Home Blog Page 9

राष्ट्रीय दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे (एनएमएमएस) रविवार २८ डिसेंबर, २०२५ रोजी आयोजन करण्यात आले असून प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mscerumms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७५८ केंद्रावर घेण्यात येणार असून परीक्षेसाठी राज्यातून १३ हजार ७८९ शाळा व एकूण २ लाख ५० हजार ५४४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदींमध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी २७ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही. ऑनलाईन आलेल्या अर्जाव्यतिरिक्त टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही. या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

डॉ. बाबा आढाव यांचे कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ९ : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, चेतन तुपे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, डॉ. बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित आदी वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी, असंघटित कामगारांच्या प्रसंगात त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. ते विचार घेऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यांनी बाबा आढाव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बाबा आढाव यांच्या पत्नी शीलाताई आढाव, मुलगा असीम आढाव, अंबर आढाव आदी उपस्थित होते.

बॉम्बे हायकोर्टात 2381 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी; 10वी पासपासून पदवीधरांना संधी, पगार 1 लाख 77 हजार पर्यंत

मुंबई-बॉम्बे उच्च न्यायालय (BHC) ने स्टेनोग्राफर, लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि चालक या पदांसाठी भरती काढली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
लिपिक
1382

शिपाई 887
ड्रायव्हर 37
लघुलेखक निम्न श्रेणी 56
लघुलेखक उच्च श्रेणी 19
एकूण पदांची संख्या 2381
शैक्षणिक पात्रता :

पदानुसार 10वी उत्तीर्ण ते पदवीधर.

शिपाई :

मराठी वाचता-लिहिता येणे आवश्यक आहे.

ड्रायव्हर :

10वी उत्तीर्ण
एलएमव्ही परवाना आणि वाहन चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव
लघुलेखक निम्न श्रेणी :

पदवी आणि 80wpm शॉर्टहँडसह 40wpm च्या गतीने टायपिंग येणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर लोअरसाठी पदवी, 100wpm च्या गतीने शॉर्टहँड आणि 40wpm च्या गतीने टायपिंग आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

किमान : 18 वर्षे
कमाल : 38 वर्षे

शुल्क :

सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी : 1000 रुपये

परीक्षेचे स्वरूप :

लिपिक पदासाठी 90 गुणांची स्क्रीनिंग टेस्ट (चाळणी परीक्षा) असेल. यात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 गुण मिळवणे आवश्यक आहे.
ही परीक्षा एक तासाची असेल.
यात मराठीसाठी 10 गुण, इंग्रजीसाठी 20 गुण, सामान्य ज्ञानासाठी 10 गुण, सामान्य बुद्धिमत्तेसाठी 20 गुण, अंकगणितासाठी 20 गुण आणि संगणकासाठी 10 गुणांचे प्रश्न विचारले जातील.
स्क्रीनिंग टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना 20 गुणांच्या टायपिंग टेस्टसाठी बोलावले जाईल, ज्याचा कालावधी 10 मिनिटे असेल. यात 400 शब्दांचा टायपिंग पॅसेज असेल आणि किमान 10 गुण मिळवणे आवश्यक असेल.
निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
कागदपत्र पडताळणी
पगार :

लिपिक : 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) : 49100-155800 रुपये प्रति महिना
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) : 56100-177500 रुपये प्रति महिना मिळेल.
असा करा अर्ज :

अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जा.
होम पेजवरील करिअर लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करून पुढील पानावर जा.
आवश्यक तपशील भरून कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
ऑनलाइन अर्ज लिंक https://bombayhighcourt.nic.in/index.php

स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) भरती अधिकृत अधिसूचना लिंक https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20251208233337.pdf

स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) भरती अधिकृत अधिसूचना लिंकhttps://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20251208233336.pdf

लिपिक भरती अधिकृत अधिसूचना लिंकhttps://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20251208233335.pdf

कार चालक भरती अधिकृत अधिसूचना लिंकhttps://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20251208233334.pdf

शिपाई, हमाल भरती अधिकृत अधिसूचना लिंकhttps://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20251208233333.pdf

राहुल गांधी म्हणाले-RSS निवडणूक आयोगासह ईडी, सीबीआय, आयबी आणि आयकर विभाग ताब्यात घेत आहे

देशभरातील विद्यापीठांमध्ये आरएसएसचे कुलगुरू बसले आहेत

नवी दिल्ली-मंगळवारी, हिवाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी, लोकसभा निवडणूक सुधारणा आणि विशेष सघन सुधारणा (SIR) यावर चर्चा करत आहे. राहुल गांधी म्हणाले, “आरएसएस सर्व संस्थांवर ताबा मिळवू इच्छित आहे. निवडणूक आयोग ताब्यात घेतला जात आहे आणि भाजप निवडणुकीत त्याचा वापर करत आहे.”राहुल म्हणाले, “ईडी, सीबीआय, आयबी आणि आयकर विभाग ताब्यात घेतले जात आहेत आणि आरएसएस हे सर्व करत आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये आरएसएसचे कुलगुरू बसले आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”

यापूर्वी, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, सरकार आणि निवडणूक आयोग एसआयआरच्या नावाखाली गुप्तपणे एनआरसी लागू करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. ते म्हउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की ते डिटेंशन सेंटर बांधत आहेत. जे ते उघडपणे करू शकत नाहीत ते एसआयआरच्या नावाखाली करत आहेत.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, एसआयआर हे मतं वगळण्याचे साधन बनले आहे. निवडणूक आयोग एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग म्हणत आहे की, पाच लाख मतदार वगळले गेले आहेत, सहा लाख मतदार वगळले गेले आहेत आणि भाजप आनंद साजरा करत आहे.

मनीष तिवारी म्हणाले, “निवडणूक आयोग एसआयआर करू शकत नाही; ते बेकायदेशीर”

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी चर्चेला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, १२ राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणारा एसआयआर बेकायदेशीर आहे. संविधानात राज्यव्यापी एसआयआरची तरतूद नाही आणि ती तात्काळ थांबवली पाहिजे.

तिवारी म्हणाले की, देशात निवडणुकांपूर्वी थेट केस ट्रान्सफरवर बंदी घालावी, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करून निवडणुका घ्याव्यात. शिवाय, निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असावा.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक एसआयआर आणि मतचोरीवर चर्चा व्हावी अशी मागणी करत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी, १-२ डिसेंबर रोजी, विरोधकांनी चर्चेची मागणी करत गोंधळ घातला.

यानंतर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी २ डिसेंबर रोजी सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावले. ९ डिसेंबर रोजी सरकार आणि विरोधी पक्षांनी लोकसभेत १० तासांच्या चर्चेसाठी सहमती दर्शविली.

उन्हाळी भुईमुगासाठी १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणेशेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 9 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) सन २०२५ अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढविणे व सुधारित वाणांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने उन्हाळी हंगाम २०२५ साठी भुईमुग पिकाकरिता प्रति हेक्टर १५० किलो भुईमुग शेंगांचे प्रमाणित बियाणे (दर रु. ११४/- प्रति किलो)१०० टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देय राहणार आहे.

शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांकडे भुईमुग बियाण्याचे २० किलो व ३० किलोचे पॅकिंग उपलब्ध असून, शेतकऱ्यांना पॅकिंग साईजनुसारच बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे क्षेत्रानुसार आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे लागल्यास त्या अतिरिक्त रकमेचा भरणा शेतकऱ्यांना स्वखर्चातून करावा लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील https://mahadbt.maharastra.gov.in/FarmerAgriLogin/AgrrilLogin या संकेतस्थळावरून प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक औषधे व खते टाईल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. १०० टक्के अनुदानावरील या घटकासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड ही लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातुन पुण्यातून ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेची सुरूवात ; महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बळकट पाऊल

पुणे, दि. 9 : राज्यातील लहानग्या मुलींच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यात ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती राज्याची वचनबद्धता अधिक मजबूत करणारे हे एक निर्णायक पाऊल ठरत आहे.

भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत आहे. दररोज सुमारे २०० महिलांचे प्राण घेणारा हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामान्य कर्करोग आहे. परंतु नियमित तपासणी, योग्य वेळी लसीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचार केल्यास हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो, यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेली ही मोहीम ९ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये लवकर जागृती, प्रतिबंध आणि एचपीव्ही लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबवित आहे. कुटुंबांना योग्य माहिती उपलब्ध करून देत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट या मोहिमेमार्फत साध्य केले जात आहे.

राज्य शासनाने जीविका फाउंडेशनची (जीविका हेल्थकेअर) अंमलबजावणी भागीदार म्हणून नियुक्ती केली असून, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद पुणे आणि आरोग्य विभाग यांच्यासह समन्वय साधून जागृती, पालक सहभाग आणि कार्यक्रमाची सुटसुटीत अंमलबजावणी करण्यात संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच जीविका फाउंडेशन विविध कॉर्पोरेट संस्थांशी CSR च्या माध्यमातून भागीदारी करून उपक्रमाला गती देत आहे.

पुणे जिल्ह्यात ZS – ग्लोबल मॅनेजमेंट अँड कन्सल्टिंग फर्म, आयसर्टिस, कॅरॅटलैन, ब्रिजनेक्स्ट इंडिया प्रा. लि., जेबीएम ऑटो आदी संस्थांच्या CSR सहाय्यामुळे आतापर्यंत ६००० हून अधिक मुलींना एचपीव्ही लसीकरणाद्वारे सुरक्षित करण्यात आले आहे. तसेच बजाज फिनसर्व आणि ZS यांच्या सहकार्याने आणखी ५,००० लाभार्थींना संरक्षण देण्याचे नियोजन आहे.

देशातील महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्यावर केंद्रित असलेल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांपैकी हा उपक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शाळांमध्ये शिक्षक व स्थानिक नेतृत्वाच्या सहभागाने जागृती सत्रे व लसीकरण मोहिमा घेण्यात येणार असून, विद्यार्थिनी व पालकांमध्ये लसीबद्दल विश्वास निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र मोहीम ही राज्यातील प्रत्येक मुलीपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. आपल्या मुलींचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून, राज्याच्या आरोग्यदायी भविष्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने CSR च्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवावा.”

भक्कम नेतृत्व, समर्पित भागीदारी आणि समाजाच्या सक्रीय सहभागामुळे पुणे जिल्हा हा तरुण पिढीसाठी अधिक निरोगी, सशक्त आणि ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त’ भविष्य घडविण्याच्या महाराष्ट्राच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक बनत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदतवाढ

0

पुणे, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in व http://puppssmsce.in या संकेतस्थळावर विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबरपर्यंत तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत सादर करता येतील. ३१ डिसेंबर नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
0000

विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडीमुक्त;रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच

पर्यटकांना घडणार पुण्याच्या वारसा, कला, संस्कृतीचे दर्शन

पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे

हवाई मार्गाने पुण्यात येणाऱ्या पर्यटक-प्रवाशांना लवकरच जाता-येताना उत्तम दर्जाचा प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार आहे. तसेच त्यांना पुण्याच्या समृद्ध वारसा, कला, परंपरा, संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. यासाठी नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता सध्याच्या १२ मीटरवरून २४ मीटर रुंद केला जाईल. व त्याला सुशोभीकरणाची जोड दिली जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) विकसित होणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती पुण्याचे खासदार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

लोहगाव येथे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे २००- २२५ उड्डाणे होतात. तर वार्षिक प्रवासीसंख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होते आहे. मात्र, प्रवाशांची आणि वाहनांची वर्दळ वाढल्याने विमानतळ रस्त्यावर बाराही महिने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक बनले होते. नागपूर चाळ ते विमानतळापर्यंत रस्ता हवाई दलाचा आणि खाजगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात येत नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण दीर्घकाळ रखडले होते. त्यामुळे मोहोळ यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नामुळे हवाई दलाने नागपूर चाळीपासून विमानतळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मंजुरी दिली. तसेच खाजगी जागा मालकांनी भूसंपादनाला मान्यता दिली. त्यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळपर्यंत ३ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

रस्त्याची वैशिष्ट्ये

  • नागपूर चाळ ते विमानतळ रस्ता १२ मीटरवरून २४ मीटर रुंद होणार
  • जागतिक दर्जाचा रस्ता विकसित केला जाणार
  • पादचारी मार्ग, शोभिवंत झाडे, कारंजी, विद्युत रोषणाई- प्रवासी व नागरिकांसाठी आकर्षक फर्निचर-
  • चित्र व शिल्पांद्वारे उलडगणार पुण्याचा गौरवशाली वारसा कला, संस्कृती, परंपरेचेही घडणार दर्शन


विमानतळावरून पुण्यात येताना आणि जाताना दिसणारे चित्र पाहून प्रवाशांच्या मनात पुण्याचे पहिले आणि शेवटचे प्रतिबिंब उमटते. पुण्यात येताना त्यांना प्रसन्नतेचा अनुभव यावा,शहराची ओळख व्हावी आणि जाताना शहराचा समृद्ध वारसा, संस्कृती, परंपरा, सोयीसुविधा यांचा ठसा त्यांच्या मनावर कायमस्वरूपी उमटावा, यादृष्टीने हा रस्ता विकसित केला जात आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. हा रस्ता पुण्याची नवी ओळख बनेल.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

सदाशिव पेठेत रमेश डाईंग येथे टेरेसवर आग:परिसरात धुराचे साम्राज्य: वाहतुकीचा बट्ट्याबोळ

अग्निशमन दलाकडून चार अग्निशमन वाहने दाखल. आग विझवण्याचे काम सुरु..

पुण्यातील फॅब्रिक व डाईंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रमेश डाईंग दुकानाला अचानक भीषण आग लागली. दुकानाच्या शेवटच्या मजल्यावरून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेवटच्या मजल्यावरील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दुकानातील मोठ्या प्रमाणातील कापडसाठा व इतर साहित्याला आगीचा मोठा धोका निर्माण झाला. आग लागलेल्या मजल्यावर अत्यंत ज्वलनशील वस्तू असल्याने ज्वाळा वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल होऊन आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी – संदीप खर्डेकर.

पुणे –पुणे पुस्तक महोत्सवात आज ” शांतता पुणेकर वाचत आहेत ” ह्या उपक्रमात उद्यम विकास सहकारी बँकेचे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.
नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी आणि ती प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची असावी, मोबाईल नव्हे असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले. उद्यम सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज ह्या उपक्रमात सहभाग घेतला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, संचालक गोकुळ शेलार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळमकर व कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सीया यांचे “इकीगाई”, डॉ. उदय कुलकर्णी यांचे “नानासाहेब पेशवा एक विलक्षण कालखंड”,चंद्रशेखर गोखले यांचा कविता संग्रह, रॉबर्ट कियोसाकी यांचे “Rich dad poor Dad”,पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे “एकात्म मानववाद”,डॉ. दत्ता कोहीनकर यांचे “सुखी जीवनाची गुरुकिल्ली”, विश्वास नांगरे पाटील यांचे “कर हर मैदान फतह “, तुषार रंजनकर व नवनाथ जगताप यांचे ” मोबाईल व्यसनमुक्ती ” यासह विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करण्यात आले. यापुढे रोज रात्री काही न काही वाचूनच झोपण्याचा निर्धार देखील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात प्रामुख्याने मनोज शिंदे,सौ.इंद्रायणी रड्डी,सौ.शुभांगी कडू,सौ. शुभांगी माकर,सौ. प्रियांका मेलगे,विनायक पडवळ, सुरेंद्र यादव,कु. वैभवी शिंदे,इ सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संयोजन संदीप खर्डेकर यांनी केले.

महाराष्ट्रात थंडी वाढणार,पुढील 48 तास धोक्याचे

0

मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे, राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका इतका वाढला आहे की, सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या अडचणीत येत आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, देशाच्या मध्य पट्ट्यासोबतच महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमान मोठ्या प्रमाणात घसरणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत तीव्र शीतलहरीचा सामना करावा लागणार असल्याची चेतावणी वर्तवली आहे. त्यामुळे येणारे 48 तास अतिशय धोकादायक असणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.

या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाडा विभागात तीव्र थंडीची लाट पसरणार असून, किमान तापमानात सतत घट होत राहील. मध्य महाराष्ट्रातही 10 ते 12 डिसेंबरदरम्यान काही जिल्ह्यांमध्ये शीतलहरीची चिन्हे दिसणार आहेत. संपूर्ण राज्यातील तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या अचानक गारठ्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

इतकेच नव्हे, तर हवामान विभागाने उत्तर-पश्चिम भारतालाही या थंडीच्या लाटेचा पुढील टप्पा असण्याची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थान या राज्यांमध्येही 10 ते 12 डिसेंबरदरम्यान थंडीची तीव्रता वाढणार आहे. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि विदर्भ या भागांमध्ये शीतलहरी सतत कायम राहील, असे हवामान तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्रातील तापमान पुढील तीन दिवसांत घसरत राहील आणि त्यानंतर काही काळ परिस्थिती स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मात्र, वातावरणातील गारठ्याचे प्रमाण पुढील आठवड्यापर्यंत जाणवेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय लोकशाही प्रक्रियेचे मार्गदर्शन

नागपूर, दि. ०९ डिसेंबर २०२५ : राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) तर्फे राज्यातील विविध विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन आज महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्री आशिष शेलार यांनी केले तर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आभार मानले

“संसदीय प्रक्रिया समजून घेणं ही लोकशाहीची पहिली पायरी” : सभापती प्रा. राम शिंदे

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की विधिमंडळ हे जनतेच्या आशा-अपेक्षा मांडण्याचे व्यासपीठ आहे. चर्चेची शिस्त, वाद-विवादाची मर्यादा आणि लोकप्रश्नांना प्राधान्य देण्याची संस्कृती येथेच शिकता येते. विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिच्या ऐतिहासिक परंपरा आणि कायदे विद्यार्थ्यांनी अभ्यासावेत, असेही त्यांनी सांगितले.

“सुदृढ लोकशाहीसाठी तरुणांनी प्रश्न विचारावेत” : विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि तर्कशुद्ध चर्चा करण्याची संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून, संसदीय प्रक्रिया, आचारसंहिता आणि पारदर्शकतेसाठी झालेल्या तांत्रिक सुधारणा यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“भारताची लोकशाही अनेक आव्हानांना सामोरे जात अधिक मजबूत झाली आहे”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या स्थैर्याबद्दल सांगताना भारत इतर अनेक देशांच्या तुलनेत लोकशाही टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरल्याचे नमूद केले.
ते म्हणाले, “भारतासारखा विविधतेने भरलेला देश शांततेने, नियमबद्ध पद्धतीने लोकशाही चालवतो, हीच आपली खरी शक्ती आहे. सभागृहातील चर्चा, वाद-प्रतिवाद, समित्यांचे काम, आणि धोरणनिर्मिती — या प्रक्रियेचा अभ्यास केल्याने तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती आणि पुस्तकातील सिद्धान्त यांतील अंतर समजेल.” मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन केले.

“तरुणाई हीच लोकशाहीचं भविष्य” : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या प्रभावी भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भविष्यातील नेतृत्व हीच आजची तरुणाई आहे. खरं तर आपल्या महान संसदीय लोकशाहीचं भविष्य इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यात आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाची शाखा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. या अभ्यासवर्गातून लोकप्रतिनिधी नेमकं काय काम करतात, ते कसं करायला हवं, निर्णयप्रक्रिया कशी चालते, याचा सखोल अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. ते पुढे म्हणाले की, शासनातील बदलत्या अपेक्षांसोबत विद्यार्थ्यांनीही नेतृत्वाची नवी तयारी करणे आवश्यक आहे.

“राष्ट्रीयकुल संसदीय मंडळातर्फे होणाऱ्या या संसदीय अभ्यासवर्गाची प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणारी भूमिका”: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

समारोपात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की राजकारण म्हणजे फक्त भाषण नव्हे, तर अभ्यास आणि योग्य निर्णयक्षमता हाच नेतृत्वाचा आधार आहे. त्यांनी विधानपरिषदेत घेतले जाणारे ऐतिहासिक निर्णय, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे आंतरराष्ट्रीय अनुभव, आणि जागतिक लोकशाही परंपरा यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण झाल्याने प्रकाशित ‘महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सव, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता व महत्त्व’ तसेच याच मालिकेतील द्वितीय ग्रंथ “विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे”, प्रकाशित झाल्यानंतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया – भव्य पोस्टर प्रदर्शित

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता, नजाकत आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते. या झलकितून चित्रपटाचा भव्य स्केल, वैभवशाली मांडणी आणि त्या काळाचा समृद्ध कॅन्व्हास स्पष्टपणे दिसून येतो.

चित्रपटात ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचे पडद्यामागचे वास्तव या चित्रपटातून उलगडले जाणार आहे.

निर्मात्यांच्या मते, “जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने ओतप्रोत भरलेली आहे. तमन्ना भाटियाच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यपूर्ण शालीनता, नैसर्गिक चमक आणि तिच्या डोळ्यांतील भावना या भूमिकेला जिवंत करतात. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून, या भूमिकेत ती जणू त्या काळातून थेट आजच्या पडद्यावर आली आहे असे वाटते.”

याआधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदी यांच्या व्ही. शांताराम यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये अपार उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’च्या पोस्टरमुळे त्या कथेतला भावनिक आणि कलात्मक थर अधिक गडद झाला आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचे समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील गुंफण पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे.

हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार असून, तो भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला नव्या पिढीसमोर आणणारा एक भव्य आणि भावस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

सीसीटीव्हीचा पुरावा देत आरोप:भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने केल्या मतदार याद्या..

पुणे- भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने प्रभाग रचना आणि प्रभागांच्या मतदार याद्या केल्याचाआरोप आज संजय बालगुडे यांच्या समवेत विचारवंत विश्वंभर चौधरी , वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजप-महापालिका अधिकाऱ्यांचे साटेलोटे केले उघड:

काँग्रेस नेते संजय बालगुडे यांचा प्रारूप मतदारयाद्या संगनमताने बनवल्याचा आरोप

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये भाजप आणि मनपा अधिकाऱ्यांनी संगनमत करून फेरफार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय बालगुडे यांनी केला आहे. मतदारयाद्या जाहीर होण्यापूर्वीच मनपा कार्यालयांमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि अधिकारी बंद दाराआड याद्यांमध्ये बदल करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाल्याचे बालगुडे यांनी म्हटले आहे.बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयादी जाहीर होण्यापूर्वी काही दिवस आधीच महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात भाजपचे काही लोक उपस्थित होते. संबंधित कार्यालयांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मनपा अधिकारी आणि भाजपचे लोक बंद दाराआड मतदारयाद्या चाळत होते. प्रारूप यादी जाहीर होण्यापूर्वी २० ते २५ दिवस आधीच कोणत्या वॉर्डात कोणते मतदार टाकायचे, हे काम सुरू असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.हा लोकशाहीची हत्या करणारा मोठा कट असून, निवडणूक आयोग भाजपच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप बालगुडे यांनी केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाजपचे लोक मनपा अधिकाऱ्यांना सूचना कशा देत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. सरकारी कार्यालयाचे दार लावून सलग साडेचार तास ही बैठक सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रत्येक मतदारसंघातून हजारो मतदार बदलण्याचे काम करण्यात आले आहे. हा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, लोकशाही प्रक्रियेवरील दरोडा आहे, असे बालगुडे म्हणाले. मतदारयाद्या पारदर्शक आणि प्रामाणिकपणे तयार होईपर्यंत मनपा निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, कडी लावून ठराविक लोक बसून याद्या बदलत असतील, तर यात काय काळेबेरे आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेला ॲड. असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित होते. विश्वंभर चौधरी म्हणाले की, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात युती झाली असून, भाजपचे लोक मनपा अधिकाऱ्यांना मतदारयादीतील बदल समजावून सांगतात, हे धक्कादायक आहे. प्रत्येक प्रभागात अशाप्रकारे बदल केले गेले असून, रहिवाशांचे ठिकाण बदलून त्यांना लांबच्या मतदारसंघात टाकले गेले आहे.शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मतदारयाद्यांचा घोळ निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या

पुणे- विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार डिसेंबर रोजी हा प्रकार घडला असून पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुनाकिब अन्सारी हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याची आणि पीडित मुलीची ओळख काही दिवसांपूर्वी एका बसस्टॉपवर झाली होती. चार डिसेंबर रोजी त्याने तिला “शाळेत सोडतो” असे सांगत विश्वासात घेतले आणि तिला आपल्या दुचाकीवर बसवले. मात्र शाळेत न नेत, आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला आणि तेथे जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.

अत्याचारानंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अल्पावधीत तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला व त्याला अटक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.