनी 9881098481, 8805511060, 9850206977 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन भीमथड़ी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे व सचिव दीपक पवार यांनी केले आहे.

भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द करा: नसीम खान.

मुंबई युवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रहाला माजी मंत्री आरिफ नसीम खान यांची उपस्थिती.

मुंबई, दि. १० एप्रिल २०२६

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून भारताचा स्वाभिमान, अस्मिता गहाण ठेवली आहे. या ट्रेड डिलमुळे भारताचे मोठे नुसकान होणार असून भारतातील कृषी क्षेत्र व आपला अन्नदाता पुर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. भारताला अमेरिकेचा गुलाम बनवणारी ट्रेड डील रद्द झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या न्याय सत्याग्रह आंदोलनाच्या पाचव्या दिवशी काँग्रेस कार्यसमितीचे (CWC) सदस्य, माजी कॅबिनेट मंत्री आरिफ नसीम खान यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन व शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कर्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नसीम खान पुढे म्हणाले की, मागील १२ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी देशात हिंदू मुस्लीमचा मुद्दा पुढे करून समाजात दुही माजवण्याचे काम करत आहे. भाजपा सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते धार्मीक मुद्दे उकरून काढत आहेत, पण जनतेला भाजपाचे षडयंत्र माहित आहे, देशातील बेरोजगारी, महागाई यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही. तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, उद्योग व्यवसाय बंद पडत आहेत पण मोदी सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपा सरकारच्या विरोधात तरुणांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नसीम खान यांनी केले.

भारतीय जनता पक्ष नियमबाह्य काम करते, केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये बेबंदशाही सुरु आहे. बीएमसीमध्ये विकास निधी वाटपात भेदभाव केला जात आहे. नगरसेवकांना विकास निधी देताना सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि विरोधकांना एक न्याय असा दुजाभाव केला जात आहे. सर्व पक्षांना समान विकास निधी मिळाला पाहिजे, असेही नसीम खान म्हणाले.

नसीम खान पुढे म्हणाले की, लोकशाहीत निवडणुका या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु गेल्या आठ-दहा वर्षापासून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत, अनेक तक्रारी होत आहेत, EVM वर अनेक राजकीय पक्ष व नेत्यांनी शंका देखील व्यक्त केल्या आहेत. मशीनवर शंका उपस्थित होत असेल तर त्याचे निराकरण झालं पाहिजे. निवडणूकीबाबत काही शंका असेल तर त्या शंकांचे निराकरण करणे हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोगाकडून कधीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. निवडणूक आयोग राजकीय पक्षासारखे वागत आहे, सत्ताधारी पक्षाचा अजेंडा चालवत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुक निकालानंतरही लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग दाद देत नाही म्हणून आम्ही निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार केली होती त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएम तपासणीचे आदेश दिले आहेत. 16 व 17 एप्रिलला ईव्हीएम तपासणीचा कार्यक्रम निश्चित केला आहे, असे नसीम खान यांनी सांगितले.

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यावेळी म्हणाल्या की, नरेंद्र मोदी तडजोड करणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी आपल्या देशाच्या भवितव्याशी तडजोड केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली ते काम करत आहेत व डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरच ते काम करत आहेत हे आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहे. भारताच्या हितासाठी कोणापुढेही झुकण्याचे गरज नाही हे पंडित नेहरू, लालबहाद्दुर शास्त्री, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी डॉ. मनमोहनसिंह यांनी दाखवून दिले आहे.

मुंबई य़ुवक काँग्रेसच्या न्याय सत्याग्रह आंदोलनाचे उद्घाटन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा ताई गायकवाड यांनी केले तर आतापर्यंत या सत्याग्रहाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वरिष्ठ नेते आमदार अमिन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

शांती क्लिनिकतर्फे परवडणाऱ्या सर्वसमावेशक उपचारासह मोतीबिंदू शिबिराची घोषणा

 पुणे:पुणे येथील शांती क्लिनिक १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करत आहे. या शिबिराचा उद्देश मोतीबिंदूचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार याबाबत जनजागृती करणे हा आहे. मोतीबिंदू हा उपचारयोग्य आजार आहे; मात्र शस्त्रक्रिया उशिरा केल्यास दृष्टी हळूहळू कमी होत जाते, ज्याचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होतो. वेळेवर उपचार केल्यास स्पष्ट दृष्टी परत मिळवता येते आणि ज्येष्ठांना स्वावलंबी राहण्यास मदत होते.


या शिबिराअंतर्गत शांती क्लिनिककडून ₹९,९९९ मध्ये सर्वसमावेशक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे पॅकेज अधिकाधिक रुग्णांपर्यंत पारदर्शक, सुलभ आणि उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया अनुभवी सर्जनद्वारे अत्याधुनिक उपकरणे आणि उच्च प्रतीच्या इंट्राऑक्युलर लेन्स (IOLs) वापरून केली जाईल.


ज्या व्यक्तींना धूसर दिसणे, प्रकाशामुळे त्रास होणे (ग्लेअर) किंवा दैनंदिन कामांमध्ये अडचणी जाणवत असतील, त्यांनी या शिबिरादरम्यान तपासणी करून योग्य उपचारासाठी मार्गदर्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शांती क्लिनिक हे साधू वासवानी मिशनद्वारे संचालित एक डायग्नोस्टिक आणि आरोग्य सेवा केंद्र आहे. येथे सल्लामसलत, तपासणी सेवा तसेच इन-हाउस ऑप्टिकल शॉप ‘ब्राइट आयज’ उपलब्ध आहे.


नोंदणीसाठी संपर्क: डॉ. पूजा पटेल, काउंसलर – 9168013322
पत्ता: शांती क्लिनिक, 9, साधू वासवानी रोड, साधू वासवानी मिशन समोर, आगरकर नगर, पुणे – 411001
क्लिनिक वेळ: सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३०

भारतातील अश्व समुदायाला पुण्यात एकत्र आणणार११ व १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय परिषद

पुणे- भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या आधिपत्याखाली सहयोगी उपक्रम ’द इक्वाइन कलेक्टिव्ह’यांच्या तर्फे देशातील अश्व उद्योगाचे भविष्य घडविण्यासाठी समर्पित अशा पहिल्या राष्ट्रीय द इक्वेस्ट्रियन फोरम परिषदेचे आयोजन ११ व १२ एप्रिल रोजी पुण्यातील हॉटेल ह्यात येथे करण्यात येणार आहे. . या अश्व रोहण मंचाचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व पशुसंवर्धन आणि दुग्व्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक कु.गायत्री राहुल कराड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 यावेळी नॅशनल हॉर्स ब्रिडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.एफ.एफ वाडिया, पुण्याच्या जपलुप्पे इक्वेस्ट्रीयनचे सह संस्थापक श्री. रोहन मोरे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सीआयएपीचे सहसंचालक प्रा. रविशंकर साहू हे उपस्थित होते.
या अश्वरोहण मंचाला पुनावाला स्टड फार्म्स यांच्या सहकार्याने नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉ. एफ. एफ. वाडिया यांचे सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमात भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या मध्ये डॉ. हसनेन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाईर, डॉ. रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरनय, जुट्टा पुटझ आणि उत्पल एस. टाटू यांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी होणार्या पॅनल चर्चेमध्ये दोन मंत्री, कोलकता येथील जेष्ठ पत्रकार आणि अश्वरोहण खेळ व घोड्याच्या शर्यर्तीवरील लेखक सायरस जे मदन, ज्येष्ठ उद्योजक व पशुवैद्य डॉ. रवी रेड्डी यांच्यासारख्यातज्ज्ञ दिग्गजांची विविध सत्रे होतील. यामध्ये भारतीय अश्व परिस्थितीवरील धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर आणि हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ.नितीन विरमानी हे रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर बोलतील. त्याच प्रमाणे केंटकी इक्वाइन रिसर्चचे डॉ. पीटर हंटिग्टन ऑस्ट्रेलियाहून तरुण घोडे आणि कामगिरी करणार्या घोड्यांसाठी आहार धोरणे या विषयावर बोलण्यासाठी सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया मार्क बर्नेल हे मूल्य मानांकन या विषयावर बोलतील.
ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष के. आर. गजेंद्र पाल सिंगजी पोसाना ’देशी घोड्यांचा पुनर्वापर’ या विषयावर प्रकाश टाकतील. तंत्रज्ञान अवलंबन या संकल्पनेअंतर्गत जपालूप इक्वेस्ट्रियन सेंटर, पुणे येथील श्री. रोहन मोरे, द बार्न हाऊस, पुणे येथील श्री. रणजीत खेर आणि वायू टेक्नॉलॉजीज, पुणे येथील टीम यांची तीन सादरीकरणे होतील.

चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिंधू, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, यूके येथील श्री. ध्रुवपाल सिंग आंचन, वलसाड, गुजरात येथील यशस्वी ऑलिम्पियन अश्वारोहक श्री. इम्तियाज अनीस, यूके येथील अश्व प्रशिक्षक डॉ. डेव्हिड शीरीन, यूके येथील प्रतिष्ठित पशुवैद्य डॉ. डेसमंड लीडॉन हे पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योग क्षेत्राचे स्वरूप या विषयांवर बोलतील. जेपी ब्रँड्स, यूएसए येथील सुश्री जुट्टा पुट्झ या विस्तारक्षम अश्व व्यवसाय उभारण्यावर बोलतील.
१२ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पसमध्ये दिवसाची सुरुवात घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकाने (उपयोजित शिक्षण / सादरीकरण) होईल. त्यानंतर फ्रान्सच्या सुश्री मॉड चॅटेल यांचे फिजिओथेरपीचे थेट प्रात्यक्षिक सत्र होईल. युकेचे श्री. बर्नार्ड डुव्हरने हे घोड्यांच्या नाल कामावर (फॅरिअरी) आणखी एक थेट प्रात्यक्षिक सादर करतील. तसेच, या वेळी खालील विषयांवर विशेष सादरीकरणे होतील. या मध्ये संकरण, संघर्ष, कल्याण मानके आणि नीतिमत्ता, अश्व धोरण, घोड्यांची आयात-निर्यात, आणि पशुवैद्यकीय व औद्योगिक दृष्टिकोन या विषयांवर गुजरातच्या वनतारा येथील डॉ. रामनाथन, युके येथील सुश्री झारा पॉली, युके येथील श्री. रोली ओवर्स, पुणे येथील स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. नमेश किल्लेमशेट्टी, पुणे येथील प्रसिद्ध भारतीय अश्वारोहण क्रीडापटू श्री. कपिलेश भाटे, नेतृत्व प्रशिक्षक, ब्लडस्टॉक विशेषज्ञ आणि लेखक श्री. गौरव रामपाल आणि बंगळूर येथील गॅलोपिन व्हेट क्लिनिकचे डॉ. हसनेन मिर्झा यांसारखे तज्ञ मार्गदर्शन करतील. रविवार, १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता परिषदेची सांगता होईल.
’द इक्वेस्ट्रियन फोरम’च्या निमंत्रक कु. गायत्री राहुल कराड म्हणाल्या, भारताचा अश्व-उद्योग सध्या विखुरलेला आणि मोठ्या प्रमाणावर अप्रयुक्त असल्याने, अधिक मजबूत संस्थात्मक चौकट तयार करणे, मानके सुधारणे आणि आर्थिक व क्रीडा क्षमतांना चालना देणे यावर संवाद सुरू करण्याचा या फोरमचा उद्देश आहे. हा फोरम अश्व-क्षेत्रातील उद्योगाचे औपचारिकीकरण, प्रशासन, व्यवसायाची शाश्वतता, संकरण पद्धती, पशुवैद्यकीय विज्ञान, पोषण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करेल.
मुख्य सत्रे, पॅनेल चर्चा आणि नेटवर्किंगच्या संधींच्या माध्यमातून, ’द इक्वेस्ट्रियन फोरम’ अर्थपूर्ण भागीदारींना चालना देण्याचे आणि भारतातील अधिक सुसंगत व भविष्यासाठी सज्ज अशा अश्व-परिसंस्थेसाठी पायाभरणी करण्याचे उद्दिष्ट आहे.

वृंदावनमध्ये यमुनेत बोट उलटली, 10 पर्यटकांचा मृत्यू

मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे यमुना नदीत ३० पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्टीमर उलटली. या अपघातात दहा पर्यटक बुडून मरण पावले. त्यांपैकी सहा महिला आणि चार पुरुष होते. जहाजावरील सर्व पर्यटक पंजाबहून आले होते.

जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास श्री बांके बिहार मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या केसी घाटावर झाला. बचाव आणि मदत कार्यासाठी लष्कर दाखल झाले आहे.

पन्नास स्थानिक डायव्हर्सदेखील शोधकार्यात गुंतले आहेत. जखमींना रामकृष्ण मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील. गाझियाबादहून एनडीआरएफचे एक पथकही वृंदावनमध्ये दाखल झाले आहे.

जिल्हा दंडाधिकारी शैलेश पांडे यांनी सांगितले,दोन स्टीमरमधून पर्यटक प्रवास करत होते. त्यापैकी एक स्टीमर उलटली, ज्यात २५ ते २७ लोक होते. दहा जणांचा मृत्यू झाला. १२ जणांना सुखरूप वाचवण्यात आले. तीन ते पाच जण अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथके शोधकार्य सुरू ठेवत आहेत.

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवरच अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच!

  • पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश; सांडपाणी सोडणाऱ्यांवर व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

पिंपरी-चिंचवड : “एकवेळ नदी सुशोभित केली नाही तरी चालेल; मात्र ती प्रथम प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे मांडली. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केवळ नदी पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारे स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.

आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. तत्पूर्वी, मंत्री मुंडे यांनी तळवडे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन व इंद्रायणी नदीची सद्यस्थिती, तसेच रावेत येथील पंपिंग स्टेशन व पवना नदीतील प्रदूषणाची पाहणी करून परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेतले. यावेळी आमदार महेश लांडगे यांनी नदी प्रदूषणाची भीषणता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. बैठकीत ‘पीएमआरडीए’ व पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) यांच्या वतीने इंद्रायणी, पवना व मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था व उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्याचे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. “अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात; मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. यापुढे अशा उद्योगांवर केवळ नोटीस न बजावता थेट व कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढावीत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेस (सोसायटी) ‘एसटीपी’ सक्तीचा करावा व आपल्या हद्दीतील प्रत्येक नाला ‘एसटीपी’ला जोडून केवळ प्रक्रिया केलेलेच पाणी नदीत जाईल, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

जलप्रदूषणासोबतच वाढत्या वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावरही या बैठकीत गंभीर चर्चा झाली. बांधकामाच्या ठिकाणी इमारती योग्य प्रकारे झाकल्या (कव्हर केल्या) न गेल्याने हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा उघड्यावर सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नोटिसा बजावून हवेतील प्रदूषण कमी करण्याची सक्ती करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी ‘पीएमआरडीए’ व ‘पीसीएमसी’ला दिले.

या बैठकीला आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सहसचिव रमेश मनाले, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक जे. एस. साळुंके, पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता नीलेश बोडवे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता रिनाज पठाण व महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सविस्तर तांत्रिक माहिती दिली. बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी शहरातील जल व वायुप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत राज्य सरकारने भरीव सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली; त्यावर मंत्री मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

३१ मे अखेर मिळकत कर भरणारांना ५ ते १० टक्के सवलत

पुणे-

पुणे महानगरपालिकेच्या कर आकरणी व करसंकलन प्रमुख रवी पवार यांनी म्हटले आहे कि,’ विभागामार्फत सन २०२६-२७ ची सर्व देयके तयार करण्यात आली आहेत, नागरिकांच्या सोयीसाठी व कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मिळकत कराच्या सर्वसाधारण करामध्ये ५/१०% सवलत जाहीर करण्यात आलेली आहे.
ही सवलत दि. ३१ मे २०२६ पर्यंत लागू राहणार असून, जे नागरिक आपला संपूर्ण मिळकतकर विहित मुदतीत भरतील त्यांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे.
तरी, सर्व मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, दिलेल्या मुदतीत आपला संपूर्ण मिळकतकर भरून सवलतीचा लाभ घ्यावा. तसेच शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिक आपला कर ऑनलाईन भरू शकतात.
नागरिकांच्या सोयीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय., कॉसमॉस बँकेत देखील आपला मिळकतकर भरता येणार आहे तसेच पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र) सोमवार ते शनिवार सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत सुरु राहणार असून नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही याकरिता जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाईन पध्द‌तीने propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर आपला मिळकतकर भरावा. नागरिकांनी या सुविधांचा उपयोग करून शहराच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.