Home Blog Page 89

“विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित – संदीप खर्डेकर”.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून “राजकारण” विरहित “समाजकारणाची” पंचवीस वर्षे.

विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित होत असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. दीपावली निमित्ताने विविध गणेशोत्सव मंडळ, विविध संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, ज्ञाती संस्था,अनाथाश्रम, दिव्यांग केंद्र, वृद्धाश्रम यांना उपयुक्त भेट वस्तू देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, भाजपा च्या कोथरूड मंडल उपाध्यक्ष अनघाताई जगताप,भाजपा चे सुधीर फाटक, बाल तरुण मंडळ पौड फाटा चे पदाधिकारी अनिकेत मोकर,युवराज कोंडे, यश मोकर, सिद्धांत कुडले, ओंकार मित्र मंडळ चे तुषार दिघे, गणेशनगर मंडळाचे मनीष चव्हाण, पार्थ पालकर, सिद्धांत मगर, साई पालकर,कुमार युवक मित्र मंडळाचे प्रसाद तावरे, उमेश माने,बाल तरुण मित्र मंडळ पांडुरंग कॉलोनी चे हर्षल होजगे, अभिजित साबळे, पार्थ तावरे, अष्टविनायक मित्र मंडळाचे सिद्धेश करंजकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून राजकारण विरहित समाजकारणाचे हे पंचवीसावे वर्ष असून 2001 साली ह्या कार्याला सुरुवात झाली आणि 2007 साली सह धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी प्रमाणपत्र व सचोटीने समाजकार्य व पारदर्शी व्यवहारामुळे आयकर विभागाचे कर सवलतीचे “80 जी” हे प्रमाणपत्र देखील मिळाले असेही संदीप खर्डेकर म्हणाले.पुण्यनगरीत अनेक दानशूर व्यक्ती असून त्यांच्या देणगीवर फाउंडेशन चे काम सुरु असून येणाऱ्या काळात सी एस आर निधीच्या माध्यमातून शाश्वत प्रकल्प उभारणीवर भर देणार असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी ओम नवनाथ मित्र मंडळ, बाल तरुण मित्र मंडळ, पांडुरंग कॉलोनी,एरंडवणा मित्र मंडळ,कर्वे रोड,दशभुजा मित्र मंडळ, कर्वे रोड यांना कपाट तर इतर मंडळाना खुर्च्या व वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले व दीपावली च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी दीपावली च्या शुभेच्छा देतानाच ” आपण आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करत असताना समाजात ज्यांच्या कडे काही कमी आहे जे गरजू आहेत त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले पाहिजे व फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी ही काही मिठाई, कपडे, दिवे किंवा इतर वस्तूंचा छोटासा का होईना वाटा देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे सांगितले.
उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने सुधीर फाटक यांनी आभार व्यक्त करताना ” क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कायमस्वरूपी उपयोगी वस्तूंची भेट हा नवा पायंडा सर्वांनीच अनुकरण करावे असा असल्याचे मत व्यक्त केले.

जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही:मुरलीधर मोहोळ

पुणे:शेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदारातून मी बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. त्यामुळे या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही. राजू शेट्टी किंवा कोणीही वस्तुस्थिती पडताळल्यास ही बाब समजेल, त्यामुळे माहिती न घेताच चुकीचे आरोप करू नयेत, असे पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी स्पष्ट केले.

मोहोळ यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ‘३०-३२ वर्ष  सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना  असे चुकीचे आरोप झाल्यास एखाद्या कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होते. एखाद्याचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. पुणेकरांचा खासदार असल्याने माझ्यावर होत असलेल्या आरोपांवर पुणेकरांना स्पष्टीकरण देणे मला गरजेचे वाटले, म्हणून मी माझी बाजू मांडली, असे मोहोळ यांनी नमूद केले.

‘जैन बोर्डिंगचे खरेदीखत, व्यवहार गोखले बिल्डर्स या बांधकाम व्यावसायिकाने केला. मी गोखलेंचा भागीदार आहे, असा आरोप माझ्यावर केला गेला. मी माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात तसे घोषित केले आहे. मी शेती व्यवसाय करतो, बांधकाम व्यवसाय करतो, हे सर्व मी स्पष्टपणे नमूद केले होते. मी स्वच्छपणे व्यवसाय केला व त्याची माहिती कागदावर दाखवली,असे मोहोळ म्हणाले.

‘गोखले इस्टेट एलएलपी’ आणि ‘गोखले फ्यूचर एलएलपी’ या दोन कंपन्यांमध्ये मी भागीदार होतो. यातील एक संस्था २०२२ आणि दुसरी २०२३ मध्ये स्थापन झाली. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकही रुपयाचा व्यवसाय, व्यवहार झालेला नाही, ही माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरून कोणालाही पडताळून पाहता येईल. केंद्रात मंत्री झाल्यानंतर नोकरी करता येत नाही, भागीदारी करता येत नाही. त्यानुसार या दोन्ही भागीदारी संस्थांमधून मी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा देत बाहेर पडलो. त्यानंतर जैन बोर्डिंग ट्रस्टची बैठक १६ डिसेंबर २०२४ रोजी बैठक झाली. त्यात बोर्डिंगच्या पुनर्विकासासाठी विकसकाला देण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पुणे आणि मुंबईतील काही वर्तमानपत्रांत निविदा प्रसिद्ध केली. पुढे गोखले बिल्डर्सने आठ ऑक्टोबर २०२५ रोजी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत खरेदीखत केले. मी या भागीदारी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. मग यात माझा संबंध येतोच कुठे ? असा सवाल मोहोळ यांनी या वेळी केला. या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नसताना मुरलीधर मोहोळ यांनी तीन हजार कोटींची जमीन ३०० कोटी रुपयांत घेतली, असा आरोप केला गेला.

जमिनीची किंमत २४० कोटी

जमीन एक लाख २० हजार चौरस फूट आहे. मोकळ्या जमिनीसाठी २० हजार रुपये चौरस फूट इतका दर कुठेही नाही. एक वेळ हा दर गृहीत धरला तरी या जमिनीची किंमत २४० कोटी रुपयेच होते. मग अशा परिस्थितीत जमिनीची किंमत तीन किंवा चार हजार कोटी भासवून बेताल आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि मगच आरोप करावेत, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुण्यातील जैन बांधवांवर माझा विश्वास आहे, पुण्यातील एकाही जैन बांधवाने माझ्यावर आरोप केलेला नाही. मी त्यांच्या व ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्या भावना समजून घेत त्यांना मदत कशी करता येईल, हाच माझा प्रयत्न आहे,असे मोहोळ यांनी नमूद केले.

राजू शेट्टींची नूरा कुस्ती

‘राजू शेट्टी यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा न करताच, मला न विचारताच बेछूट आरोप केले. त्यांनी मला विचारले असते, तर मी वस्तुस्थिती मांडली असती. त्यांच्यावर माझा आक्षेप नाही. एक खरी कुस्ती असते आणि दुसरी नुरा कुस्ती. राजू शेट्टी हे मला नूरा कुस्तीचे खेळाडू वाटतात. दोन्हीतला फरक पुणेकर व कोल्हापूरकर चांगलाच जाणतात,’असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला.

राजू शेट्टींनी आरोप केल्यानंतर काही बिळात लपलेले उंदीर बाहेर येऊन बोलू लागले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नेत्याने सगळ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मी तेव्हाही आणि आताही एकही शब्द बोलणार नाही. ही व्यक्ती वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडून नाकारली गेली आहे, अशा शब्दात मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना टोला लगावला. तर महायुतीत आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. नेत्यांचे आदेश आम्ही ऐकतो. धंगेकर हा काय प्रकार आहे त्यांचे त्यांनाच माहित. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले पण एकही कागद दाखवला नाही, असे मोहोळ म्हणाले.

ऑलिंपिक समितीच्या निवडणुकीत मी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आहेत. राज्यातील युती आणि खेळ हा वेगळा विषय आहे. मात्र, ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होईल.

गुन्हेगारी खपवून घेणार नाही

कोथरूड मध्येच काय, पुण्यातही गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. पोलिस त्यांचे काम करत आहेत. कोणीही पुण्याला बदनाम करू नये. काही गोष्टी घडल्या आहेत ते स्वीकारून पोलिस दलामार्फत योग्य कारवाई व्हावी, यासाठी मी सातत्याने पोलिस आयुक्तांच्या संपर्कात आहे

पुणे–अक्कलकोट–पुणे वारीचा विधायक उपक्रम

पुणे : दिवाळीच्या आनंदसोहळ्यात समाजातील विशेष मुलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने श्रीकांत सौंदणकर यांच्या *‘पुणे–अक्कलकोट–पुणे वारी’*तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सिंधू विद्या भवन शाळेतील विशेष मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

 या प्रसंगी शाळेचे वातावरण उत्साह, आनंद आणि भावनिक ऊर्जेने भरून गेले.कार्यक्रमास सिंधू विद्या भवनाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सूर्यवंशी, आयईसी शाळेच्या रूपा साळवी, अमृता भागवत, देवयानी बोरसे, अमित होळकर तसेच संस्थेचे सेवेकरी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या प्रयत्नांचे व कौशल्याचे कौतुक केले.

श्रीकांत सौंदणकर यांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात समाजातील विविध घटकांपर्यंत प्रेम आणि आनंद पोहोचवणारे उपक्रम आम्ही राबवतो. विशेष मुलांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. हे उपक्रमाचे चौथे वर्षे असून संस्थेकडून वर्षभर विविध सेवाभावी व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. समाजसेवेचा हा सातत्यपूर्ण धागा आता पुण्यातील अनेक शाळा आणि सामाजिक गटांपर्यंत पोहोचला आहे. 

विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

 सिंधू विद्या भवन शाळेतील विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आज झाले. मुलांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये जेली मेणबत्त्या, आकर्षक पणत्या, लटकन, तोरणे, टी-कोस्टर, सुबक पाकिटे, ब्रेसलेट, कानातले अशा विविध वस्तूंचा येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मुलांचा उत्साह वाढवला.

पुण्यातील चार बिल्डरांना कारावास; ग्राहकांना कबूल केलेल्या सुविधा टाळल्या आणि आयोगाचा आदेश ही नाही जुमानला

पुणे-अनेक बिल्डर जाहिरात करताना अनेक आश्वासने देतात. मात्र प्रत्यक्षात ताबा देताना मात्र सांगितलेल्या अनेक गोष्टी दिल्या जात नाही. मात्र बिल्डरसोबत संघर्ष नको म्हणून अनेकदा मध्यमवर्गीय ग्राहक तक्रार करण्यास टाळाटाळ करतो. परंतु या प्रकरणामुळे अनेक जण ज्यांची फसवणूक झाली आहे ते पुढे येऊन बिल्डरविरूद्ध आवाज उठवतील. असा ग्राहक हक्क आणि नियामक यंत्रणेच्या अधिकाराची ताकद अधोरेखित करणारा ऐतिहासिक निर्णय सध्या पुण्यात चर्चिला जातो आहे. ज्यामध्ये पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चार बांधकाम व्यावसायिकांना प्रत्येकी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या बांधकाम व्यावसायिकांनी आयोगाच्या आधीच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले होते.

हा खटला वेंकटेश विजय बिल्डर्स या बांधकाम फर्मविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या फर्मचे भागीदार रमेश रामू, विमल एम. चसवाल, संजीव आर. कुसळकर आणि राम दत्तात्रय मुदलियार यांनी पुण्यातील रास्ता पेठत निवासी प्रकल्पात आवश्यक सुविधा पुरवण्यात आणि बांधकामाच्या पूर्णत्वाशी संबंधित औपचारिकता पार पाडण्यात टाळाटाळ केल्या संबंधी दाखल करण्यात आला होता.आयोगाचे अध्यक्ष अनिल जावळेकर आणि सदस्य शुभांगी दुनाखे व सरिता पाटील यांच्या खंडपीठाने निरीक्षण केले की, बांधकाम व्यावसायिकांनी आयोगाचा आधीचा आदेश जाणूनबुजून मोडला आहे, ज्यामुळे तक्रारदाराला न्याय मिळाला नाही. हा निर्णय ग्राहक संरक्षण अधिनियमाच्या कलम २७(१) आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २५५(२) अंतर्गत देण्यात आला असून, ग्राहक आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी शिक्षेसह तुरुंगवास होऊ शकतो, असा महत्त्वाचा संदेश या निकालाने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात दिला गेला आहे.

तक्रारदार कुंदन गोसावी यांनी ॲॅड. विशाल देशमुख आणि ॲॅड. उत्तम धावले यांच्या मार्फत आयोगात तक्रार दाखल केली होती. गोसावी यांनी वेंकटेश विजय बिल्डर्ससोबत विकास करार केला होता, ज्याअंतर्गत रास्ता पेठ येथील त्यांची जमीन विकसित करण्यास बांधकाम व्यावसायिकांना परवानगी दिली होती. करारानुसार गोसावी यांना नव्या इमारतीत दोन फ्लॅट्स आणि एक व्यावसायिक दुकान मिळणे अपेक्षित होते.गोसावी यांनी सर्व आर्थिक अटी पूर्ण करूनदेखील, बांधकाम व्यावसायिकांनी करारातील मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत.सततच्या विलंब आणि प्रतिसादाच्या अभावामुळे गोसावी यांनी जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. प्रकरणाचा अभ्यास करून आयोगाने आपल्या आधीच्या आदेशात बांधकाम व्यावसायिकांना सेवेत त्रुटीबद्दल दोषी ठरवले होते आणि त्यांना निर्देश दिले होते की, करारानुसार सर्व प्रलंबित सुविधा पुरवाव्यातआणि मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल एक लाख रुपये भरपाई देण्यात द्यावी. मात्र, विकासकांनी आयोगाचा हा आदेश दुर्लक्षित केला. त्यामुळे गोसावी यांनी अंमलबजावणी अर्ज दाखल केला. कायदेशीर सुनावणी आणि निकाल.नव्या सुनावणीदरम्यान आयोगाने विकासकांच्या आदेश भंगाकडे गांभीर्याने लक्ष दिले. आपल्या निर्णयात आयोगाने नमूद केले की, “आरोपींनी आयोगाचा आदेश जाणूनबुजून मोडला असून, त्यामुळे ग्राहकाला योग्य न्याय मिळू शकला नाही. अशा वर्तनाला शिक्षा न दिल्यास चुकीचा संदेश समाजात जाईल.”

दरम्यान, विकसकांनी या आदेशाविरुद्ध राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते. राज्य आयोगाने भरपाई रकमेबाबतचा आदेश रद्द केला, परंतु दोषी ठरवण्याचा निष्कर्ष कायम ठेवला, आणि प्रकरण परत जिल्हा आयोगाकडे शिक्षा निश्चितीसाठी पाठवले. सुनावणीदरम्यान विकसकांनी पूर्णता प्रमाणपत्र मिळवण्यात अपयश मान्य केले, ज्यामुळे त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात झालेल्या अपयशाला अधिकच पुष्टी मिळाली.विकसकांचा युक्तिवाद होता की, “आम्हाला खोटेपणाने या प्रकरणात अडकवले गेले आहे; आमचा याच्याशी काही संबंध नाही. आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे प्रकरण दाखल केले गेले आहे,” असा दावा त्यांनी केला. मात्र, आयोगाने हा दावा फेटाळून लावला. शेवटी, आयोगाने चारही भागीदारांना दोन वर्षांचा साधा तुरुंगवास आणि दोन हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला.

ज्योती माँ उर्फ बाबू खानला अटक,मुंबईत 20 घरे, 30 वर्षांपासून अवैध वास्तव्य:

बांगलादेशी घुसखोरी रॅकेटचा पर्दाफाश
मुंबई-बांगलादेशातून आलेली आणि ‘ज्योती माँ’ या नावाने ओळखली जाणारी किन्नर गुरू बाबू खान हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बांगलादेशी घुसखोरी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील विविध शहरांतील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. त्यांनी पोलिसांना थेट सूचना देऊन कारवाईची मागणी केली होती. दिवाळीच्या काळातच ही मोठी कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बाबू खान हिची मुंबई उपनगरांत बऱ्याच ठिकाणी संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले असून तिच्या नावावर जवळपास 20 घरे असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच तिचे 200 पेक्षा अधिक भक्त असल्याची माहितीही समोर आली आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ती बांगलादेशातून आलेल्यांना राहण्याची जागा पुरवायची. स्थानिक नागरिकांनी याविषयीची माहिती गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांना मिळालेली माहिती पडताळून किन्नर गुरू म्हणून ओळख असलेल्या बाबू खान हिला अटक केली. पोलिसांनी तिच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या तपासानुसार, बाबू खान उर्फ ज्योती माँ हे एक मोठे बेकायदेशीर रॅकेट चालवत होती. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेवरून ती अवैधमार्गाने बांगलादेशी नागरिकांना देशात आणायची. त्यानंतर त्यांना कोलकात्यात काही दिवस थांबवून बनावट शाळेचे दाखले, जन्म दाखले बनवले जायचे. ही बनावट कागदपत्रे तयार झाल्यावर त्यांना मुंबईत आणले जायचे आणि गोवंडी भागात आश्रय दिला जायचा.

किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘ज्योति उर्फ बाबू आयन खान आणि तिच्या एक डझन बांगलादेशी सहकाऱ्यांची आज मुंबईत शिवाजीनगर मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे.’ गेल्या 30 वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे ती भारतात राहत होती आणि तिने 200 हून अधिक लोकांना भारतात अवैधपणे आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी तिच्याकडून बनावट जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले आहेत. तिच्या नावावर मुंबईत 20 पेक्षा जास्त घरे असल्याची माहिती समोर आली आहे, जी तिने भाड्याने देऊन मोठी कमाई केली. याशिवाय, तिच्यावर अपहरण आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. सध्या शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बाजीराव रस्त्यावर व्यापाऱ्याला अडवून १.३० लाख लुटून नेले दिवाळीच्या काळात व्यापाऱ्याला लुटण्याची ही दुसरी घटना.

पुणे –बाजीराव रस्त्यावर एका व्यावसायिकाला धमकावून १ लाख ३० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी ही घटना घडवून आणली असून, याप्रकरणी खडक पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ६० वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्त्यावर इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. दिवाळीमुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते. रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून व्यावसायिक त्यांच्या शुक्रवार पेठेतील घराकडे दुचाकीवरून निघाले होते. त्यांनी व्यवसायातून जमा झालेली १ लाख ३० हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती.

बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळील गल्लीतून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. घाबरलेल्या व्यावसायिकाने दुचाकीच्या डिक्कीतील रोकड चोरट्यांना दिली. त्यानंतर चोरटे भरधाव वेगाने पसार झाले.या घटनेनंतर व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाजीराव रस्ता आणि सुभाषनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे.दरम्यान, दिवाळीच्या काळात व्यापाऱ्याला लुटण्याची ही दुसरी घटना आहे.

दुचाकीस्वार व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर नुकतीच घडली, बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्याने निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांना धमकावून खिशातील ४५ हजारांची रोकड लुटली. व्यापाऱ्याने आरडाओरडा केला. दिवाळीत व्यापाऱ्यांना लूटण्यात आल्याची दुसरी घटना घडल्याने घबराट उडाली आहे.

मातंग एकता आंदोलनाकडून पूरग्रस्तांना दीपावलीनिमित्त मदत:जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; रमेश बागवे यांनी व्यक्त केली ‘कर्तव्य’ भावना

पुणे -महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या कठीण काळात मातंग एकता आंदोलनाने पुढाकार घेत, पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी दीपावली निमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यावेळी पूरग्रस्त बांधवांना मदत करणे हे कर्तव्य असल्याची भावना मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या मदत मोहिमेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. या उपक्रमात आतापर्यंत 1300 ते 1400 कुटुंबांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

या मोहिमेचा शेवटचा टप्पा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका (कपालापुरी, वडनेर) आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका (रिदोरी, तांदुळवाडी, कुर्डवाडी) येथे पार पडला. या टप्प्यात एकूण 1300 कुटुंबियांना मदत कार्य मिळाले. याअंतर्गत आजवर 2,200 ते 2,500 कुटुंबांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचे नियोजित कार्य पूर्ण झाले आहे.

मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अखंड सुरू होते. राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, सचिव अरुण गायकवाड, सुनील बावकर, रामभाऊ वाघमारे (जिल्हाध्यक्ष सोलापूर), अनिल गवळी (तालुका अध्यक्ष माढा), बाळासाहेब बागाव (जिल्हा उपाध्यक्ष), रणजीत कसबे (धाराशिव जिल्हा अध्यक्ष), राणा कसबे, सुनील कसबे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, प्राध्यापक दुर्योधन साठे, माजी उपसरपंच कालिदास शिरतोडे, उपाध्यक्ष माढा तालुका ज्ञानेश्वर कसबे आणि सुनील बावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला.या संपूर्ण अभियानाची संकल्पना संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक अविनाश बागवे यांची होती. त्यांनी योग्य समन्वय साधून हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण केले.

दिवाळीचा पहिला दिवा निवारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत

लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय कला अकादमी न्यासतर्फे रांगोळ्या काढून दिपोत्सव

पुणे : निवारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी आपल्या थरथरत्या हातांनी दिवाळीचा पहिला दिवा लावला आणि क्षणातच वृद्धाश्रमाचा सारा परिसर उजळून निघाला. केवळ प्रकाशाने नव्हे, तर ममतेच्या प्रकाशाने. त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. कोणीतरी अजूनही आपलं आहे याचा आनंद व्यक्त करीत आजी आजोबांनी उत्साहात दिवाळी सणाला सुरुवात केली.

दिवाळीचा पहिला दिवा आजी-आजोबांसोबत प्रज्वलित करत आनंद, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देण्यात आला. लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि राष्ट्रीय कला अकादमी न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमात हा दिपोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, दिलीप थोरात, राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे, अमर लांडे, प्रिया भोंडवे, सुप्रिया मुरमुरे, मिना लकवा, अर्जुन बिराजदार आणि जयवंत मोहने, निवारा संस्थेचे विजय बेलसरे, शेखर कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमात वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी स्वतःच्या हाताने पहिला दिवा लावला. त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य हाच दिवाळीचा खरा प्रकाश होता. सहभागी कलाकारांनी सुंदर रांगोळ्या काढून परिसर सजवला आणि दिवाळीचे वातावरण अधिक सुंदर केले. फटाके आणि फुलबाजे पेटवत वृद्धांनी दिवाळीचा आनंद लुटला.

रोमा लांडे म्हणाल्या, वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवा लावणे हा सोहळा आमच्यासाठी अत्यंत आनंददायी होता. वृद्धाश्रमातील वृद्धांचे जीवन हे एकाकीपणाचे असते. त्यांच्याशी संवाद साधून आणि दिवाळी सण साजरा केल्यामुळे वृद्धांना सन्मान आणि आनंद मिळतो.

महापालिका आयुक्तांचा तडाखा: कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई, कुणी झाले निलंबित तर कोणाची झाली बदली

मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम या तिघांवर निलंबनाची कारवाई

पुणे —
पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी शेवाळवाडी व मांजरी परिसराला भेट देऊन शहरातील स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण तसेच नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्यांची पाहणी केली. या भेटीदरम्यान परिसरातील अस्वच्छता, रस्त्यांवरील कचरा आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.“शहरातील अस्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज आणि अतिक्रमणाच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.”असे सांगत कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबन आणि बदलीची कारवाई केली .

भेटीदरम्यान संबंधित विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्यामुळे आयुक्तांनी अकार्यक्षम व कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, यापुढे निष्काळजीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खात्यांतर्गत चौकशी, निलंबन तसेच अकार्यकारी पदावर बदलीची कारवाई करण्यात येईल.याच वेळी, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता रवि खंदारे यांची नियुक्तीचे आदेश तातडीने देण्यात आले.

तसेच, आयुक्त यांच्या सूचनेनुसार मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक तसेच मुकादम या तिघांवर समाधानकारक काम न केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी मागील दोन दिवसांपूर्वी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाघोली भागात झालेल्या पाहणीदरम्यानही आयुक्तांनी ड्रेनेज व अतिक्रमण समस्यांबाबत निष्क्रियतेसाठी श्रीमती शितल वाकडे, सहाय्यक आयुक्त,नगर रोड व ड्रेनेज विभागातील उप अभियंता श्री विनायक शिंदे व श्री गणेश पुरम या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या.

पुणे–सोलापूर महामार्गावरील दुभाजकांमधील अस्वच्छतेबद्दल देखील आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विभागांना स्वच्छता सुधारण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.महापालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे निष्काळजी व कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कडक संदेश गेला आहे.

“बियॉन्ड व्हिजन” एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, पुणे यांनी रचला इतिहास

0

भारतातील अंडरग्रॅज्युएट डेंटल स्टुडंट्ससाठी आयोजित सर्वात मोठा मॅग्निफिकेशन मास्टरक्लास
थीमः 200 स्माईल्स_एक दृष्टी
“जेव्हा प्रशिक्षण सुरुवातीपासून दिले जाते, तेव्हा उत्कृष्टता ही सवय बनते.”
पुणे
-“200 स्माईल्स… एक दृष्टी” ही थीम प्रत्यक्षात उतरली एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे, जेव्हा 200 अंडरग्रॅज्युएट डेंटल स्टुडंट्सनी मॅग्निफिकेशन अंतर्गत प्रशिक्षण घेतले आणि अचूकतेवर आधारित दंतचिकित्सेकडे पहिले पाऊल टाकले.
हा विशेष उपक्रम वर्ल्ड एंडोडॉन्टिक डेच्या औचित्याने इंडियन एंडोडॉन्टिक सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाने दंत शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक मैलाचा दगड ठरवला देशातील अंडरग्रॅज्युएट वि‌द्यार्थ्यांसाठी आयोजित सर्वात मोठा मॅग्निफिकेशन मास्टरक्लास.
कंझव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री अँड एंडोडॉन्टिक्स विभागातर्फे आयोजित “बियॉन्ड व्हिजन” या उपक्रमाचे संकल्पना आणि नेतृत्व विभागप्रमुख प्रा. डॉ. विवेक हेगडे यांनी केले. त्यांच्या सोबत विभागातील समर्पित फॅकल्टी आणि पदव्युत्तर वि‌द्यार्थ्यांच्या टीमने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे योगदान दिले. डॉ. हेगडे अनेक वर्षांपासून इंडियन एंडोडॉन्टिक सोसायटीच्या सहकार्याने सूक्ष्मदर्शक-आधारित मॅग्निफिकेशन मास्टरक्लासेस आयोजित करत आहेत, ज्यातून देशभरातील नवोदित दंतचिकित्सकांना अचूकता आणि उत्कृष्टतेकडे प्रेरणा मिळते.
सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या हँड्स-ऑन सत्रात भाग घेतला, ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक डेंटल लूप्स देण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमधून अनुभवले की मॅग्निफिकेशन तंत्रज्ञानामुळे नैदानिक अचूकता, दृश्यमानता आणि एर्गोनॉमिक्समध्ये किती सुधारणा होते. आधुनिक दंतचिकित्सेमध्ये मॅग्निफिकेशनचा विकास आणि महत्त्व या विषयावर आयोजित विस्तृत व्याख्यानाने विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या टप्प्यातच अचूक तंत्रे आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमासाठी लूप्सचे प्रायोजन अॅडमेटेक हाईटेक मेडिकल सोल्यूशन्स प्रा. लि. यांनी केले. ही संस्था त्यांच्या प्रगत प्रकाशीय प्रणाली आणि दंत एर्गोनॉमिक्स क्षेत्रातील शिक्षण व नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते.

ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग, सर्व उड्डाणे थांबवली:कार्गो क्षेत्र जळून खाक, परिसरात विषारी वायू पसरण्याचा धोका

बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो क्षेत्रात आज आग लागली. अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही.आग इतक्या वेगाने पसरली की विमानतळ अधिकाऱ्यांना सर्व उड्डाणे तात्काळ थांबवावी लागली. दिल्लीहून ढाका जाणारे विमान कोलकात्याकडे वळवण्यात आले.अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या गेट क्रमांक ८ जवळील कार्गो भागात दुपारी २:३० वाजता आग लागली. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मालवाहू वाहनांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.काळ्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील हवा प्रदूषित झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

१५,००० कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करून आपुलकीची दिवाळी साजरी

0

आपुलकीची दिवाळी, मराठवाड्यासाठी..!

पुणे-बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील कष्टकरी, कामगार बांधवांसह पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने सुमारे १५,००० कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करून आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या “सण साजरा करताना सामाजिक जबाबदारी विसरू नका” या संदेशाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण घालून देण्यात आले असून मराठवाड्यातील नागरिकांच्या आनंदात भर टाकण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ या संस्थेचा शुभारंभ झाला. संस्थेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलताना मत मांडले की, “अमोल बालवडकर यांनी ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ उभारून मराठवाड्याच्या नागरिकांसाठी स्थायी व्यासपीठ निर्माण केले आहे.” असे बोलून त्यांनी सदरील उपक्रमाबाबत कौतुक केले.

माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेबजी दानवे पाटील म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून अमोल बालवडकर हे १५ हजारांहून अधिक कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करत असून, हे त्यांचे समाजाशी असलेले घट्ट नाते दर्शवते.” अशा शब्दांत त्यांनी देखील कौतुकाची थाप दिली.

सदर कार्यक्रमाला १५ हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. सामाजिक भान, जनसंपर्क आणि जनसेवा या तिन्ही स्तरांवर या उपक्रमाने एक नवा आदर्श निर्माण केला.

“राजकारण हे निवडणुकीपुरतेच मर्यादित नसून लोकांच्या संकटात त्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी जनसेवा आहे. ‘आपुलकीची दिवाळी, मराठवाड्यासाठी’ हा त्याच विचाराचा एक भाग आहे,” असे मत मांडून उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, अशोक मुरकुटे, रतन बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, माजी नगरसेवक किरण दगडे, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, स्वप्नालीताई सायकर, ज्योती कळमकर, गणेश कळमकर, लहूशेठ बालवडकर, वैदेही बापट, अंबादास कोकाटे, सुरेश कोकाटे, हभप संजयबाप्पु बालवडकर, सुभाष भोळ, राजेंद्र पाडाळे, प्रमोद कांबळे, अनिकेत चांदेरे, सुहास भोते, अनिल ससार, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, वैशाली कमाजदार, मिनापारगावकर, मोरेश्वर बालवडकर, शांताराम जांभुळकर, आत्माराम बालवडकर, अनिल बालवडकर, सचिन कोकाटे, गोविंद रणपिसे, रामदास विधाते, विजय विधाते, राजेंद्र मुरकुटे, अमर लोंढे, सोपान खैरे, कालिदास शेडगे, भानुदास पाडाळे, नामदेव पाडाळे, नामदेवराव गोलांडे, शिवाजी खैरे, भगवान खैरे, प्रभाकर पाडाळे, अशोक पाडाळे, माऊली सुतार, नंदकुमार गायकवाड, व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद तसेच बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागातील मान्यवर तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

भाजपाने देव आणि दैवत व महापुरुषांचा बाजार मांडला, स्वाभिमान, संस्कृती व अस्मितांशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ – सचिन सावंत

छत्रपती शिवाजी महाराज ‘कोटक’चे कधी झाले? सिद्धिविनायक ‘लोंबार्ड’ला विकला तर आचार्य अत्रेंचे निप्पॉन इंडिया एमएफ नामकरण !

देव, दैवत व महापुरुषांच्या अपमानावर फडणवीस, शिंदे व अजित पवारांनी खुलासा करावा, काँग्रेस पक्ष व स्वाभिमानी जनता हा अपमान खपवून घेणार नाही.

मुंबई, दि. १८ ऑक्टोबर २०२५

भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ सुरु केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व आता कार्पोरेट झाले असून पैशासाठी त्यांनी आपले देव, आराध्य दैवत व ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आता कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केले आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे आता आयसीआयसीआय लोम्बार्ड, महालक्ष्मीचे एचडीएफसी लाईफ तर आचार्य अत्रे स्टेशनचे निप्पॉन एमएफ असे नामकरण केले आहे. आपल्या अस्मितांशी चालवलेला हा खेळ संताप आणणारा आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी यावर खुलासा करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या नावासमोर कोटक लावलेले चालते का, असा प्रश्न विचारून काँग्रेस पक्ष व महाराष्ट्रातील जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे.

शेतकरी, मजूर, कामगार, महिला, बेरोजगारीचे प्रश्न असताना त्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा नामकरणाच्या नावाखाली अस्मितेचे राजकारण करत आहे. इलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या, दिल्लीतील राजपथचे कर्तव्यपथ, रेसकोर्स रोडचे लोक कल्याण मार्ग नामकरण केले परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, गांधी यांच्या नावाची भाजपाला ऍलर्जी असल्याने सायन्स सेंटरच्या नावातून नेहरु व नॅशनल पार्क स्टेशनच्या नावातून संजय गांधी यांचे नाव मात्र वगळले आहे. ही नावे आपला सार्वजनिक वारसा आहे आणि तोच भाजपाने विकायला काढला आहे. आपल्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, श्रद्धेचा व इतिहासाचा व्यापार चालवला आहे. आता काळबादेवी व शितलादेवी स्टेशन बाकी आहेत त्यासाठीही कार्पोरेट कंपन्यांसमोर हे सरकार हात पसरून त्यांच्या नावासाठीही लिलाव करतील. देशातील विमानतळे, बंदरे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी जागा कार्पोरेट्सना विकत आहेत. कार्पोरेटच्या हितासमोर भाजपाने धर्म, अस्मिता व संस्कृतीवर पाणी सोडले आहे. सनातन धर्माच्या नावाने शंख फुंकणारे देवस्थानांची नावे विकत आहेत यातून भाजपाचे दांभिक हिंदुत्व दिसून येते. सत्तेसाठी अस्मितेचे राजकारण करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र तीच अस्मिता कार्पोरेट्सच्या पायी वाहतो, असेही सावंत म्हणाले.

आपुलकीच्या दिवाळीने भारावले श्रीवत्समधील चिमुकले 

पुण्यातील विविध सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार ; तब्बल २ लाख ५० हजार रुपयांची वस्तुरुपी व आर्थिक मदत
पुणे : अनाथ मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे, या भावनेने पुणेकरांनी एकत्र येत श्रीवत्स संस्थेत अनोखा उपक्रम राबविला. पुण्यातील विविध सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत ससून रुग्णालय आवारातील श्रीवत्स संस्थेतील चिमुकल्यांसोबत आपुलकीची दिवाळी साजरी केली.

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांतर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरीता आयोजित आपुलकीची दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी शि.प्र.मंडळी नियामक मंडळ सदस्य सुधीर काळकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उद्योजक रसिक नहार, संस्थेचे सचिन अभ्यंकर, मेहुणपुरा मंडळाचे आनंद कावणकर, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, रोहन जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यंदा ३२ वे वर्ष आहे. विविध गाण्यावर नृत्य सादर करीत आपल्या मनातील भावना या चिमुकल्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. क्लारोनेट वादक वसंत पवार यांना पन्नास हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले. वस्तुरूपी पंचवीस हजार रुपये मदत करण्यात आली. श्रीवत्स संस्थेला आवश्यक असणारी आर्थिक व वस्तुरुपी भेट देण्यात आली. गायिका रश्मी मोघे आणि राहुल जोशी यांनी यावेळी गायन केले.

महेश सूर्यवंशी म्हणाले, दिवाळी हा प्रकाशाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. श्रीवत्स सारख्या संस्थेमध्ये समर्पित भावनेने मुले घडविण्याचे काम केले जात आहे. दिवाळी हा कृतज्ञतेचा उत्सव असल्याने समाजाप्रती असलेली आपली भावना व कर्तव्य प्रत्येकाने काही ना काही माध्यमातून केले पाहिजे. सुधीर काळकर म्हणाले, लहान मुलांची उर्जा आपल्या प्रत्येकाला समाजात समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा देते, असे त्यांनी सांगितले.

पराग ठाकूर म्हणाले, तब्बल ३१ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा उपक्रम ५०० रुपये मदतीपासून सुरु झाला होता. आजमितीस या उपक्रमाला समाजातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांकडून मोठया प्रमाणात सहाय्य मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे, असेही त्यांनी सांगितले.  

शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह एलआयसी परिवार, इमर्सन कंपनी, सेवानिवृत्त एसटी अधिकारी, नूमवि मराठी शाळा, नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मंडळ, शनिपार मित्र मंडळ, कुंभोजकर मित्रपरिवार, जनता बँक मित्रपरिवार, आफळे अकादमी, सैनिक मित्र परिवार, हिंदू महिला सभा, मंदार ठाकूरदेसाई मित्र परिवार, अभेद्य वाद्य पथक, नहार परिवार आदी संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला होता.

मानवी जीवनात आयुर्वेदाचे महत्व खूप आहे -वैद्य शशिकांत क्षीरसागर

सेवा आरोग्य फाऊंडेशन तर्फे
वैद्य आशुतोष जातेगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन

पुणे
सेवा आरोग्य फाऊंडेशन ही संस्था पुण्याच्या पश्चिम भागात मुख्यत्वेकरून कर्वेनगर वारजे,शिवणे, उत्तमनगर,कोथरूड,परमहंसनगर याभागातील सुमारे ४३ वस्त्यात सुमारे ८४ प्रकल्प राबविते.
आरोग्याच्या क्षेत्रात अल्पमूल्य साप्ताहिक दवाखाने चालविले जातात.यात अलोपॅथी व होमिओपॅथी २२,आयुर्वेदिक ४ , फिजिओथेरपी ५,नेत्र तपासणी २ अशा दवाखान्यातून प्रति आठवडा सुमारे ७५० ते ८०० रुग्ण तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात.याशिवाय गरजू रुग्णांना चष्मे वाटप,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, असे उपचार पण माफक दरात पुरवले जातात.
शैक्षणिक क्षेत्रात लहान मुलांसाठी समृद्धी संस्कार वर्ग तसेच किशोरवयीन मुलींसाठी घे भरारी किशोर विकास प्रकल्प नांवाने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वर्ग घेवून त्यांच्या सार्वत्रिक प्रगतीवर लक्ष दिले जाते.सांगाती प्रकल्पात हुशार व गरजू मुलां-मुलींना समुपदेशकाच्या माध्यमातून ८ वी ते १० वी त्याचेंबरोबर काम करून त्यांना सुजाण नागरिक म्हणून समाजात आत्मविश्वासाने वावरता यावे व त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम मिळावे म्हणून प्रयत्न केला जातो. या तिन्ही वर्गात मिळून सुमारे १००० मुलां-मुलीं बरोबर काम केले जाते.
या शिवाय गरजूंना कर्वेनगर, परमहंसनगर व बावधन येथे
रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले जाते.
अश्या सेवा वस्तीतील नागरिकांसाठी काम करणाऱ्या सेवा आरोग्य फाऊंडेशन तर्फे वैद्य आशुतोष जातेगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.सुरवातीस वैद्य शशिकांत क्षीरसागर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संचालक मनोज देशमुख यांनी करून दिला.
डॉ हर्षदा पाध्ये यांनी आभार मानले.प्रमुख पाहुणे वैद्य शशिकांत क्षीरसागर यांनी”आपला आहार,विहार कसा असावा याचे महत्त्व सांगितले तसेच याची सर्व माहिती आपल्या आयुर्वेदात आहे.आयुष्य जगण्याचे मूलभूत सिद्धांत काय आहेत ह्याचे वर्णन संस्कृत सुभाषित द्वारे समजावून सांगितले.मानवी जीवनात आयुर्वेदाचे महत्व समजावून सांगितले” आपल्याला बाहेर बघायची गरज नाही” असेही यावेळी प्रतिपादन केले.
कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास,भाग कार्यवाह रवींद्र लाटे,संचालक मनोज देशमुख,बासरीवादक डॉ आशुतोष जातेगावकर,सल्लागार पद्मनाभ उंडे,वैद्य शशिकांत क्षीरसागर,केशव माधव विश्वस्त निधीचे सचिव अरविंद देशपांडे यांची मुख्य उपस्थिती होती.
या प्रसंगी केशव माधव विश्वस्त निधी तर्फे सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेला औषधी साठी आर्थिक मदत करण्यात आली.सर्वांना दीपावली फराळ चे वाटप करण्यात आले.
सेवा आरोग्य फाऊंडेशन चे कर्मचारी,केशव माधव विश्वस्त निधी चे पदाधिकारी,कोथरूड,कर्वेनगर,
वारजे,शिवणे,उत्तम नगर वस्तीतील महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.