Home Blog Page 92

फटाक्यांमुळे गेल्यावर्षी तब्बल ६० आगीच्या दुर्घटना: अग्निशामक दलाने आठवण देत केले पुण्याला सावधान

अनधिकृत स्टॉलला विरोध करा …फटाक्यांपासून सावधान …!
सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन
शहरभर अग्निशमन दलाची जनजागृती मोहीम सुरूः फटाके विक्रेत्यांनाही सूचना
पुणे-दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. परंतु या सणात निष्काळजीपणे फटाके फोडल्यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. २०२१ मध्ये २१, २०२२ मध्ये १९, २०२३ मध्ये ३५ आणि २०२४ मध्ये तब्बल ६० फटाक्यांशी संबंधित आग लागण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम” सुरू केली आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवली जात असून नागरिकांमध्ये सुरक्षितते बाबत जागरूकता निर्माण करणे आणि आग अपघातांना आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत आहेत व मेगा फोनद्वारे जन जागृती संदेश दिले जात आहेत.
देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दिवाळी चा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा आहे. निष्काळजीपणा टाळला तर प्रत्येक घरात प्रकाश आणि आनंद राहील. आम्ही ही दिवाळी ‘सुरक्षित दिवाळी’ म्हणून साजरी व्हावी, अशी अपेक्षा ठेवतो.”
अग्निशमन विभागाचे नागरिकांना मार्गदर्शन :
१) फटाके नेहमी मोकळ्या जागेतच फोडावेत. गर्दीच्या भागात, इमारती जवळ किंवा वाहनां जवळ फटाके फोडू नयेत.
२) लहान मुलांना एकटे फटाके फोडू देऊ नयेत. त्यांच्या जवळ मोठ्यांचा देखरेख आवश्यक आहे.
३) फटाके हातात धरून पेटवू नयेत. अर्धवट फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
४) नायलॉन वाले कपडे वापरू नयेत; सूती कपडे वापरावेत.
५) पेटते दिवे, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या फटाक्यांच्या जवळ ठेवू नयेत.
६) फटाके फोडताना किमान पाच मीटर अंतरा वर उभे राहावे.
७) ज्वलनशील द्रव्ये, गॅस सिलिंडर, वाहनं वा विजेच्या तारा यांच्या जवळ फटाके फोडू नयेत.
८) फटाक्यांचा साठा घरात, वाहनात किंवा तळमजल्यात ठेवू नये. विक्रेत्यांनी साठा ठेवताना अग्निशमन परवानगी घेणे आवश्यक आहे.
९) फटाके विक्री केंद्रात अग्निशामक यंत्र (fire extinguisher) ठेवणे बंधनकारक आहे.
१०) प्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो “ग्रीन फटाके” वापरावेत.
११) फटाके संपल्यावर परिसरस्वच्छ ठेवावा.
१२) आग लागल्यास तत्काळ पाण्याने वा वाळू ने आग विझवावी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
अग्निशमन दलाची विशेष तयारी :
शहरातील सर्व 23 अग्निशमन केंद्रे आणि पथके २४४७ सतर्क असून या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत.

फटाके स्टॉल परिसरात अग्निशमन वाहने गस्त घालत जन जागृती करत आहेत.
नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असून अधिकारी नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणार आहेत.फटाके विक्रेत्यांना आणि नागरिकांना लेखी व मौखिक सूचना देण्यात येत आहेत.


मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचे नागरिकांना आवाहन :
“दिवाळी सणाचा आनंद सुरक्षितते सोबत साजरा करावा, निष्काळजी पणा टाळा, मुलांवर लक्ष ठेवा आणि पर्यावरण पूरक फटाके वापरा. कुठेही आग लागल्यास विलंब न लावता लगेच अग्निशमन विभागाशी दूरध्वनी १०१ या क्रमांक किंवा आपल्या नजीकच्या अग्रिशमन केंद्राशी संपर्क साधा. आनंदी दिवाळी सुरक्षितपणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.”


आपत्कालीन संपर्क क्रमांक:
१०१/०२०-२६४५१७०७/९६८९९३५५५६

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानातील माध्यमांनुसार, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी राजधानी काबूल आणि स्पिन बोल्दाक येथे बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यांमध्ये डझनभर लोक मारले गेल्याचे वृत्त आहे.

प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्ताननेही पाकिस्तानातील पेशावरमध्ये ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एका प्लाझामधील एका खोलीला लक्ष्य करण्यात आले. गुप्तचर कारवायांसाठी त्याचा वापर गुप्त कार्यालय म्हणून केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

या हल्ल्यांनंतर, दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही युद्धबंदी बुधवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता लागू झाली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की दोन्ही देश संवादाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानातील कंधार भागात हल्ले केले. लष्कराने म्हटले आहे की:

“आम्ही अफगाण तालिबानच्या हल्ल्यांना त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिले. त्यांचे मुख्य तळ उद्ध्वस्त झाले आहेत.

या हल्ल्यांमध्ये कंधार प्रांतातील तालिबानची चौथी बटालियन आणि सहावी बॉर्डर ब्रिगेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

अनेक तालिबानी लढाऊ आणि परदेशी मारले गेले. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांचे सैन्य कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देईल. अफगाण तालिबानने हे दावे फेटाळले आहेत, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

88 वर्षीय ज्येष्ठाची 19 लाखांची फसवणूक

पुणे – सायबर चोरट्यांनी अटक करण्याची भीती दाखवून एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला ९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. ‘नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने ५३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्यात तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. तुमच्या बँक खात्याची तपासणी करायची आहे आणि या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाईल,’ अशी भीती त्यांना दाखवण्यात आली.

या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ८० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता, त्यांना संशय आला. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

RSS विरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करा.

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२५

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग होत जोरदार घोषणाबाजी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध केला. या आंदोलनाची भनक लागताच पोलिसांनी सकाळपासूनच टिळक भवनला वेढा घातला होता. टिळक भवनला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही युवक काँग्रेसच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विकृत चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

“लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असताना भाजपा सरकारने मात्र पोलिसांना पुढे करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही धिक्कार करतो. केरळमधील इंजिनिअर आनंदू अजि यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी”, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांनी यावेळी केली.

मुख्य रस्त्यांप्रमाणे गल्लीबोळांचे देखील डांबरीकरण त्वरित सुरु करा’– संदीप खर्डेकर

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना शहरातील गल्लीबोळांचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पाठवलेल्या पत्रात, मुख्य रस्त्यांसोबतच दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आणि कामगारवर्ग रोज वापरत असलेल्या उपरस्त्यांचीही दुरवस्था लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.

खर्डेकर यांनी नमूद केले की, पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्ग गुळगुळीत करण्याची तयारी सुरू असली तरी कर नियमित भरणाऱ्या सामान्य पुणेकरांच्या वापरातील गल्लीबोळांकडे दुर्लक्ष होते आहे. मॉन्सून परतल्यानंतर रस्ते दुरुस्तीला अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे खड्डेमुक्ती आणि डांबरीकरण तातडीने सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे.पत्रात पुढे सांगितले आहे की, शहरात खड्डेयुक्त व असमतोल रस्त्यांमुळे नागरिकांना कंबरदुखी-मानदुखीचा त्रास वाढतो आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज झाकणं रस्त्याच्या समपातळीला नसल्याने अपघातांचा धोका निर्माण होतो. क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डे असलेल्या रस्त्यांची यादी तत्काळ तयार करून, त्या रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार याची सार्वजनिक माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बालभारती ते पौड फाटा रस्ता सर्वोच्च न्यायालयाने उठविली स्थगिती,आचारसंहितेपूर्वी काम सुरु करण्याची केसकर, कुलकर्णींची मागणी

पौड फाटा ते बालभारती हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होता.रस्त्याला विरोध करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्या काही भूमिका असतात त्याबद्दल आम्हाला आदर आहे.प्रसंगी आम्ही त्यांच्याशी संघर्षही केला.लोकशाही आहे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केलेली फेटाळून लावली.मुंबई उच्च न्यायालयाने देखील याचिका फेटाळली होती त्यानंतर याचिका करणाऱ्याने CEC कडे देखील अपील केले.CEC कडे अधिकार नसताना त्यांनी सुनावणी घेतली, त्यालाही आम्ही विरोध केला होता.आमची महानगरपालिका आयुक्त यांना विनंती आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे environment clearance certificate त्वरित प्राप्त करून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.मागच्या वेळेला स्थगिती नसताना देखील दबावाखाली महानगरपालिका प्रशासनाने काम सुरू केले नव्हते नवीन आयुक्तांनी तातडीने याबाबत प्रशासनाला आदेश देऊन पुढील प्रक्रिया निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी करावी. :उज्ज्वल केसकर-माजी विरोधी पक्ष नेता,सुहास कुलकर्णी-माजी विरोधी पक्षनेता

पुणे-बालभारती पौड रोडला जोडणाऱ्या वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला महापालिकेने पर्यावरण परवानगी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या मार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बालभारती ते पौड रस्त्यादरम्यानचा सुमारे दोन ते सव्वादोन किलोमीटरचा रस्ता भांडारकर संस्थेजवळील टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला आक्षेप घेत काही सामाजिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सर न्यायाधीश भूषण गवई आणि विनोद चंद्र यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे बराच विलंब झाला आहे.
यामुळे प्रकल्पाचा खर्च देखील काही पटीत वाढला आहे, ही बाब महालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महापालिकेने याकामासाठी इन्व्हायर्न्मेंट क्लिअरन्स घ्यावा आणि त्यानंतर काम करावे असे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली. न्यायालयाची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील समजू शकेल असे त्या म्हणाल्या. महापालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ऍड. अभिजीत कुलकर्णी, ऍड. राहुल गर्ग, ऍड. धवल मल्होत्रा आणि ऍड. निशा चव्हाण यांनी काम पाहिले. डॉ. सुषमा दाते आणि आय एल एस विधी महाविद्यालय या प्रकरणी न्यायालयात गेले होते.
प्रकल्पाबद्दल आक्षेप आणि न्यायालयीन वाद

पर्यावरणीय चिंता : रस्ता वेताळ टेकडीच्या हरित पट्ट्यातून जातो, ज्यामुळे झाडे तोडली जातील अशी भीती आहे.

  1. पर्यावरणवादी संघटनांचा विरोध : नागरी चेतना मंच, सुषमा दाते आणि इतर पर्यावरणप्रेमींनी यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
  2. सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) ने ‘हा भाग Deemed Forest मध्ये मोडतो’ असे निरीक्षण दिले आणि बांधकाम थांबविण्याची सूचना केली.
  3. पुणे महापालिकेचा दावा : रस्ता वेताळ टेकडीला विना बाधक पद्धतीने आणि फ्लायओव्हर तंत्राने बांधण्यात येईल, त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही.
    आक्षेप -.वेताळ टेकडीतील झाडे, जैवविविधता आणि भूजल पातळीवर परिणाम होईल.

’डोंगर फोडून रस्ता’ केल्यास पर्यावरणीय समतोल बिघडेल.

विद्यमान रस्त्यांचे सुयोग्य नियोजन केल्यास हा नवीन रस्ता आवश्यक नाही

प्रकल्पाचे फायदे

एफ.सी. रोड, गणेशखिंड रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.

कोथरूड-शिवाजीनगर प्रवासात वेळ वाचेल (सुमारे 20-25 मिनिटांची बचत).

शिवाजीनगर आणि चांदणी चौक-पुणे सेंट्रल दरम्यान वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

प्रकल्पाचा सारांश सविस्तर माहिती-

रस्त्याचे नाव बालभारती ते पौड फाटा रस्ता

अंतर सुमारे 2.1 ते 2.3 किमी रुंदी अंदाजे 30 मीटर

एमएनजीएलतर्फे दीपावली सुरक्षा जनजागृती अभियान

पुणे: सुरक्षित आणि आनंददायी दीपावली साजरी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख निवासी सोसायटींमध्ये piped natural gas (PNG) सुरक्षिततेसाठी जनजागृती अभियान राबवले. यामध्ये अरिस्टोरिया अपार्टमेंट्स, हडपसर; गंगा कॉन्स्टेला, खराडी; आणि ऑस्टिन काउंटी, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश होता.

या उपक्रमाचा उद्देश घरगुती PNG सुरक्षितपणे वापरणे आणि दिवाळी काळात घ्यावयाची विशेष सुरक्षितता उपायांची माहिती देणे हा होता. MNGLच्या ऑफिसर्सनी गॅस लीक ओळखणे, आपत्कालीन प्रतिसाद, आइसोलेशन व्हॉल्व्ह वापरणे, फायर एक्स्टिंग्विशर हाताळणे आणि प्राथमिक फायर सेफ्टी टिप्स याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच, स्थानीय लोकांना दीपावलीसाठी खास सुरक्षा सूचना दिल्या गेल्या. यामध्ये, MNGL पाईप, मीटर किंवा service regulator जवळ दिवे, मेणबत्त्या किंवा फटाके लावू नयेत, तसेच पाईप आणि मीटरवर काहीही ठेवू नये जे दिसण्यात अडथळा निर्माण करू शकते, जेणेकरून अपघात टाळता येईल. या जनजागृती कार्यक्रमात स्थानिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि घरगुती PNG सुरक्षिततेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्याचे कौतुक केले.

“सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” यावर भर दिला गेला. “या दीपावली अभियानाद्वारे समुदायांना सुरक्षित, आनंददायी आणि जबाबदारीने सण साजरा करता यावा, यासाठी प्रयत्न राबवले जात आहेत.” अशी माहिती Fire & safety विभागाचे प्रमुख सागर वर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

कुसुमाकर शंकर जोशी यांचे निधन

पुणे- कुसुमाकर शंकर जोशी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री 1.30 वाजता अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमित करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. निगडी प्राधिकरण येथील जानकीबन सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. तसेच अनेक वर्षे बजाज अ‍ॅटो कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. दैनिक प्रभातमधील संगणक विभाग प्रमुख दिपक पवार यांचे ते सासरे होत.

लोकमान्य नगरवासीयांचे आता प्रवीण दरेकरांनाही साकडे – पुनर्विकासातील स्थगिती उठवण्याची मागणी!

0

53 सोसायट्यांचा पुनर्विकास ठप्प – 700 नागरिकांच्या घराचे स्वप्न अधांतरी!

लोकमान्य नगर बचाव कृती समितीची प्रखर भूमिका, दरेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद!

पुणे – लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना निवेदन देण्यात आले. समितीने लोकमान्य नगरमधील पुनर्विकासावर लादण्यात आलेली स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी केली.

स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी काही बिल्डरधार्जिण्या व्यक्तींना हाताशी धरून 53 सोसायट्यांच्या पुनर्विकासास स्थगिती मिळवली, असा आरोप समितीने केला आहे. या निर्णयामुळे 700 पेक्षा अधिक कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी राहिले आहे. म्हाडातील काही अधिकाऱ्यांचीही यात मिलीभगत असल्याचा आरोप करण्यात आला.

पुनर्विकास प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने नागरिक संतप्त झाले असून, शेकडोंच्या संख्येने सुशिक्षित नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, म्हाडा कार्यालयाला घेराव घातला आणि आमदारांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री आणि म्हाडा उपाध्यक्षांना निवेदन देऊन, सह्यांची मोहीम राबवून निषेध नोंदविण्यात आला.

समितीने दरेकर यांच्यासमोर सांगितले की, 16 एकर परिसरातील 53 सोसायट्यांचा एकाच विकसकाद्वारे पुनर्विकास करणे अव्यवहार्य आहे. त्याऐवजी शासनाच्या 2022 च्या जीआरनुसार 2-3-4 इमारती एकत्र येऊन पुनर्विकास करीत आहेत, हे योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. काही सोसायट्यांनी म्हाडाला प्रीमियम स्वरूपात कोट्यवधी रुपये भरले असून, म्हाडाच्या निर्देशांचे पालन केले असल्याचेही स्पष्ट केले. प्रवीण दरेकर यांनी सर्व बाजू ऐकून घेतली, प्रश्न विचारून चर्चा केली व मुंबईत म्हाडा अधिकाऱ्यांसह समितीची बैठक घेऊन स्थगितीचा मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस गणेश सातपुते, हेमंत पाटील, सुनील कुसुरकर, डॉ. कपिल पाटील, मुकेश वैराट, अन्वय भोसले, कुणाल पाटील, वैभव ललवाणी, सारंग कुलकर्णी, शैलेश चौधरी, ज्योती गुजर आणि महेश महाले उपस्थित होते.

“आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी’ निघाली रॅली; युवक- युवती मोठ्या संख्येने सहभागी

पुणे दि. 15 : समाज कल्याण विभाग स्थापना दिन व व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी” या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा यादरम्यान हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.

या रॅलीचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल स. भा. मडामे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाचे विचार मासिक “कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा” याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कल्याणयात्रा चे संपादक अमोल मडामे, होप व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. विजय मोरे, नशाबंदी मंडळाचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे, पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅलीच्या सुरुवातीला कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पथनाट्य सादरीकरणाचे कौतुक सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी केले. रॅलीच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती संसारे यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

रॅली छत्रपती संभाजी मैदान येथून सुरू होऊन पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून शनिवारवाड्यापर्यंत मार्गक्रमण करत पार पडली. रॅलीच्या अखेरीस शनिवारवाड्याच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्याकडून देण्यात आली.

यावेळी नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक व रॅलीचे संयोजक अमोल मडामे यांनी सांगितले की, “निर्व्यसनी तरुण पिढी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे प्रवृत्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “व्यसनमुक्त जीवनातूनच व्यक्तीचा उत्कर्ष साध्य होऊ शकतो आणि त्यातूनच समाजसेवा शक्य आहे.”

या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे आणि पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर. के. गायकवाड हेही उपस्थित होते.

27 वर्षांपासून न्यायालयाच्या चकरा मारून थकला,अखेर पुणे कोर्टाच्या इमारतीवरून उडी मारून संपला : ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे-पुण्यामध्ये न्याय व्यवस्थेतील विलंबामुळे हतबल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेली तब्बल 27 वर्षे कोर्टात खटला सुरू असतानाही न्याय मिळत नसल्याने नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव यांचा जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला वाद पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित होता. इतक्या दीर्घकाळ खटला चालूनही कोणताही निकाल लागत नसल्यामुळे ते अत्यंत निराश झाले होते. आज सकाळी (दि. 15 ऑक्टोबर) नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते. काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्याय मिळण्यास होत असलेला विलंब आणि खटला दीर्घकाळ चालल्यामुळे जाधव मानसिक तणावाखाली होते. 27 वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येपूर्वी जाधव यांनी कोणती सुसाइड नोट लिहिली आहे का? याचाही शोध घेत आहेत.

विचार, नवाचार व तंत्रज्ञानाच्या मार्गानेच भारत स्वयंपूर्ण बनेल-बीजीपीचे माजी अध्यक्ष श्याम जाजू

-एमआयटी डब्ल्यूपीयूत मिटसॉगच्या २१व्या बॅचचा शुभारंभ

पुणे १५ ऑक्टोबरः ” विचार, नवाचार आणि तंत्रज्ञानाच्या मार्गानेच भारत स्वयंपूर्ण बनेल. राजकीय क्षेत्रात चारित्र्यवान व्यक्तीची गरज असून तेच समाजाला परिपूर्ण बनवितील. समाज आणि देश चालविण्यासाठी चारित्र्यावान नेत्याची आवश्यकता असते. राजकारणात पाऊल ठेवणार्‍या विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांबरोबरच सामाजिक जबाबदार्‍या पेलण्यासाठी तत्पर असावे.”असे विचार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित ‘मास्टर्स इन पॉलिटिकल लिडरशीप अँड गव्हर्नमेंट’ (एमपीजी) २१ व्या बॅचच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुणे व गोवा बार कॉन्सीलचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.डी.पी. अग्रवाल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ..य संजय उपाध्ये, एसओजीचे प्रा. डॉ. सुधाकर माया परिमल व डॉ. अभिजीत ढेरे हे उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी एमपीजेची पुस्तक व डॉ. संजय उपाध्ये लिखित पुस्तकांचे प्रकाशन केले.
श्याम जाजू म्हणाले, ” ज्याला काहीच येत नाही तो राजकारणी बनतो ही जी धारणा आहे त्याला आता बदलून सुशिक्षीतांनी राजकारणात यावे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. शैक्षणिक आणि व्यावहारीक शिक्षण पद्धती आवश्यक असून त्यामधूनच चांगले नेतृत्व उदयास येईल. एसओजीचे शैक्षणिक मॉडेल आदर्श असून शासकीय यंत्रनेत अशा मॉडेलचा आंतरभाव आवश्यक आहे.”
अ‍ॅड. जयंत जायभावे म्हणाले,”भारतीय राज्य घटना ही लोकशाहीचा आत्मा आहे. तर संवाद हा श्वास आहे. संविधानाची उद्देशीका आपल्याला चांगला व्यक्ती आणि नागरिक बनण्यासाठी मूल्य देते. हीच मूल्य मुलांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. तसेच राजकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी सदनामधील भाषणांचा अभ्यास करावा. याच्यातून वैश्विक लोकशाहीची परिभाषा लक्षात येईल. एसओजीच्या विद्यार्थ्यांनी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याची संकल्पना समजावून घ्यावी. ”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे आहे. राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची ब्यूरोक्रॉसी व स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. देशातील वेगवेगळ्या राज्यात एसओजीचे मॉडेल सुरू आहे. आमदारांसाठी देशात ज्या पद्धतीने एनएलसीचे आयोजन केले होते त्याच धर्तीवर अमेरिकेत १५० आमदारांच्या सम्मेलनाचे आयोजन केले होते. आता देशातील जुन्या गोष्टींचे फ्रेमवर्क बदलने गरजेचे आहे.”  
डॉ.डी.पी. अग्रवाल म्हणाले,” राष्ट्रीय स्तरावर देशाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्थांनी सखोल विचार करणे गरजेचे आहे. एमआयटी ने सुरू केलेला एसओजीचा पाठ्यक्रम हा केवळ शैक्षणिक स्तरावर मार्यादित न राहता व्यापक आहे. या देशाला अशा लीडरची गरज आहे जे तळागळात जाऊन कार्य करतील.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,”वर्तमान काळात राजकीय पक्षांमधून अध्यात्मिकता लोप पावली आहे. त्यामुळेच नेत्यांचा सांस्कृतिक स्तर घरलेले दिसते. एक चांगले नेतृत्व कोणत्याही क्षेत्रात सकारात्मक बदल घडवू शकतात. एक चांगला माणूसच चांगला नेता बनू शकतो.”
देशात सुशिक्षित व्यक्ति राजकारणात यावे या उद्देशाने स्कूल ऑफ गव्हर्नमेंट सुरू करण्याची माहिती संकल्प संघई यांनी दिली.
डॉ. सुधाकर माया परिमल यांनी मिटसॉगच्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगितली.
यावेळी विद्यार्थी बी.एस. प्रसन्न व सांगलीची तन्वी खाडिलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिजीत ढेरे यांनी आभार मानले.

महापालिकेच्या जागा पीएमपीएमएल ला द्या-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ला बस स्थानके आणि बसगाड्या पार्क करण्यासाठी महापालिकेच्या जागा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे आज (बुधवारी) केली.

सुमारे १लाख४३हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागा महामेट्रो ला देण्याचे घाटत असल्याचे समजते. महापालिकेची जागा परस्पर महामेट्रोला देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.

पीएमपीएमएलच्या बस थांब्यात नजीकच्या काळात १२०० गाड्यांची भर पडणार आहे. पीएमपीला बस स्थानके आणि रात्रीच्या वेळी बसगाड्यांचे पार्किंग यासाठी जागा लागणार आहे. पीएमपीच्या सार्वजानिक बससेवेचा लाभ दररोज ११ लाख प्रवासी घेत असतात. अशा या महत्वाच्या बससेवेसाठी प्राधान्याने जागा देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात सुनिल मलके, अविनाश बागवे, प्रथमेश आबनावे, मुख्तार शेख, आयुब पठाण, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, गौरव बोराडे, सुरेश कांबळे, ॲड. प्रविण करपे, ॲड.साहिल राऊत, विनोद रणपिसे, मिलिंद पोकळे, अमोल धर्मावत, ॲड.विजय त्रिकोणे, विकास सुपनार, मेधशाम धर्मावत, सुनिल बावकर, हुसेन शेख, दयानंद आडागळे, गोपाळ धनगर आदी सहभागी होते.

लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही गाजवू देणार नाही:उद्धव ठाकरे म्हणाले- निवडणूक आयोग भाजपचा बटीक, सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का?

मुंबई-आमच्यावर लोकशाहीच्या नावाने जर हुकूमशाही गाजवणार असतील तर ती आम्ही काही गाजवू देणार नाही.आम्ही दोन्ही आयुक्तांची काल भेट घेतली राज्य निवडणूक आयुक्त केंद्राकडे बोट दाखवतात तर केंद्राचे राज्य निवडणूक आयोगाकडे नेमकी याची जबाबदारी कुणाची आहे, यांचा बाप कोण आहे? का केवळ निवडणूक घ्यायची म्हणून घ्यायची,असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना निवडणुका जाहीर करून टाकल्या.आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की मतदार यादीमधील घोळ सुधारत नाही तोपर्यत निवडणुका होता कामा नये. सर्वोच्च न्यायालय कधीच म्हणणार नाही की काही दोष असेल तरीही निवडणूक घ्या म्हणून. सत्ताधाऱ्यांच्या चोर वाटा आम्ही आता अडवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, जे मतदार आहेत पण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट ठेवणार नाही म्हणजे काहीच पुरावे हे ठेवणार नाही. तिथले जर सीसीटीव्ही फुटेज मागितले तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचे नाही. मतदार याद्यांमध्ये घोळ घालून ठेवायचा. लोकशाही जर हुकूमशाहीच्या पद्धतीने चालवणार असाल तर आम्ही तसे होऊ देणार नाही.

लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही सर्व जण एकत्र येत असताना भाजपला देखील पत्र दिले होते पण निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी भाजपकडून कोणीही आले नाही, हा विषय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून सर्वांच्या लक्षात आला आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या 1 महिन्यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहले होते. भाजपचे लोकं मतदार यादीशी खेळत आहेत त्यांना हवे त्यांची नावे ॲड करत आहेत आणि नको असलेली नावे काढून टाकत आहेत. हा सर्व खेळ भाजपचा सुरू आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे, ही यादी आम्ही काही घरी तयार केली नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच व्यक्तीचे नाव 4 ठिकाणच्या मतदार यादीमध्ये आहे. एकाच ठिकाणी 200 मतदार दाखवण्यात आले आहेत. निवडणूक ही निःपक्षपाती घ्यायची असेल तरी घ्या नाही तर निवडणुकीपेक्षा सिलेक्शन करत मोकळे व्हा..निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलताना लक्षात आले की यांच्याकडे आयुक्त म्हणून
काही अधिकार आहेत का आम्ही केवळ नामधारी लोकांशी बोलत आहोत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 1 जुलै नंतर ज्यांना 18 वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना मतदानाचा हक्क ना हा कुठला अधिकार आहे.हे सर्व पाहिले की वाटतं ज्या प्रमाणे काही पक्षी, प्राण्याच्या केसेस सुमोटो घेतल्या होत्या, त्यांनी देशातील मनुष्य प्राण्याच्या केस घेतल्या पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचे कर्तव्य करत आहोत, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जात आहोत पण आम्हाला काही दाद दिली जात नाही.

भारतीय स्वातंत्र्य लढा आणि प्रतीके ही सत्ताधारी यांनी हायजॅक केली-अनंत बागाईतकर

पुणे –

“राष्ट्रीय युद्ध स्मारक”  दिल्ली मध्ये उभारले गेले आहे पण, त्याला “राष्ट्रीय शौर्य स्मारक”  म्हटले जात नाही. दुसऱ्यांना चिथावणी देणारे सनातनी लोक असून त्याचा सामना वैचारिक पातळीवर केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य काळातील स्मारक या इतिहासाची मोडतोड सध्या सत्ताधारी यांच्याकडून सुरू आहे. भारतीय  स्वातंत्र्य लढा आणि प्रतीक हे सत्ताधारी यांनी हायजॅक केले आहे. ही बाब गांधी विचारधारानुसार लोकांना समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. टोकाच्या भूमिका घेण्यापासून आतापर्यंत सत्ताधारी यांनी वेगवेगळया समाजाला रोखले होते परंतु आता समाजात विविध जातीधर्मात टोकदार भूमिका मांडल्या जात आहे. देशातील विविधता टिकण्यासाठी संसदीय लोकशाही प्रणाली आणली गेली असून हुकूमशाही भूमिकेपासून ती टिकवली पाहिजे. उदारमतवादी मध्यममार्गी विचारधारा याचे अनुसरण आपल्याला करावे लागणार आहे असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रस्ता, पुणे याठिकाणी‘सत्याग्रही विचारधारा’ ३४व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी अध्यक्ष व संपादक डॉ. कुमार साप्तर्षी , व्यकटेशं केसरी, विश्वस्त  जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख,ॲड अभय छाजेड,अन्वर राजन , अंजली सोमण उपस्थित होते.

अनंत बागाईतकर यांनी सांगितले की, सत्याग्रही विचारधारा मासिक निमित्ताने गांधी विचार, प्रसार मागील ३४ वर्षापासून सुरू आहे याचा अर्थ गांधी यांनी मांडलेला विचार अद्याप मेलेले नाही हे सिद्ध होते. आज ही हा विचार जनते मध्ये जागृत आहे, विचार कधी मरत नसतो. सनातनी विचार आणि गांधी विचार यात तफावत असून सनातनी विचार याला हिंसाचा आधार आहे. गांधी यांनी हिंदुत्वाची उदारमतवादी भूमिका मांडली ते धर्मनिरपेक्ष होते. ज्या गांधी यांनी अहिंसा विचार मांडला त्याविरोधात काही जणांनी भूमिका मांडली. अलीकडच्या काळात सर्वात हिंसक शहर म्हणून पुण्याची आता ओळख निर्माण होऊ लागली आहे. हिंसाला सत्तेचे पाठबळ मिळत आहे. सरसंघचालक यांनी विजय दशमीला नागपूरला जे भाषण केले त्यात कायद्याचे पालन करू सांगितले पण त्यांच्या ज्या इतर संघटना आहे यांच्याकडून हिंसा सुरू त्याचा निषेध व्यक्त केला नाही.मूकपणे हिंसा मान्य करणारा हा विषय आहे. दिल्ली येथील स्वयंघोषित ब्रह्मांडनायक पंतप्रधान यांनी पटेल विरुद्ध नेहरू, गांधी विरुद्ध बोस असे वाद विनाकारण निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध सुरू केला आहे. मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित ठेवण्याचा जो विचार आहे तो दूर लोटला पाहिजे.

प्रा. जयदेव डोळे म्हणाले, ३५ वर्षापूर्वी कुमार सप्तर्षी औरंगाबाद याठिकाणी आले होते आणि त्यांनी “सत्याग्रही विचारधारा”  दिवाळी अंक काढण्याचे निश्चित केले होते. सत्याग्रही विचारधारा विरुद्ध सनातनी  विचारधारा हा संघर्ष आता सुरू झाला आहे. महात्मा गांधी यांच्या झंझावात पुढे सनातनी विचारधारा टिकू शकली नाही. अस्पृश्यता विरोधात गांधी यांनी १९२५ साली सत्याग्रह सुरू केला. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील विरोधी विचारधाराचा सुरू झाला. यंदा त्यांचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. संघाचा चेहरा सत्तेसाठी आणि प्रसिद्धीसाठी आसुसलेला आहे हे प्रखरतेने आज जाणवत आहे. जी संस्था सरकार दरबारी नोंदणी नाही, आधारकार्ड नाही त्यांची शताब्दी धूमधडाक्यात साजरी होते.देशात अनेक विद्यापीठ शताब्दी पूर्ण करतात पण त्याबाबत गाजावाजा होत नाही. सत्तेवर बसलेले लोक सतत अपप्रचार करत आहे. सत्याग्रही विचार टिकून ठेवण्याचे काम डॉ. सप्तर्षी आणि सहकारी यांनी टिकवून ठेवले आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद, राजकारण, अर्थकारण, परराष्ट्र धोरण या चोहोबाजूने सनातनी विचारधारा यास मिळालेला लोकांचा पाठिंबा बनावट असल्याचे हळूहळू निष्पन्न होऊ लागले आहे. बनावट मतदार प्रकरण मांडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारची  पोलखोल केली आहे.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, जीवनात अनेक विसंगती मध्ये जीवन जगायचे कसे असा प्रश्न अनेक भारतीयां पुढे आहे. जन्माला मनुष्य जातीने येतो पण जातीमुक्त झाल्यावरच भारतीयत्व निर्माण होते. भारतीय स्वातंत्र्य लढा हा अहिंसेने झाला होता. जे हिंसक कृत्य करणारे होते ते काळाच्या प्रवाहात लुप्त झाले.जी गोष्ट नैसर्गिक असते ती काळाच्या ओघात टिकून राहते त्यामुळे सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभाव यावर आधारित गांधी विचार टिकला पाहिजे. ब्राम्हणवाद हा करमणुकीचा विषय नाही तर गंभीर गोष्ट आहे. स्वतःला विशेषणे लावून घेण्यात त्यांना धन्यता वाटते. सर्व जातीत विषारी पद्धतीचे ब्राम्हणय आणले गेले आहे. त्यामुळेच अहिंसा, बंधुत्व आधारित सत्याग्रही विचारधारा ही निरंतर चालणारी आहे.

सत्याग्रही मासिकाचे उपसंपादक अभय देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.